25 March 2019

News Flash

बॉटम्स अप : अस्सल देशी

विविध देशांमध्ये, त्या देशांतील विविध भागांमध्ये फळं, धान्य, फुलांच्या अर्कापासून दारू तयार केली जाते.

शेफ वरुण इनामदार

आतापर्यंत माझ्याप्रमाणेच अनेकांनी देशविदेशात भटकंती केली आहे मात्र अनेकदा विमानतळावर असलेल्या डय़ुटी फ्री लिक्वर शॉप्सना भेट दिली नाही म्हणून चुटपुट लागून राहते.  विमानतळावरून बाहेर पडताना या शॉप्सना भेट देत ‘जॉनी वॉकर’, ‘शिवास’, ‘रिगल’ या आणि अशा विविध लेबलच्या बाटल्या आपल्यासाठी, मित्रांसाठी घ्यायच्या आणि मगच बाहेर पडायचे हा रिवाजच असतो. हे सगळं आपल्या ओळखीचं आहे ना? मात्र माहित असलेल्या या ब्रँडपलिकडे एक जग आहे. जे असघंटित आहे, अनियंत्रित आहे आणि त्यामुळे दुर्लक्षित आहे.  हे जग आहे आपल्या देशी दारूचं. देशी दारू म्हणा, कंट्री म्हणा किंवा ठर्रा म्हणा. ही देशात बनवली जाणारी अस्सल आणि तितकीच स्थानिक प्रकारची लोकप्रिय दारू आहे. विविध देशांमध्ये, त्या देशांतील विविध भागांमध्ये फळं, धान्य, फुलांच्या अर्कापासून दारू तयार केली जाते. इथे मी क्वचित प्रसंगी या दारूचा उल्लेख कमी दर्जाची दारू म्हणून करतो. कमी दर्जाची म्हणण्याचं कारण त्या दारूच्या उध्र्वपतन म्हणजेच डिस्टिलेशन प्रक्रियेशी जोडलं गेलं आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते अगदी कन्याकुमारीच्या समुद्रतटापर्यंत सर्वच ठिकाणांवर आपल्या देशात अस्सल देशी दारूची निर्मिती करतात. माझ्या आतापर्यंतच्या निरीक्षणात आणि भटकंतीत मला गवसलेल्या काही देशी दारूंच्या प्रकारांचा हा धावता आढावा..

फेणी

पोर्तुगीजांनी भारतात काजू आणले आणि गोव्यात या काजूच्या बियांना वेगळ्या अशा स्पिरीटच्या रूपात सादर करण्यात आलं. २०१६ मध्ये गोवा सरकारने गोव्याबाहेरील राज्यांमध्ये या पेयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होण्यासाठीचा उपक्रम सुरू केला. गोव्यात फक्त काजूचीच नव्हे तर नारळाचीही फेणी बनवली जाते.

ताडी

ताडी हे ताडगोळ्यांपासून तयार केले जाणारे पेय आहे. सुरूवातीला ती ‘नीरा’ असते. सूर्य अस्ताला गेल्यानंतर  हे पेय आंबण्यास सुरुवात होते. आंध्रप्रदेशात ताडगोळ्यांची जास्त निर्मिती होत असून त्यापासूनच हे पेय तयार होते. त्या ठिकाणी हे पेय ‘कल्लू’ म्हणूनही ओळखले जाते.

हंडिया

बिहार, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील स्थानिक लोकांकडून तांदुळापासून बनवण्यात येणारे हे एक पेय. ज्यामध्ये राणूच्या गोळ्या वापरतात. ज्यात सुमारे २० ते २५ देशी औषधी वनस्पतींचे मिश्रण असून या गोळ्यांच्या मदतीने हे पेय आंबण्यास मदत होते. हे पेय बनवण्यासाठी उकळत्या भातात राणूच्या गोळ्या घातल्या जातात आणि ते पेय आंबवण्यासाठी ठेवले जाते. साधारण आठवडय़ाभरात हे पेय तयार होते.

ज्युडीमा

ही आसामची राइस वाइन आहे जी वाईट शक्तींना दूर ठेवते अशी धारणा आहे. आसाममधील ‘दिमासा’ लोक वाईटापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी नवजात बालकांना ही वाइन पाजतात. अस्सल, आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यात वास्तव्यास असलेले दिमासा आदिवासी लोककला, संगीत, नृत्य, कला यांचं संवर्धन करण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ‘ज्युडीमा’ नामक एका महोत्सवाचं आयोजन करतात.

