गायत्री हसबनीस

नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली, ज्यात स्वीडनची एक तरुणी चक्क संस्कृतमधून संभाषण करताना दिसते आहे. ही गोष्ट अलीकडची असली तरी परदेशी भाषा शिकणं ही संकल्पना वाढायला लागली सात ते आठ वर्षांपूर्वी. कॉलेज सर्कलमध्ये कोणीतरी कुठलीतरी परदेशी भाषा शिकताना दिसलं की आपले कान टवकारतात. आपल्याला त्या व्यक्तीचं कौतुक वाटतं. कारण परदेशी भाषा शिकणं व शिकवणं सोप्पं काम नाही. सध्या वेगवेगळ्या कठीण भाषा शिकण्यावर तरुणांचा भर आहे. सध्या अनेक शाळांमधूनच एखादी बाहेरची भाषा शिक्षणासाठी असल्याकारणाने मुलांना त्याच वयात गोडी लागते. मात्र अनेक भाषांमधून अमूक एक भाषा शिकण्याच्या निर्णयाप्रत तरुण कसे येतात? एकाच भाषेपुरती मर्यादित न राहता वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकणारे तरुणही वाढतायेत. त्याचे कारण हे आजच्या नोकरी-व्यवसायात दडलेले आहे, असे या वेगवेगळ्या भाषा शिकवणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे.

‘परदेशी भाषा ही चोवीस तास कोणाकडून वापरली जात असेल किंवा बोलण्यातून येत असेल तर त्याची काही विशिष्ट कारणे आहेत. वस्तुत कोणत्याही परदेशी भाषेचा वापर हा कोणत्यातरी महत्त्वाच्या कारणाव्यतिरिक्त होत नाही. त्याची उदाहरणे आहेत व ती लक्षात घेता तरुणांमध्ये परदेशी भाषेचा वापर हा नोकरी-व्यवासायाच्या दृष्टिकोनातूच के ला जातो’, असं मतं चायनीज भाषा शिकवणाऱ्या स्नेहल जोशीने सांगितले. परदेशी कंपनीत नोकरी करताना आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी बोलायचे असेल तर त्या देशातली भाषा शिकावीच लागते. त्यामुळे ज्यांना परदेशातच नोकरीसाठी जायचे आहे त्यांच्यासाठी ती भाषा येणं आणि सहजपणे बोलली जाणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. म्हणून हल्ली महाविद्यालयात असतानाच आपल्याला हवी असलेली भाषा शिकणं, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्या भाषेत बोलणं हे जाणीवपूर्वक केलं जातं, असं ती म्हणते.

ज्या भाषेला करिअरच्या दृष्टीने वाव आहे ती भाषा महत्त्वाची ठरते. मग ज्या भाषेचं महत्त्व अधिक त्या भाषेचे बोलकरी जास्त. कुठल्या भाषेला किती महत्त्व आहे हे कोण ठरवतं? तर परदेशी भाषा शिकवणाऱ्या नानाविध संस्थांशी बोलल्यानंतर ज्या व्यवसायात किंवा क्षेत्रात आपल्याला शिरायचं आहे त्यात कोणता देश अग्रेसर आहे, तिथे जाण्यासाठी कुठली भाषा शिकावी लागेल हे लक्षात घेऊन त्यानुसार भाषेची निवड केली जाते, हे लक्षात येतं. कायद्यात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पॅनिश शिकणे गरजेचे असते तर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा येणे फायदेशीर ठरते. कारण, जर्मनीसारखा देश टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. चीनसारखा देश व्यापारात तर आता जपानही टेक्नॉलॉजी आणि इतर क्षेत्रातही सक्षम ठरला आहे. त्यामुळे प्रामुख्याने स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, जर्मनी या भाषा हल्ली करिअरच्या दृष्टिकोनातून जास्त शिकल्या जातात. ज्या देशात नोक रीसाठी जातो आहोत, ती भाषा इंटरव्ह्यू देतानाच तुम्हाला अवगत असेल तर तो प्लस पॉईंट मानला जातो. या सगळ्या गोष्टींमुळेच सध्या वेगवेगळ्या भाषा शिकण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.

