‘मापं काढणं’ या वाक्चप्रचाराचा अर्थ आपल्याकडे वेगळा असला तरी सध्या कपडय़ांच्या बाबतीत शब्दश: मापं काढूनच खरेदी करावी लागते आहे. कित्येकदा कपडय़ांवरचे साईजचे लेबल बघूनही गोंधळाशिवाय हाती काहीच लागत नाही

‘‘मला ना त्या ब्रँडची ‘एल’ साइज बरोबर येते; पण दुसऱ्या ब्रँडची ‘एल’ साइज येत नाही.’’ ‘‘ब्रँडपेक्षा मला लोकल दुकानातले कपडे फिटिंगला येतात.’’ ‘‘स्ट्रीट शॉपिंगमधले कपडे मला नीट बसतात.’’ असे अनेक संवाद आपल्या कानावर खूपदा पडत असतात. आपण कपडय़ांच्या खरेदीला गेल्यावर अनेकदा कपडय़ांवरची साइज बघूनच कपडे घेतो, कारण साइज न बघता उत्साहाच्या भरात केलेल्या शॉपिंगचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. कित्येकदा एखाद्या  ब्रँडची अमुक अमुक एक साइज आपल्याला येते, पण तीच साइज दुसऱ्या ब्रँडचे कपडे घेतल्यावर येतेच असं होत नाही. काहींना तर कित्येकदा ब्रँडपेक्षा लोकल दुकानातून, स्ट्रीट शॉपमधून घेतलेले कपडे अगदी बरोबर मापात बसतात; पण असं का होतं?

‘मापं काढणं’ या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याकडे वेगळा असला तरी सध्या कपडय़ांच्या बाबतीत शब्दश: मापं काढूनच खरेदी करावी लागते आहे. कित्येकदा कपडय़ांवरचे साइजचे लेबल बघूनही गोंधळाशिवाय हाती काहीच लागत नाही. याचं कारण आहे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे ‘साइज चार्ट’. प्रत्येक देशात तेथील स्त्री आणि पुरुष यांच्या मापांमधील सरासरी काढून त्यानुसार एक ठरावीक चार्ट तयार केला जातो तो हा ‘साइज चार्ट’. त्या देशातील नागरिकांच्या  शरीरप्रकारानुसार बस्टलाइन, वेस्टलाइन, हिपलाइन, उंची, खांदे यांची मापं त्यात नमूद केलेली असतात. हा चार्ट त्या देशातील प्रत्येक ब्रँड्स, डिझायनर, गल्लीबोळातील छोटय़ा दुकानदारांपर्यंत सगळ्यांसाठी एकसारखा असतो. त्यानुसार कपडय़ांचे पॅटर्न बनतात. अर्थात कधी तरी ग्राहकाच्या वैयक्तिक मापानुसार तयार कपडय़ांमध्ये काही जुजबी बदल करावे लागतात. सर्वात प्रथम युरोप आणि अमेरिका यांनी साइज चार्टनुसार कपडे बनवायला सुरुवात केली. त्यानंतर चीन, जपान, रशिया यांच्यासोबत अगदी इंडोनेशियामध्येही त्या देशातील स्त्रियांच्या शरीरयष्टीनुसार बनविलेले वैयक्तिक साइज चार्ट वापरले जातात; पण अजूनही भारतात मात्र अशा प्रकारचा चार्ट करायची गरज कोणालाही भासली नाही. यामागे अनेक कारणं आहेत. याविषयी अनेक वर्ष गारमेंट आणि डिझाईन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे राकेश कोळम्बे सांगतात, ‘‘आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण अनेक वर्ष अगदी आजही कपडे आपल्या मापाप्रमाणे शिवून घेतो. आपण काही वर्षांपासूनच रेडिमेड कपडे घ्यायला आणि घालायला सुरुवात केली. बाजारात कितीही रेडिमेड कुर्ते, पंजाबी सूट, ब्लाऊजचे प्रकार आले असले तरी आपला भर अजूनही मापाप्रमाणेच कपडे शिवून घेण्याकडे जास्त आहे. या मुख्य कारणामुळे भारतीय ‘साइज चार्ट’मध्ये फरक जाणवतो आणि आपल्याला कपडे नीट फिटिंगला येत नाहीत. य़ातलं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये अनेकदा कपडय़ांच्या जाहिरातींमध्ये परदेशी मॉडेल दिसतात आणि त्यांना बघून आपण ते कपडे घेतो. ते कपडे दुसऱ्या देशातील साइज चार्टनुसार बनवलेले असल्यामुळे ते आपल्याला नीट बसत नाहीत. अनेक ब्रँडच असं करण्यामागे कारण आहे की, त्यांना त्यांचा ब्रँड फक्त आपल्या देशापुरता मर्यादित ठेवायचा नसतो. दुसऱ्या देशातही व्यवसाय करण्याचा दृष्टिकोनातून हे साइज चार्ट वापरले जातात. जर तुम्ही कोणत्याही ब्रँडची जीन्स विकत घेणार असाल आणि तुमची कंबर ३० असेल तर नेहमी २ इंच मोठी म्हणजेच ३२ साइजची जीन्स तुम्ही घ्यायला हवी.’’

