विनय नारकर

अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्याच काळात पाहिले तर जागतिक बाजारात लाखोच्या संख्येत भारतीय रुमाल पाठवले जायचे. रुमालांसाठी भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश होता. रुमालासारख्या उत्पादनावरून भारतीयांची बाजाराची गरज ओळखण्याची क्षमता लक्षात येते.

जागतिक औद्योगिकीकरण होण्याआधी भारतीय वस्त्रे जगभर पाठवली जायची. यामध्ये फक्त नेसूच्याच वस्त्रांचा समावेश नव्हता. या वस्त्रांमध्ये अनेक गरजा भागवणाऱ्या विविध उत्पादनांचा समावेश होता. शाली, चादरी, पगडय़ा, लहान मुलांची दुपटी, लुंग्या, कनॉपी, तंबू, झोळ्या, राज दरबारात लागणाऱ्या अनेक शोभेच्या वस्तू, अशी अनेक उत्पादने भारतात बनून जगभर जायची. त्यापैकी एक वस्तू अशी होती की जी जवळपास जगभर वापरली जायची. राज परिवारांपासून सामान्यांच्या रोजच्या वापरात ही गोष्ट असायची. ती म्हणजे भारतीय ‘रुमाल.’ भारतात बनणाऱ्या रुमालांमधलं वैविध्य थक्क करणारं होतं. आजचे रुमाल पाहून त्या काळातल्या रुमालाच्या कारागिरीचं स्वरूप आणि फॅ शनमधलं स्थान यांचा अंदाज येऊ  शकत नाही.

फारसी भाषेत ‘रुमाल’चा शब्दश: अर्थ होतो ‘चेहरा पुसण्याचे कापड.’ कालांतराने याचा एक ‘फॅशन गारमेंट’ म्हणून वापर होऊ लागला. रुमाल हा आकाराने चौरस असतो, आधी राजस्त्रिया व उच्चभ्रू स्त्रिया याचा खांद्यावरून घेण्यासाठी वापर करायच्या. नंतर सामान्य स्त्री-पुरुषही याचा वापर करू लागले. फक्त अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्याच काळात पाहिले तर जागतिक बाजारात लाखोच्या संख्येत भारतीय रुमाल पाठवले जायचे. रुमालांसाठी भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश होता. रुमालासारख्या उत्पादनावरून भारतीयांची बाजाराची गरज ओळखण्याची क्षमता लक्षात येते.

भारतीय रुमालांचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, वेगवेगळ्या देशांच्या आवडीनुसार तसे विविध प्रकार बनवण्याची आपल्या कारागिरांची क्षमता. युरोप आणि अमेरिकेत बंगालमधले बांधणी आणि फुलांची छपाई असलेले ‘छोप्पा’ रुमाल अतिशय लोकप्रिय होते. अमेरिका इ.स. १८०० च्या सुरुवातीला त्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त बंगाली रुमाल आयात करीत असे.

१७०१ आणि १८२६ दरम्यान इंग्लंडमध्ये या रुमालांच्या विक्रीवर बंदी असताना या बंगाली रुमालांची मोठय़ा प्रमाणात तिथे तस्करीही होत होती. हे रुमाल आपल्याला त्यावेळच्या चित्रांमध्ये आणि छायाचित्रांमध्ये पाहायला मिळतात. त्यावेळच्या दर्यावर्दीच्या गळ्याभोवती, उच्चभ्रू स्त्रियांच्या खोल गळ्याच्या गाऊनवर गळ्याभोवती लपेटलेले, उच्चभ्रू पुरुष पोटर्र्ेट्स बनवून घेताना हातात धरलेले, असे हे रुमाल पाहायला मिळतात.

‘मद्रास रुमालां’चं तर त्यावेळी खास प्रस्थ होतं. दक्षिण-पूर्व भारताला साधारणपणे मद्रास म्हटलं जायचं. अटलांटिक महासागराच्या ‘व्यापार त्रिभुजा’मध्ये मद्रास रुमाल हे महत्त्वाचं चलन होतं. आफ्रिकन गुलामांच्या मोबदल्यात मद्रास रुमाल वापरले जायचे. मद्रासजवळच्या ‘पुलीकत’ बंदरावरून या रुमालांचा व्यापार चालायचा. या सुती रुमालांमध्ये गडद आणि उजळ रंगातील वेगवेगळ्या आकारातील चौकडा असायचा. हा आजही ‘मद्रास चेक्स’ म्हणून ओळखला जातो. पश्चिम आफ्रिकेत स्त्रिया मुंडासे म्हणून या रुमालांचा वापर करीत. आजही तिथल्या अनेक समूहांमध्ये हा पारंपरिक पेहराव म्हणून वापरला जातो. काही समूहांमध्ये, विशेषत: नायजेरियाच्या कलाबरी लोकांमध्ये धार्मिक उपचारांत मद्रास रुमाल आजही प्रचलित आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व विधींमध्ये या मद्रास रुमालाचा वापर होतो.

तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यातील ‘तेलिया रुमाल’ हे आखाती देशांमध्ये तसंच पूर्व आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियात प्रचंड लोकप्रिय होते. हे ‘आशिया रुमाल’ या नावानेच ओळखले जाऊ  लागले. हे रुमाल ‘डबल इकत’ या तंत्राने बनवले जायचे. जपानने या तेलिया रुमालाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले. राजनैतिक भेटी म्हणून हे रुमाल दिले जायचे. जपानच्या प्रसिद्ध ‘टी सेरेमनी’मध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर आवरण म्हणून हे रुमाल वापरले जायचे. जपान्यांच्या किमोनो या पोषाखामध्येही तेलिया रुमालाला स्थान मिळाले होते.

हिमाचल प्रदेशातील चंबा संस्थानांच्या दरबारी कारागिरांकडून ‘चंबा रुमाल’ बनवले जात होते. हे रुमाल बंगालच्या खास मसलीन कापडावर आणि उंची रेशमी कापडावर कशिदाकारीने बनवले जायचे. देशोदेशीच्या राजांकडून खास भेटी देण्यासाठी चंबा रुमाल घेतले जायचे. बनारसच्या किमती ब्रोकेडमध्ये बनणारे जरीचे रुमालही राजदबारासाठी खास विकत घेतले जायचे. काश्मीरमध्ये विणले जाणारे पश्मिना कणी रुमाल हे युरोपातील राजस्त्रियांच्या खास आवडीचे होते. हे पश्मिना रुमाल भारतीय रुमालांमध्ये सगळ्यात महाग होते.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय रुमालांचेच वर्चस्व राहिले, नंतर त्याच्या पाश्चिमात्य नकलांनी बाजाराचा ताबा घेतला. सतराव्या शतकात उच्चभ्रूंसाठी असणारा भारतीय रुमाल एकोणिसाव्या शतकापर्यंत सामान्य माणसाच्या रोजच्या वापराची वस्तू बनून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता. भारताने शोधलेला हा फॅशन प्रकार आजही निरनिराळ्या स्वरूपात जगभर वापरला जातोय.