13 December 2018

News Flash

‘प्रभाव’रंग

‘प्रभाव’ या संकल्पनेचा मुळापासून आणि तळापासून अशा वेळी विचार करावासा वाटतो.

सतत कोणाच्या न कोणाच्या प्रभावाखाली असणं हा मानवी स्वभाव आहे. तरुणाईच्या बाबतीत विचार करता रंग माझा वेगळा हे दाखवण्याच्या नादात अनेक व्यक्ती-घटनांचा प्रभाव त्यांच्यावर होत असतो. एकाच वेळी अनेक व्यक्तींच्या स्वभावाचा, कृतीचा, विचारांचा, व्यक्तिमत्त्वाचा असा नानारंगी प्रभाव तरुण मनांवर होत असतो. मात्र कोणाचा प्रभाव असणं हे चांगलं की वाईट?, याचा सारासार विचार व्हायला हवा.

जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘काजळमाया’ या कथासंग्रहाच्या सुरुवातीला थोरो या विचारवंताचं एक सुंदर वाक्य आहे, ‘इफ अ मॅन कॅनॉट कीप पेस विथ हिज कंपॅनिअन्स, परहॅप्स इट इज बिकॉज ही हिअर्स अ डिफरंट ड्रमर’. काही वाक्य ही एकाच वेळी तत्कालीन आणि त्याच वेळी कालातीत वाटतात असं हे एक वाक्य. काही जाणिवा असतात ज्यांना भावनेचा ठाशीव आणि ठरावीक रंग इच्छा असूनही घेता येत नाही. त्या जाणिवांचं थोडंसं क्लोजर न मिळालेल्या प्रश्नासारखं होऊन बसलेलं असतं. बाहेरून पाहणाऱ्याला जरी ती एक हतबलता वाटत असली तरी ती केवळ तितकीच नसते. हतबलतेच्या पुढे ते एक तटस्थ सत्य असतं ज्याची वाच्यता करता येत नाही किंवा ती करण्यास मन धजावत नाही. वरच्या वाक्यातल्या ड्रमचे पडसाद ऐकणारा एकाच वेळी कोणी तरी अवलिया असल्याचं भासवतो आणि त्याच वेळी त्याचं मुरलेलं एकटेपणही त्या वाक्याचा खोलवर अर्थ समजून घेताना आपल्याला खिळवून ठेवतं. मुळात त्या वेगळ्या असलेल्या कोणाला तरी मध्यवर्ती ठेवून त्याला मोठं केलं गेलंय यात. पण त्यामागे असलेलं कारण हे अगदीच उथळ वाटतं. आमच्या आजच्या भाषेत लेम. कारण, मी माझ्याच बरोबरीच्या इतरांच्या वेगाशी माझ्या वेगाला जुळवून न घेऊ  शकणं ही कुठे तरी माझीच कमतरता नसते काय? आपण या पूर्ण तार्किक प्रश्नाला डावलून वरच्या विधानाचा विचार नाही करू शकत. ‘प्रभाव’ या संकल्पनेचा मुळापासून आणि तळापासून अशा वेळी विचार करावासा वाटतो. कोणाचा ना कोणाचा प्रभाव असणं ही जगण्यातली एक अत्यंत स्वाभाविक बाब आहे आणि आमच्या वयात आमच्याच वयातल्यांचे पटकन प्रभाव पडणं ही त्याहूनही स्वाभाविक. पण स्वाभाविकतेतल्या दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा. माझ्याच वयाच्यांचा माझ्यावर असणारा प्रभाव यात आनंद आहे, गांभीर्य आहे, प्रसंगी परावलंबित्व आहे आणि समृद्ध होणंही आहेच. मग प्रभावाचा नेमका रंग काय?

कॉलेजच्या काळात जिथे अर्धवट रुजलेल्या स्वप्नांचा, आकांक्षांचा सगळ्या बाजूंनी विचार न होता कुठे तरी परप्रेरणेतून इतरांसारखं काही तरी होण्याचं ठरवून आपल्या ध्येयांचे मनोरे उभारलेले असतात तेव्हा खूप काही तरी करून दाखवायचा उत्साह असतो. कुठे तरी दिशाहीन आणि कुठे तरी प्रभावातून पुढे नेणारा. मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागप्रमुख डॉ. नीलिमा गजभीये यांनी एन.एस.एस.मध्ये काम करणाऱ्या तरुणांवर असणाऱ्या प्रभावाबाबतचा त्यांचा अनुभव सांगितला. ‘अकरावी-बारावीत किंवा एफवायलाही मुलं जेव्हा एन.एस.एस.साठी काम करण्याची इच्छा आहे असं सांगतात तेव्हा बऱ्याचदा एन.एस.एस. नेमकं काय आहे? कशासाठी आहे याची त्यांना माहिती नसते. बऱ्याचदा मुलं येतात तीच सीनिअर मित्रमैत्रिणींचे अनुभव ऐकून. थोडक्यात त्यांच्या प्रभावांतून. पण एकदा मुलं इथल्या कामात रुळली की जसं जमेल तसं शिक्षण, पर्यावरण, लिंगसंवेदीकरण (जेंडर सेन्सिटायझेशन) या क्षेत्रांशी संबंधित त्यांच्या वयाला साजेशा छोटय़ा छोटय़ा जबाबदाऱ्या उचलतात आणि निभावतात. पुढे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यातले ४०-५० टक्के जण वेगवेगळ्या सामाजिक संस्थांबरोबर आपलं करिअर आणि नोकरी सांभाळून जमेल तितकं काम करतात. सुसायडल टेंडन्सीज असलेल्यांचं समुपदेशन करण्यासाठी ज्या उपलब्ध हेल्पलाइन्स असतात त्याचाही भाग काही विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांनी साधारण चाळिशीनंतर व्यावसायिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्थैर्य आल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेण्याचा विचार असल्याचंही सांगितलं आहे’, असं त्या म्हणाल्या. ‘पिअर इन्फ्लूअन्स’चा सकारात्मक परिणाम साधणारी ही एक प्रगल्भ जाणीव आहे.