छांग

हिमालयाच्या पूर्वेकडचा भाग, नेपा ळ आणि तिबेटमधील लोकांकडून ‘छांग’ हे पेय बनवलं जातं. लिंबी, नेवार, सुनुवार, राय, गुरुंग, मगर, शेर्पा आणि तमांग समाजातील लोक तिथे असणाऱ्या अति थंड वातावरणाचा सामना करण्यासाठी हे पेय पितात.

केसर कस्तुरी

राजेशाही थाट असणाऱ्या या पेयाने चक्क रॉजर मूरलाही वेड लावलं होतं. ‘ऑक्टोपसी’च्या चित्रीकरणाच्या वेळी मूरला केसर, दूध, मध आणि बावीस प्रकारच्या मसाल्यांपासून तयार करण्यात आलेलं हे पेय पिण्याची संधी मिळाली होती. बऱ्याच वर्षांपूर्वी राजस्थानमधील राजघराण्यांमध्येच हे पेय प्यायलं जायचं. पण, आता सर्वसामान्यपणे त्याची विक्री केली जाते.

पो रो अपाँग

आसामींचं हे तांदुळापासून तयार केलं जाणारं पेय आहे. तांदळाचा भुसा, तांदूळ धान्य, भाताचा पेंढा यांपासून तयार केले जाते. तांदळाचे पीठ आणि विविध औषधी वेली, गवत यांच्यापासून बनवलेल्या ए पॉप नावाच्या पदार्थाचाही यासाठी वापर केला जातो. अदी आणि मिसिंग जमातीची ही खासियत असून हे पेय त्यांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

चुवारक

त्रिपुरामधील ही व्हिस्की नोकरशहा आणि नेत्यांच्या राजकारणामुळे जगासमोर आली नाही. चुवारक हे सर्वाधिक सुरक्षित पेय किंवा मद्य आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, आतापर्यंत हे पेय प्यायल्यामुळे एकही मृत्यू झाल्याचं आढळलेलं नाही. मामी तांदूळ, अननस, फणस किंवा गुरिया प्रकारच्या तांदळापासून हे पेय किंवा ही देशी दारू बवनली जाते.

झुथो – नागालँड

नागालँडच्या ‘अंगामी नागा’ जमातीने या पेयाचा शोध लावला आहे. हे पेय बनवण्याच्या प्रक्रियेबाबत नागा लोक इतकी गुप्तता पाळतात की जमातीबाहेरच्या कोणालाही तांदुळापासून बनणाऱ्या या वाइनचा वासही लागू शकत नाही. ज्या लोकांनी या पेयाची चव चाखलेली आहे, त्यांच्या मते ते जपानी साके (जपानमध्ये तांदळापासून बनवली जाणारी वाइन)प्रमाणे आहे. कियाड

१८८०च्या दशकापासून नावारूपास आलेले हे पेय जयंतीया पर्वतरांगांमध्ये असणऱ्या ‘नार’ जमातीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मेघालयातील ही पारंपरिक बीअर असून यात ७० टक्के अल्कोहोल असतं. आणि साधारण तीन वेळा उध्र्वपतनाच्या प्रक्रियेतून हे पेय तयार केलं जातं. बांबूच्या लांबट आकाराच्या ग्लासमधून हे पेय देण्यात येतं. ज्याच्या तळाशी कोळशाचा एक तुकडा ठेवला जातो त्यामुळे या पेयाची आंबटसर चव कायम राहते. यात काहीतरी शास्त्र आहे हे नक्की. नवजात बालकांच्या वाढीसाठी त्यांना हे पेय पाजण्यात यायचं. पण, दुर्दैवाने हे पेय बनवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रोत्साहन दिलं जात नाही, उलट पोलिसांकडून धाडी टाकल्या जातात.

कोडो को जान्र

हॉट सिक्किमींची बीअर म्हणून ओळखलं जाणारं हे पारंपरिक आणि कमी अल्कोहोल असलेले पेय बाजरीच्या दाण्यांपासून पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या वस्तीत तयार करण्यात येतं. टम्बलरमधून दिल्या जाणाऱ्या या पेयाला स्थानिक भाषेत आणि दार्जिलिंग, सिक्कीम या भागात ‘कोडो’ असे संबोधतात.

