ती एकटीच निघाली आहे. तेही सायकलवरून. सुसाट वेगाने जाणाऱ्या गाडय़ांच्या वेगाने ती उडून जाईल की काय अशा वेगवान महामार्गावर तिचा वेग मात्र नियंत्रित आहे. कारण तिची काही त्यांच्याशी स्पर्धा नाही. जाण्याचं ठिकाण निश्चित आहे. पण वाटेतली ठिकाणं तिच्या रोजच्या गतीवर अवलंबून आहेत. दिवसाकाठी ८०-९० किलोमीटर सायकल दामटतेय ती. काही मुक्कामाची ठिकाणं ठरली आहेत. पण सगळंच काही त्याबरहुकूम होईल असं नाही.
कदाचित एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचेल, मग अजून दिवस मावळायचा असेल, म्हणून थोडे पुढे जाऊन मुक्काम करायची तिची तयारी आहेच. तसं झालंदेखील परवाच. पण झालाच उशीर एखाद्या ठिकाणी तर मात्र थोडा जोर लावावा लागतोच. अर्थात त्याचीदेखील तयारी आहेच तिची. म्हणूनच असं उटपटांग उद्योग करतेय ती..
सारा बोऱ्याबिस्तरा तिच्या पाठीवर, म्हणजेच सायकलच्या कॅरिअरवर लादलाय. तब्बल १७ किलो. आणि सायकलचं वजन १३-१४ किलो. हे सारं घेऊन ती स्वच्छंद भटकतेय. लोकांना भेटते. त्यांच्याशी गप्पा मारते. भलेबुरे सारेच अनुभव गाठीशी बांधतेय. कोणी प्रेमाने वागवतंय तर कोणी तुसडेपणा करण्यासदेखील कमी करत नाही. पण तुलनेने चांगले अनुभवच इतके आहेत की दोन-चार वाईट गोष्टींचं अस्तित्व आपोआपच पुसून गेलंय.
पण एका अनुभवानं मात्र तिला खूपच छळलंय. माणसाच्या हाती असलेल्या गाडीचा अमर्याद वेग तिला हा अनुभव देतोय. महामार्गावरील त्या वेगाने घेतलेले प्राण्यांचे बळी. साप, मांजर तर अगदी कॉमनच. पण एकदा तर चक्क एका किलोमीटरमध्ये तीन माकडांनाचा मानवाच्या या वेगाने उडवलं होतं. जसं जमेल तसं ती त्यांची कलेवरं रस्त्यातून दूर करतेय.
पण मग ती एकटय़ानेच का निघालीय? तिला काही विक्रम करायचा आहे का? आला ना तुमच्या डोक्यात प्रश्न. पण तसं तर अजिबातच नाही. खरं तर हे बाळकडू तिला घरूनच मिळालंय. वडिलांकडूनच. भारताचा कानाकोपरा सायकलवरून भटकलेल्या बाबांचा एकंदरीतच अ‍ॅप्रोच तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यातच मागच्या वर्षी तिला रुबिना भेटली. फ्रान्समधून आलेली. तिच्याच घरी मुक्कामाला होती. भारत भटकत होती सायकलवरून. इंग्लिशदेखील येत नव्हतं तिला नीट. पण दोन-अडीच र्वष अशीच भटकतेय ती. मग काय निमित्तच मिळालं. तशी ती स्वत:देखील भरपूर भटकलीय सायकलवरून. लेह ते खारदुंगला काय, पनवेल ते ओरिसा आणि बरेच काही. पण ते सारं ग्रुपमध्ये.
आता तिला स्वत:ला अजमवायचंय. स्वत:च्या मर्यादा, क्षमता अजमावून पाहायच्या आहेत. सगळ्या बाउंड्रीज क्रॉस करायच्या आहेत. स्वत:भोवती तयार झालेला टिपिकल कम्फर्ट झोन तोडायचा आहे. विक्रम वगैरे करणारे तर अनेक असतात. त्याची पद्धत ठरलेली असते. पण हिला हवाय प्रवास. तो महत्त्वाचा. नकारात्मक सूर तर असतातच, पण घरून निघेपर्यंत. एकदा ते सोडले की मग हा प्रवासच तुमचा साथीदार. वाटेत घाटमार्ग आहेत, तर कुठे लांबलचक पसरलेली सडक. माणसंदेखील अशीच असतात. पण ती जिद्दीने सारं पार करतेय.
रोजच्या जगण्याचा वेग आणि रेटा इतका वाढला असताना असं काहीतरी करायला लेको जिगर लागते. ती तिच्याकडे नक्कीच आहे. २४ डिसेंबरला ती पनवेलवरून निघालीय. आतापर्यंत तर तिने गोवादेखील पार केलं असेल. अशीच जात राहिली तर, १३-१४ जानेवारीपर्यंत कन्याकुमारीला पोहोचले. तेव्हा तिला ‘ती’ सापडली असेल कदाचित. स्वत:ला अजमावतानाचा आनंद आणि कष्ट दोन्ही मिळाले असतील तिला. ‘ती’ – प्रिसिलिया मदन.
हे सारं तेव्हा नक्कीच सापडलेलं असेल याची तिला स्वत:लादेखील खात्री आहे. त्यामुळेच ती म्हणतेय ‘आय प्रिसिलिया राइड फॉर प्राइड’.

तिच्या ब्लॉगची लिंक –
http://www.Prisiliyamadan.blogspot.in