तर याला पूर्णत: बगल देणारी बाजू लक्षात आली ती मानसोपचारतज्ज्ञ सोनल दळवी यांच्याशी बोलताना. पिअर इन्फ्लूअन्स म्हणजेच समवयीनांचा प्रभाव हा प्रत्येक पिढीचा मुद्दा झाला. त्यामुळे कुठे तरी पिअर इन्फ्लूअन्सच्या पलीकडला तरुणाईवरचा प्रभाव जो मुळाशी कुठे तरी तरुणाईच्याच तरुणाईवर असलेल्या प्रभावाशी जोडला गेलेला आहे. त्याविषयी सांगताना, आजच्या तरुणांवर सगळ्यात जास्त प्रभाव आहे तो सोशल मीडियाचा. सोशल मीडियातही व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभाव नसून सध्या तरुणांना सगळ्यात जास्त भुरळ पडलीय इंस्टाग्रामची. इंस्टाग्रामवर सतत फोटो पोस्ट करण्याचा रीच्युअलिस्टिक चाळा त्यांना सध्या सर्वाधिक हवं असणारं सोशल व्हॅलिडेशन मिळवून देतो. तरुण ज्यांना फॉलो करतात त्यातले बहुतांशी सेलिब्रिटीजच असतात आणि त्यांचे लुक्स, फिगर, बॉडीबिल्डिंग याविषयी केवळ उत्सुकतेपोटी त्यांना फॉलो करण्याकडे तरुणाईचा कल आहे. मी कसा ट्रेंडी आहे, माझा ग्रुप कसा हॅपनिंग आहे हे दाखवण्यासाठी आजचे तरुण सी लिंक साइड रेस्तरॉज, ट्रेंडी बार्स, टाऊ न साइडला मूव्हीज बघायला जाऊन तिथे हमखास सेल्फीज काढून ते इंस्टाग्रामवर पोस्ट करून सतत अप्रूव्हल मिळवताना दिसतात, असं दळवी म्हणतात. आजच्या तरुणांसाठी स्वाभिमान ही आतून वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट राहिलेली नसून त्यांचं सोशल मीडियावर सक्रिय असणं, त्यातही इतर आपला हेवा करतील अशा तऱ्हेने सक्रिय असणं याचा त्यांच्या स्वाभिमानाशी थेट संबंध आहे. सोशल मीडियावर तुम्ही खरे कसे आहात हे तुम्ही दाखवत नसता पण त्याचा तुमच्या खऱ्या असण्यावर मात्र जबरदस्त परिणाम होत असतो, असं त्या म्हणतात. आज प्रत्येक लाइकला किंमत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपण इतरांना आवडत नाही या भावनेतून उद्भवणाऱ्या नैराश्याच्या तरुणांच्या केसेस सर्वाधिक आहेत. मात्र, ज्या संख्येने तरुण सोशल मीडियावर सक्रिय असतात त्या तुलनेत सामाजिक समस्यांविषयी काम करणारे उणेपुरेच. ज्या कळकळीने आधीच्या पिढीला सामाजिक कार्याबद्दल तळमळ वाटायची तशी ती आताच्या पिढीला वाटत नाही. याचं मुख्य कारण त्यांना आधीपासून मिळालेलं आर्थिक स्थैर्य. आर्थिकदृष्टय़ा कशाचीही ददात नाही हे जसं वास्तव आहे तसंच त्यांच्या मानसिक ताणतणावांकडे तितक्याच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कुठेही त्यांचा स्वाभिमान न दुखावता, त्यांना कमी न लेखता त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, ही गरजही त्यांनी बोलून दाखवली.

प्रभाव चांगला असो अथवा वाईट. कुठलाही प्रभाव हे काही काळ स्वयंनियंत्रण कुशीत घेऊ  पाहणारं मृगजळच. जसा सूर्यप्रकाश आच्छादून टाकणाऱ्या मळभाचा नेमका रंग सांगता येत नाही तसा प्रभावाचाही नेमका रंग सांगता येत नाही. तूर्तास आपण त्याला मृगजळी रंग म्हणू. गडद आभास निर्माण करणारा. आपल्या हातात शक्य तितकं प्रभावांना वाचा आणि डोळे होऊ  न देणं इतकंच आहे. आपले रंग आपण आपल्या परीने पाहायचे आणि स्वयंप्रेरणेतून स्वत:ची भाषा हळूहळू का होईना शोधत जायची.

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:40 am

Web Title: human nature personality effect young minds