भारतीयांची एकूणच शरीरयष्टी ही बाकीच्या देशातील नागरिकांपेक्षा खूप वेगळी आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शरीरयष्टीचे लोक राहतात आणि या एका कारणामुळेसुद्धा साइजचा प्रॉब्लेम जाणवतो. याबद्दल २०१६ साली वेंडेल रॉड्रिक या फॅशन डिझाईनरने पहिलावहिला भारतीय स्त्रियांच्या देहरचनेला अनुसरून साइजचा तक्ता तयार केला होता. भारतामध्ये अशा प्रकारचा तक्ता तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. वेंडेल रॉड्रिक सांगतात, ‘‘भारताच्या प्रत्येक भागातील स्त्रियांची शरीरयष्टी वेगवेगळी आहे. त्यातही बहुतेकदा भारतीय स्त्रियांच्या शरीराचे कमरेवरचा (अपर बॉडी) आणि कमरेखाली पायापर्यंत (लोअर बॉडी) असे दोन भाग केले असता, दोन्हींची मापे वेगवेगळी असतात. त्यामुळे अपर बॉडीला स्मॉल साइज योग्य असेल, तर लोअर बॉडीला एम साइज बरोबर बसते.’’ स्त्रियांमध्ये पेअर किंवा ओव्हरग्लास बॉडीशेप आपल्याकडे अधिक पाहिला जातो; पण युरोपीय आणि अमेरिकन महिलांमध्ये लीन (आयताकृती) बॉडीशेप प्रामुख्याने पाहिला जातो. ज्यामध्ये अपरबॉडी आणि लोअरबॉडी यात फारसा फरक नसतो. कित्येकदा परदेशी ब्रँडचे कपडे घातल्यानंतर विशेषत: पँट्स भारतीय स्त्रियांना त्यांच्या मांडय़ा जाड असल्याचं वाटत राहतं. कारण नकळतपणे ब्रँड्स किंवा डिझायनर्स भारतीय स्त्रियांना या लीन बॉडीटाईपमध्ये बसविण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय शरीरयष्टीनुसार मात्र मॉडेल्स आणि सामान्य स्त्रिया यांच्या हिप्समध्ये तितकासा फरक नसल्याचं वेंडेल रॉड्रिक सांगतात. थोडक्यात योग्य साइज चार्ट वापरल्यास सध्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणाबद्दल असलेला अपराधीपणा कित्येक अंशी कमी होऊ  शकतो, असा विश्वासही वेंडेल रॉड्रिक यांनी व्यक्त केला आहे. वेंडेलने भारतीय स्त्रियांसाठी कपडे तयार करताना विशिष्ट साइज चार्टची गरज आहे हे ओळखून १९८८ पासूनच त्यावर काम सुरू केलं होतं. बरीच वर्षे ते त्यांच्या ब्रँडअंतर्गत कलेक्शन्स तयार करताना स्वत: तयार केलेला भारतीय साइज चार्ट वापरत आहेत. या चार्टमुळे कलेक्शन्सवर काम करणं सोप्पं असल्याचे ते सांगतात आणि ‘‘ब्रँड्स, डिझायनर्सनी इंडियन बॉडी चार्ट वापरावा की नाही, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे; पण त्यांनी हे करावं असं वाटत असेल, तर ग्राहकांनी त्यांच्याकडे अशी मागणी केली पाहिजे,’’ असंही त्यांचं मत आहे.