एखादी भाषा शिकण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, याचाही विचार मुलांकडून केला जातो. चायनीज भाषेची लिपी खूप कठीण असते पण इतर भाषांची त्या तुलनेत सोपी असते. पूर्वीप्रमाणे केवळ अनुवादक किंवा इंटरप्रिटर म्हणून काम करायचे असेल तरच या भाषा शिकल्या जातात असे नाही. आंतरराष्ट्रीय दूतावासात नोकरी करायची असेल तर परदेशी भाषांना नेहमीच महत्त्व आहे. या संधीमुळे तिथे कायमस्वरूपी सेटलही होता येते त्यामुळे तरुणांच्या दृष्टीने हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

‘परदेशी भाषेत वाव आहे पण विद्यार्थ्यांला त्या भाषेची आवड असून फायदा नाही तर ती व्यक्ती एखादी भाषा आत्मसात करण्यासाठी किती प्रयत्न करते, रोजच्या व्यवहारातही त्याचा किती वापर करते हेही महत्त्वाचे आहे. अनेकदा केवळ मित्रमैत्रिणी शिकतात म्हणून अनेक मुलं शिकण्यासाठी येतात मात्र प्रत्यक्षात कुठलीही परदेशी भाषा शिकायची तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो. दिवसातून निदान तीन-चार तास ती भाषा बोलली गेली पाहिजे. म्हणूनच अनेकदा मुलं आपापल्या सर्कलमध्ये त्या त्या भाषेत बोलताना दिसतात. आपण जी भाषा शिकतो त्याचे प्रत्यक्षात अ‍ॅप्लिकेशन व्हायला हवे’, असे मत जॅपनीज भाषा शिकवत असलेले प्रदीप बापट यांनी व्यक्त केले. त्यांनी स्वत: अशी युक्ती केली की क्लासमधील मुलं व्हॉटस्अ‍ॅपवरही जॅपनीज भाषेत बोलतील त्यामुळे त्यांच्या क्लासच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर सगळे जॅपनीजमध्येच टाईप करतात व तीच भाषा अवलंबली जाते. ज्यांच्याजवळ एखादी परदेशी भाषा शिकण्यासाठीचा प्रबळ हेतू आहे तेच दैनंदिन आयुष्यात त्या भाषेचा वापर करतात. काहींना आम्ही परदेशी भाषा शिकतोय असा अहंगंड तर मला परदेशी भाषा येत नाही म्हणून न्यूनगंडही येतो पण या दोन्हीपेक्षा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा व इच्छा या तीन गोष्टी असलेले तरुणच परदेशी भाषा शिकताना दिसतात. चिनी भाषा शिकून चीनमध्ये सध्या स्कॉलरशिपसाठी वास्तव्याला असलेली अंकिता वालावलकर सांगते की मला चीनी भाषा शिकायचीच होती, मला आवडही होती. मुख्य म्हणजे मी लॉ केलंय त्यामुळे माझ्याकडे चीनी भाषेचे ज्ञान असेल तर मला तिकडच्या कंपनीत त्यांच्यासाठी वकील म्हणून किंवा त्यांची कायद्याची कामे सांभाळण्यासाठी काम मिळेल असा विश्वास मला होता, त्यामुळे मी आधीच प्रयत्नशील होते. चायना हा देश निवडला कारण तो शेजारी देश आहे. व्यापाराच्या व मार्केटच्या दृष्टीने अव्वल आहे. माझा उद्देश पहिल्यापासूनच वेगळाच होता म्हणून हेच करायचे हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. फ्रेंच भाषा शिकलेल्या आदित्य वडगावकर म्हणतो त्याला टुरिझमच्या दृष्टीने फ्रेंच भाषेचा उपयोग झाला. तो अनेक टूर नेतो. त्याला फ्रेंच बोलता येतं त्यामुळे तो इटलीसारख्या देशात टूर नेतो. ‘मी एकदा परदेशात स्कूबा डायविंगला गेलेलो तर तिथे काहींना फ्रेंच आणि काहींना इंग्रजी येत होतं. त्यामुळे मला दोन्हींचा उपयोग तिथे करता आला. परदेशात संवादाचं माध्यम किंवा मदत म्हणून भाषेला महत्त्व आहे’, असं त्याने स्पष्ट केलं.

सध्या तरुणाई परदेशी भाषांकडे वळते आहे त्यामागे चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरतं आहे. तरुणांमध्ये आज मोठय़ा प्रमाणात इंटरनेट आणि सिनेमा दोन्ही असल्याने भाषा शिकता येते, संस्कृती कळते. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप स्टेटसवर परदेशी भाषा अवलंबायची हौस प्रचंड असल्याने ती भाषा समाजमाध्यमांतून प्रसार होते आहे. त्याने परदेशी ओळखीही वाढतात. तुम्ही जितकी ती भाषा आत्मसात कराल तितकीच ती भाषा लोकप्रिय होते आणि अनेकजण त्याकडे वळतात हे सत्य असले तरी हल्ली तरुणाई याबाबतीतही चोखंदळ झाली आहे. नोकरी-व्यवसायासाठी म्हणून जे जे आवश्यक ते करणारी ही पिढी त्याचदृष्टीने परदेशी भाषा निवडून ती आत्मसात करत आपली भाषेची आवड आणि करिअरची सांगड यांचा मेळ घालताना दिसते आहे.