क्साज

आंबवलेले तांदूळ आणि दुर्मीळ हब्र्जपासून हे पेय बनवण्यात येतं. ‘अहोम’ लोकांचं पेय म्हणून हे ओळखलं जातं. त्यांच्या लोककथेतच असा उल्लेख आहे की नवजात बालकांना या प्रकारच्या बिअरमध्ये भिजवलं तर त्यांच्यावर अशुभ शक्तींची छाया पडणार नाही आणि त्यांच्यासाठी हा शुभशकून ठरेल.

झॉलेदी

मिझोरामच्या चंफाई जिल्ह्यातील नाहलान या छोटय़ा खेडय़ात स्थानिक पातळीवर द्राक्षांपासून तयार करण्यात आलेली ही एक प्रकारची वाइन

आहे. हे पेय प्यायल्यामुळे तिला किंवा त्याला सहजपणे आपल्या प्रेमात पाडता येतं अशी धारणा आहे.  सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी वाइन उत्पादक होऊ  पाहणाऱ्या या झॉलेदीला माझ्या शुभेच्छा.

किन्नौरी घांटी

वोडकासारखं पारदर्शक, सफरचंदांचा वास येणारं हे पेय पिण्यासाठी अनेकजण संधीच शोधत असतात. वातावरण कसंही असो, चांगलं किंवा वाईट, परिस्थिती कशीही असो हे पेय म्हणजे एक प्रकारच्या दिनचर्येचाच भाग झालं आहे.

लुगडी

हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणात तांदुळापासून बनवलेली ही बिअर शरीर गरम ठेवण्यास मदतीची ठरते.

गुदाम्बा

काळा गूळ वापरून बनवलेलं हे हैदराबादमधील एक प्रसिद्ध पेय आहे. काळ्या गुळाची अवैधरित्या विक्री थांबवणं हे त्यांच्यासमोरचं सध्याचं आव्हान असून गुदाम्बासंदर्भातील हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटचे प्रयत्न सुरू आहेत.

महुआ

मध्यप्रदेशात आणि महाराष्ट्राच्या काही दुर्गम भागांमध्ये हे पेय बनवण्यात येते. मोहाच्या फुलांपासून बनवण्यात येणाऱ्या या पेयाला महुआ किं वा मोहाची दारू म्हणूनच संबोधण्यात येतं.

सेकमाई यू

बीअर आणि वाइन बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मणिपूरमधील सेखमाई शहरावरून या पेयाला सेकमाई यू हे नाव पडलं आहे. तिथलं वातावरण आणि पाण्याची असणारी एक वेगळी चव यांमुळे सेकमाई यू जास्त चवीची ठरते. आंबवलेल्या तांदळापासून हे पेय तयार केलं जातं आणि अर्क काढण्याच्या प्रक्रियेनंतर लगेचच ते पेय घेतले तर त्याची चव काही औरच ठरते.

राक्षी

नेपाळ, तिबेट आणि सिक्कीममध्ये घराघरांत तयार करण्यात येणारं एक पेय म्हणजे राक्षी. लिंबू या आदिवासी जमातीमध्ये डुक्कर (पोर्क)आणि बकरीच्या मटणासोबत हे पेय पिण्यासाठी दिले जाते.

अवैधरीत्या विक्री केली जाणारी ही देशी दारू कमी किमतीत मिळत असल्याने गावखेडय़ातील लोक आणि शहरातील गरीब लोकांना त्यांचा जास्त आधार वाटतो. मात्र सहज मिळणाऱ्या या देशी दारूपायी कौटुंबिक हिंसा आणि गरिबी अधिकच वाढत गेल्याने त्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जातात. वैधरित्या देशी दारू मिळणारे बार आता स्वतंत्र असतात. देशी दारूची चव चाखण्याची इच्छा असणाऱ्यांनी अतिशय सावधपणे त्याची निवड केली पाहिजे. अनेकदा त्याचे सेवन करणं हे घातक ठरू शकतं. त्यामुळे स्थानिक जाणकारांच्या मदतीनेच देशी दारूच्या चवीचा प्रयोग करा..!

First Published on March 2, 2018 12:31 am

Web Title: indian made liquor indian liquor types holi 2018