आपल्याकडे बॉटम्स आणि टॉपमध्ये एक-दोन ठरावीक साइजचा वापर जास्तीत  जास्त होतो. याविषयी ‘बेला फ्यूजन ब्लेन्डिंग ब्युटीट आणि ऑइल अँड ग्रीस अप्रेरीयल’च्या फॅशन डिझायनर प्रज्ञा कोल्हे सांगतात, ‘‘भारतामध्ये बॉटम्समध्ये सर्वाधिक ३०, ३२, ३४, ३६ अशा साइजचा जास्त वापर होतो, तर टॉप्समध्ये एल, एक्सएल, डबल एक्सएल या साइजचा जास्त वापर होतो, कारण जास्तीत जास्त भारतीयांची शरीरयष्टी या साइजमध्ये फिट बसणारी असते. वेगवेगळ्या ठिकाणी शरीरयष्टी थोडय़ा फार फरकाने अशीच असते आणि म्हणून परदेशी ब्रँडचे कपडे आपल्याला नेहमीच बरोबर फिटिंगला येतील असं होत नाही. या उलट लोकल दुकानातून घेतलेले कपडे फिटिंगला नीट येतात, कारण ते तिकडच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या शरीरयष्टीचा विचार करून साइज चार्ट वापरतात. वेगवेगळ्या ब्रँडच्या साइज चार्टमध्येही खूप जास्त तफावत असते असे नाही. थोडय़ा फार फरकाने २-४ इंचांनीच आपल्याला फरक जाणवतो.’’ काही महिन्यांपूर्वीच ‘द यलो बटण’ हा रेडिमेड गारमेंटचा ब्रँड सुरू करणारी नूपुरा भाबल सांगते, ‘‘माझ्या ‘द यलो बटण’ ब्रँडअंतर्गत मी स्त्री आणि पुरुष अशा दोघांसाठीही कपडे बनवते. मी ब्रँड सुरू करताना कोणत्याही मोठा मार्केट सव्‍‌र्हे केला नाही. उलट मी लहान टेलर जो साइज चार्ट वापरतात त्याचाच वापर करून कपडे डिझाईन करायला सुरुवात केली. मी अजूनही ऑर्डरचे कपडे हे लोकल टेलरकडूनच शिवून घेते. आताच्या काळात स्त्रिया खूप हेल्दी असल्यामुळे एक्सएल आणि डबल एक्सएल या साइजचे कपडे जास्त विकले जातात.’’

सध्या तर आपला खरेदीचा ओघ ऑनलाइनकडे वळला आहे. तिथेही अनेकदा साइज या एकाच गोष्टीमुळे आपली अडचण होते आणि मग आवडलेला एकच ड्रेस कमीत कमी एकदा तरी पुन्हा मागवला लागतो. दुकानात किमान कपडे घालून पाहायला ट्रायल रूम असतात; पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये आधीच साइजचा गोंधळ, मग घरी पार्सल आल्यावर कपडय़ांचं ट्रायल घेणं, त्यानंतर ते बदलण्यासाठी खटाटोप करणं हे सर्व सोपस्कार करावे लागतात; परंतु आता अनेक मोठमोठय़ा ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरती व्यवस्थित साइज चार्ट दिलेला असतो. अनेकदा गारमेंट्सच्या चित्राचा वापर करून साइज चार्टमध्ये नमूद केलेली वेस्ट साईज, लेन्थ म्हणजे काय हेसुद्धा दाखवलं जातं. फॅबइंडिया, आयलोगो, तुलसत्त्व, मायंत्रासारख्या शॉपिंग साइट्सवर तुम्हाला नीट साइज चार्ट बघायला मिळतात आणि त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगसुद्धा सोप्पी होते. त्यामुळे साइजचा किंवा मापातला गोंधळ कमी करायचा असेल तर या साइज चार्टच्या मदतीने आपलीच मापं आपण नोंदवून ठेवायला हवीत, जेणेकरून आपला गोंधळ कमी होईल. ब्रँडेड कपडय़ांसाठी तरी हा फंडा अवलंबला तर काही दिवसांमध्ये तुम्ही स्वत:ला या मापात बसवून आनंदाने कपडे खरेदी करू शकाल. शेवटी ही इंचा-इंचाची लढाई जिंकोयलाच हवी!