19 March 2019

News Flash

विरत चाललेले धागे : बनारसचे नक्षाबंद

बनारस आणि इतर काही ठिकाणी नक्षाबंदांची परंपरा पाहायला मिळते.

विनय नारकर

भारतातील टेक्सटाइल डिझाइनचा इतिहास तसा धूसर आहे, पण बनारसच्या नक्षाबंदांचा इतिहास आणि योगदान याबाबतीत खूप महत्त्वाचा आहे. भारतीय वस्त्रपरंपरेत नक्षीकामाचं, अलंकरणाचं जे महत्त्व आणि स्थान आहे, त्यात नक्षाबंदांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. अलंकरणाचा पहिला उल्लेख ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथात सापडतो. पण त्याचं स्वरूप वेगळे होतं. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी आणि राजवस्त्रांसाठी बनवलेल्या कार्यशाळांची विस्तृत माहिती आहे. त्यावेळचे तंत्र, विणकर आणि इतर कारागीर यांच्याबद्दलही माहिती मिळते, परंतु कुठेही डिझायनर असल्याचा उल्लेख सापडत नाही. अलंकरण आणि अशा प्रकारची वस्त्ररचना करण्यासाठी कोणतीही तंत्रकौशल्ये असलेली योजना नसायची.

बनारस आणि इतर काही ठिकाणी नक्षाबंदांची परंपरा पाहायला मिळते. यांची डिझाइन बनवण्याची पद्धत, त्यातले कौशल्य आणि नक्षीकाम किंवा अलंकरण यातले त्यांचे योगदान पाहता यांना भारतीय वस्त्रपरंपरेमधील आद्य डिझायनर म्हटले जाऊ  शकते. ही परंपरा कशी, कुठे आणि कधी निर्माण झाली याचा मागोवा घेता, मध्य आशियातील शासकांपर्यंत याचे मूळ शोधता येते. या शासकांनी डिझाइन्स बनवण्यात आणि ती मागावर लावण्यात पारंगत असणाऱ्या इराणी नक्षाबंदांना भारतात आणले. मोहम्मद तुघलकाच्या (१३२५-१३५०) काळात ही परंपरा भारतात सुरू झाल्याचे उल्लेख सापडतात. शहाबुद्दीन अब्दुल अब्बास अहमद या दमास्कसच्या प्रवाशाने याबद्दल लिहिले आहे. हे नक्षाबंद बनारसमध्ये स्थायिक झाले. झैन-उल-अबिदीन (१४२०-७०) या काश्मीरच्या सुलतानाने या संदर्भात केलेल्या प्रयत्नांबाबत ‘जैन राज तरंगिनी’ या ग्रंथात माहिती मिळते. नक्षाबंदांकडून नवीन डिझाइन्स बनवून सुलतानाने आपल्या विणकरांकडून विणून घेतली. ही डिझाइन्स अद्भुत असल्याचे नोंदवले गेले आहे. याबद्दल म्हटलं आहे की यातले आकृतिबंध आणि कारागिरी पाहून चित्रकारही दिङ्मूढ झाले. नक्षाबंदांबद्दल आणखी माहिती अबुल फजलच्या ‘आइन-ए-अकबरी’मध्ये मिळते. अकबराने लखनौ, आग्रा, फतेहपूर आणि अहमदाबाद येथे राजवस्त्रे विणण्यासाठी खास कार्यशाळा बनवल्या होत्या. इथल्या विणकरांना बादशहाने नक्षाबंदांकडून नवीन डिझाइन्स व नवीन तंत्र शिकवले. या ग्रंथात अकबराकडे असणाऱ्या ‘घियास’ या इराणमधील याझ्दहून आलेल्या नक्षाबंदचा उल्लेख आहे. जगाने ‘घियास’ सारखा विणकरच पाहिलेला नाही, असे गौरवोद्गार अबुल फजलने काढले आहेत. हा ‘घियास’ एक उत्तम कवीदेखील होता.

बनारसमध्ये ही परंपरा खूप विकसित झाली. बनारसमधल्या वस्त्रपरंपरेला एवढे वैभव मिळवून देण्यात नक्षाबंदांचा महत्त्वाचा वाटा आहे. तिथे बनलेल्या डिझाइन्स भारतातील अन्य काही वस्त्रपरंपरामध्येही रुजल्या आणि विकसित झाल्या. बनारसच्या नक्षाबंदांना इतर ठिकाणीही बोलावले जायचे. सुरतची ब्रोकेड किंवा चंदेरीचे मीनाकामही बनारसच्या नक्षाबंदाकरवीच व्हायचे. गद्वालच्या राजानेही तिथल्या विणकरांना बनारसला प्रशिक्षणासाठी पाठवले होते. दक्षिणेत कांचिपुरममध्येही नक्षाबंदांच्या प्रभावाने तशा प्रकारची परंपरा निर्माण झाली. बनारसमधील तजाम्मुल हुसैन व मोहम्मद हुसैन हे दोन नक्षाबंद खूप महत्त्वाचे समजले जातात. या दोघांनाही १८९५-९६ मध्ये लंडन इथे झालेल्या ‘एम्पायर ऑफ इंडिया एक्झिबिशन’ आणि ‘इंडिया अ‍ॅण्ड सिलोन एक्झिबिशन’साठी आमंत्रित केलं गेलं होतं. बुखारा येथील हजरत ख्वाजा बहाउद्दीन यांनी ही नक्षाबंदीची कला जन्मास घातली असे मानले जाते. यांचा काळ साधारणपणे १२८८-१३७१ हा समजला जातो. तेव्हापासून ज्याला ही कला शिकायची आहे, त्याला यांच्या नावे ‘फतेहा’ अर्पण करावा लागतो. त्यानंतरच त्याला नक्षाबंद म्हणवून घेता येते.

या नक्षाबंदीमध्ये मूळ डिझाइन्स चितारण्यापासून ते मागावर लावण्यापर्यंत अनेक पायऱ्या असतात. त्या समजून घेणे हा या  लेखाचा उद्देश नाही. ही पद्धत किंवा परंपरा जाणून घेताना आपल्या लक्षात येते की नक्षाबंदांच्या कामात कल्पनाविस्तार करण्यासोबत ती प्रत्यक्षात उतरवताना कारागिरीलाही तेवढेच महत्त्व आहे. बनारस साडय़ांची परंपरा जाणून घेताना नक्षाबंदांच्या योगदानाचा फारसा विचार होत नाही. त्यांच्या कामाचा इतर परंपरांवरही खूप प्रभाव पडला. आणखीही महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी भारतात टेक्सटाइल डिझायनिंगचा पाया रोवला. आजही त्यांनी बनवलेली कित्येक डिझाइन्स वापरली जातात. बनारसच्या वैभवशाली परंपरेचं हे वेगळेपण आहे.

First Published on March 2, 2018 12:32 am

Web Title: india textile banaras textile artwork