मी २० वर्षांची तरुणी असून बी.ए.च्या शेवटच्या वर्षांला आहे. मुंबईच्या एका उपनगरात राहते. मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. त्यासाठीची तयारी म्हणून मी गेल्या वर्षीपासूनच क्लासेस जॉइन केले आहेत. पण गेल्या सहा महिन्यांपासून माझं अभ्यासात लक्षच लागत नाहीय. आपल्याला हे स्पर्धा परीक्षेचं करिअर झेपेल का, परीक्षेत अपयशी झाले तर काय करायचं? असे मनात विचार येतात आणि पुढय़ातल्या पुस्तकात काय वाचतंय तेच कळत नाही. मी घरातली मोठी मुलगी आहे. माझ्याकडून घरच्यांना खूप अपेक्षा आहेत. मला हे जमलं नाही तर.. भयंकर भीती वाटते आणि त्यामुळे पुढचा अभ्यासही होत नाही. गेल्या तीन-चार महिन्यात माझं वजनही खूप वाढलंय. का ते कळत नाही. कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींनाही मी हे मनातलं सांगू शकत नाही. त्यांनाही मी पुस्तकी किडा वाटते आणि ते त्यावरून मला चिडवतातदेखील. मी काय करू? कधी तरी तर पळून जावंसं वाटतं यापासून दूर. प्लीज सजेस्ट.. अभ्यासात कसं कॉन्सन्ट्रेट करू? की वेगळा करिअरचा विचार करू?

प्रिय दीपाली,
परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी असते. विद्यार्थी परीक्षेसाठी नाही. कुठल्याही परीक्षा तुझ्यापेक्षा महत्त्वाची नाही. तू आज तुझ्या कुटुंबाची जबाबदारी ज्या पद्धतीने समजून घेत आहेस, त्यामध्येच तुझ्या स्वभावातील चांगुलपणा दिसतो. पण नुसतं चांगलं असून चालत नाही. काही वेळेला मनाला शिस्तदेखील लावावी लागते. तुझी काळजीही योग्य आहे. पण अतिकाळजीही मिठासारखी त्रासदायक ठरते. (कमी असेल तर बेचव, जास्त असेल तर खारट.)आपल्या मनाचं, भावनांचं नियोजन हे आपल्याला जमले पाहिजे. आपल्या मनामध्ये जी काही ताकद असते, ती आपण विचाराकरिता किंवा भावनांकरिता वापरू शकतो. जर मनातील ताकद भावनांकरिता जास्त वापरू लागलो तर विचारांना शिल्लकच राहत नाही. (म्हणूनच म्हणतात ना.. भावनाविवश होऊन निर्णय घेऊ नकोस.) तुझा सद्य:परिस्थितीमध्ये घरातून निघून जाण्याचा निर्णय थोडासा असाच नाही का गं वाटत तुला? मलापण खात्री वाटते की, तुझा हा निर्णय किंवा अशा प्रकारे कुठलाही निर्णय घ्यायला परवानगी देणार नाही.

राहता राहिला प्रश्न तुझ्या काळजीचा.. पहिली गोष्ट तुझं लक्ष चांगलं व्हायला तुझी तब्येत चांगली असायला हवी. तब्येत चांगली असेल तर मनदेखील चांगलं राहतं. तू दर दिवशी व्यायाम करतेस का गं? (अगदी रोज १२ सूर्यनमस्कार जरी घातलेस तरी फायदा होईल) तू वेळच्या वेळी जेवतेस का? तुझी अभ्यासाची जागा आवरलेली असते का? खूप आवाजाचा दंगा असेल, तर लायब्ररी बघ. अभ्यास थोडा आखीव-रेखीव करून बघ. आपल्याला किती झेपेल, किती अभ्यास आवश्यक आहे आणि रोज किती तास कसा आणि कधी अभ्यास करायला हवा याचं एकदा शांत डोक्यानं गणित मांड. अभ्यासाच्या वेळा निश्चित कर. टाइमटेबल कर, ज्यात अभ्यासाबरोबरच व्यायाम, करमणूक, छंद यासाठी वेळ असेल.

छंद व अभ्यास एकामागून एक केल्यास अभ्यासाचा शीण कमी होऊ शकतो. टीव्ही बघणे, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक चेक करणं किंवा पाहणं यामुळे आपण वेगळ्या विचारात गुंतू शकतो. त्याची तुला आता अजिबात गरज नाही. अभ्यासातून विचलित करणारे, नको ते विचार यातून येऊ शकतात. आपलं लक्ष्य ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे या अनावश्यक गोष्टी आपोआप दूर होतील. दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटाला ते करता येईल का बघ. आपल्या कुवतीबाहेर अभ्यासाचे तास असायला नकोत.
तू सलग दोन तास अभ्यास करू शकतेस की ४५ मिनिटं? हे तुझ्या आजवरच्या अनुभवावरून समजलं असेल. अभ्यास करताना नुसतं वाचन, लिखाण करून उपयोग नाही. जे वाचलं, लिहिलं ते लक्षात राहायला हवं. डोळे बंद करून जर तू केलेल्या अभ्यासाचं मनातल्या मनात रसग्रहण करू शकलीस तर त्याचा फायदा होईल. तू वाचायला बसल्यावर लक्षात येत नाही, असं तू म्हणालीस. तुझी झोप नीट होते ना? तुझ्या वयाला सात-आठ तास झोप आवश्यक आहे. लक्ष केंद्रित करण्यासाठी तुला दीर्घ श्वसनाचे व्यायाम आवश्यक आहेत. शवासनदेखील उपयुक्त ठरू शकतं, पण हे सगळं करूनही जर तुला फरक वाटत नसेल तर तू समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञाला भेटणं आवश्यक आहे.

मोकळं व्हा..!
आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. मनाची घालमेल तीच आहे, पण कारणं वेगळी आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. द्विधा मन:स्थितीतून, मानसिक गुंत्यातून आपल्याला मोकळं करील, आपल्या मनातली भीती, द्वेष, शंका दूर करील. आपला प्रश्न किती साधा आहे, बाष्कळ आहे, फालतू आहे, असं म्हणून आपल्याला हसणार नाही.. तू किती मूर्ख आहेस, अशी आपली टर उडवणार नाही.. असं कुणी तरी तेव्हा हवं असतं. मनात खोलवर रुतून त्रास देणारे प्रश्न उलगडण्यासाठी असंच कुणी तरी हवं असतं. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा.
मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील.
डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न ५्र५ं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.