18 January 2019

News Flash

विरत चाललेले धागे : भारतीय लघुचित्रकला आणि हातमाग

भारतात लघुचित्रांची अतिशय वैभवशाली परंपरा आहे.

विनय नारकर

भारतात लघुचित्रांची अतिशय वैभवशाली परंपरा आहे. या लघुचित्रांच्या प्रांतानुसार काही शैली आहेत. राजस्थानी, पहाडी, दख्खनी आणि मुघल शैली या यातल्या महत्त्वाच्या परंपरा आहेत. त्यांची आपापली वैशिष्टय़े आहेत. या लघुचित्रांमध्ये अनेक विषय चितारलेले दिसतात. निसर्ग रंगवण्यापासून, संस्कृतिदर्शन, शृंगार, राजेरजवाडय़ांची जीवनशैली, युद्ध, कृष्ण व इतर देवता, पुराणकथा आदी अनेक गोष्टी लघुचित्रांमध्ये पाहायला मिळतात. अनेक राजघराण्यांनी उत्तमोत्तम चित्रकारांकडून ही चित्रे बनवून घेतली. अशा अनेक प्रकारच्या चित्रणासोबत त्या वेळच्या विविध गोष्टींचे दस्तऐवजीकरणही लघुचित्रांमुळे केले गेले आहे.

चित्र १ हे मुघल चित्रशैलीतील लघुचित्र अंदाजे १५९० सालातील आहे. इस्लामधील एक दंतकथा यात चितारली आहे. या कथेनुसार प्रेषित इद्रिसने मानवाला प्राण्यांच्या कातडीऐवजी सुती कापडापासून बनवलेले कपडे वापरायला शिकवले. या चित्रात प्रेषित इद्रिस मानवाला हातमागावर वस्त्र विणण्यासाठी सूचना देत आहेत. या दरबारी चित्रकाराने प्रेषित इद्रिसना चित्राच्या मध्यभागी दाखवले आहे. ते प्राण्यांची कातडी परिधान केलेल्या माणसांना सुताच्या गाठी देत आहेत. चित्राच्या खालच्या अध्र्या भागात सुती कापड हातमागावर विणण्याच्या प्रक्रियेमधील वेगवेगळे टप्पे चितारले आहेत. त्यात सूत धुणे, ताना तयार करणे, मागावर बांधून विणणे हे सर्व टप्पे चित्रकाराने धार्मिक दंतकथांमधून घेतलेले नसून, त्याने त्या काळी पाहिलेली ही प्रक्रिया आहे.

चित्र २ व चित्र ३ गुलाम अली खान हा मुघल दरबारातला शेवटचा चित्रकार. मुघल सल्तनत लयाला गेल्यानंतर त्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी बरेच काम केले. कर्नल जेम्स स्किनर याने एका महत्त्वाच्या कामासाठी गुलाम अली खानची नियुक्ती केली होती. हे काम होते दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील विविध समुदायांच्या चित्रणाचे. तसरिह अल-अवाम या मालिकेअंतर्गत सर्व समुदाय आणि त्यांच्या व्यवसायांची अनेक लघुचित्रे काढली गेली. ही चित्रे कलात्मकतेसह दस्तऐवजीकरण व मानववंशशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत.

या मालिकेतली हातमाग आणि वस्त्र कलेसंबंधित इतर व्यवसायांचीही काही चित्रे आहेत. यांत ब्लॉक प्रिंटिंग, ब्रोकेड फिनिशिंग करणारे, चिकाचे पडदे बनवणारे, चटया विणणारे यांचीही लघुचित्रे आहेत. या मालिकेत पाहायला मिळणारे बहुतांश व्यवसाय व जीवनशैली आता नामशेष झाले आहेत, अपवाद हातमाग कलेचा.

लघुचित्रकला शैलींमधील पहाडी ही महत्त्वाची परंपरा आहे. त्यातल्या एका लघुचित्रात तेहरी-गढवाल भागातील ब्लॉक प्रिंटिंग करतानाचे एक सुंदर चित्र उपलब्ध आहे.

पहाडी शैलीतीलच पण अगदी वेगळ्या धाटणीच्या एका लघुचित्रात कबीर हातमागावर काम करत वार्तालाप करतानाचे, साधारण १८०० सालातले सुरेख चित्र पाहायला मिळते.

ओडिशातील एका पटचित्रात कलिंग साम्राज्य काळात तिथे प्रचलित असलेल्या ‘बोएटा’ या प्रचंड जहाजांमधून ओरिशातील विणकर जावा-सुमात्रा येथे ‘इकत’ ही कला घेऊन जातानाचे चित्र पाहायला मिळते.

अशा लघुचित्रांनी कलस्वादासोबत आपल्या वस्त्रकलेच्या इतिहास नोंदणीचे काम करून ठेवलेय. गेल्या आठवडय़ात जगभर ‘जागतिक वारसा दिन’ साजरा केला गेला. भारताला मिळालेला हातमागाचा हा वैभवशाली वारसा आजही खूप चांगल्या परिस्थितीत आहे. लघुचित्रांमधून आपण पाहू शकतो की कित्येक शतकांपासून हातमाग कला आपण तशा स्वरूपात टिकवली आहे. प्रत्येकाने या जतनाच्या कामात आपला वाटा उचलणे ही जबाबदारी समजली पाहिजे.

viva@expressindia.com

First Published on May 11, 2018 12:37 am

Web Title: indian miniature painting and handloom