17 January 2019

News Flash

भारताची पहिली ‘ट्रान्सक्वीन’ निताशा बिस्वास

पहिल्यावहिल्या भारतीय ‘ट्रान्सक्वीन’चा मुकूट तिने पटकावला.

‘अडचणी कोणाला नसतात, पण अडचणींवर मात करूनही जो कृतज्ञताभाव आपल्यात उरतो तोच आपल्याला एक चांगलं माणूस बनवतो’, असं उत्तर तिने दिलं आणि ती जिंकली. पहिल्यावहिल्या भारतीय ‘ट्रान्सक्वीन’चा मुकूट तिने पटकावला. तीच निताशा बिस्वास.

तृतीयपंथी माणसांना आपण नेहमीच कमी किंवा कमी म्हणण्यापेक्षा केवळ ते ‘तृतीयपंथी’ आहेत म्हणून आपण त्यांना आपल्यापासून दूर लोटत आलो आहोत. ‘जेन्डर इज जस्ट अ क्रिएशन ऑफ ह्य़ुमन’ असं आपण नेहमी म्हणतो, पण आपल्या विचारांचं आचारामध्ये रूपांतर करायला मात्र आपण विसरतो. तृतीयपंथियांना खरी गरज असते ती म्हणजे त्यांचे अस्तित्व, ओळख मान्य करून त्यांना आपलंसं करून घेण्याची.. समाजातील विविध स्तरांवरील लोकांकडून मिळालेला पाठिंबा, स्वीकार हा त्यांना उमेद देतो, जगण्याची एक नवीन दिशा देतो.

ते जे आहेत त्यांना तसं स्वीकारणं हे केवळ समाजाकडूनच नव्हे तर कुटूंबाकडूनही होणं गरजेचं असतं. निताशाच्या बाबतीत घरातूनच तो पाठिंबा तिला मिळाला. म्हणूनच निताशा बिस्वास ‘ट्रान्सक्वीन’ होऊ  शकली. तिचा आतापर्यंतचा प्रवास हा म्हणावा तितका सोपा नक्कीच नव्हता. कोलकात्यात झालेले शालेय शिक्षण व व्यवस्थापनातील पदवी शिक्षण घेतल्यानंतर फॅशन क्षेत्रात उच्चपदवी घेण्यासाठी ती दिल्लीत गेली. तिथून खऱ्या अर्थाने तिने भरारी घेतली. ‘मी या क्षेत्रात येण्यासाठी माझे वडील राजी नव्हते, पण मला माहिती होतं की मला काय करायचं आहे आणि त्या दिशेने माझी वाटचाल सुरू होती. काही काळाने मग त्यांनी मला परवानगी दिली. माझ्या मॉडेलिंगची सुरुवात खरंतर बंगाली चित्रपटांपासून झाली. मी तिथे स्टायलिस्टचं काम करायचे. आणि ते करता करता मी याच क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं. यासाठी खूप जिद्द आणि चिकाटीने मेहनत केली आणि आता एक स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान आहे’, असं निताशाने सांगितलं.

यश मिळवत असताना आणि ते मिळाल्यानंतर आपल्याला समाजाकडून जी वागणूक मिळते त्यात फार फरक पडतो. ‘ट्रान्सक्वीन’ व्हायच्या आधी मी फक्त काम करायचे, पण आता माझ्यासाठी सगळेच दरवाजे उघडले आहेत, नवनवीन संधी मिळत आहेत. सगळ्या जगासमोर ‘वर्ल्ड क्वीन’ होण्यासाठी १.२१ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करताना एक वेगळाच अनुभव मिळतो आहे, असं ती म्हणते.

अनेक जाहिरातींमधून तसेच विविध सोशल नेटवर्किंग साइटसवरून तृतीयपंथियांच्या हक्कांची जाणीव आणि त्याचा प्रसार होतो आहे. याबद्दल ती म्हणते, ‘मी कोणताही समाज मानत नाही. आपण सगळे सारखेच आहोत. आपणच सरकार घडवतो आणि त्यांना हक्क देतो. त्यामुळे माझ्या तृतीयपंथी बंधूभगिनींना माझं हेच सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या मर्यादांच्या कक्षा ओलांडून बाहेर यायला हवं. स्वत:ला घडवायला हवं’. आपणच आपल्यासाठी उभं राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणारी निताशा सध्या मार्च महिन्यात होणाऱ्या ‘वर्ल्ड क्वीन’ स्पर्धेची जोरदार तयारी करते आहे.

First Published on February 2, 2018 12:40 am

Web Title: india first trance queen nita biswas trance queen