नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागला. त्यामुळे साहजिकच सगळीकडे पुढे काय करायचं? करिअर ऑप्शन काय? स्कोप कशात आहेत?, असे प्रश्न कानी पडतायेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भावी आयुष्यासाठी फार महत्त्वाची ठरतात. आपली आवड आणि आपलं करिअर या दोन गोष्टी वेगळ्या असाव्यात असंच अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं. पण सध्या अनेक तरुण-तरुणी आपल्या आवडीलाच करिअर बनवू लागले आहेत. त्यासाठी ते व्यवस्थित नियोजनही करतात. वर्षांनुवर्षे चालत आलेली आणि ठरलेली करिअर न निवडता काही तरी नवीन करण्याचं ध्येय या मुलांचं असतं. असंच एक ध्येय मुंबईच्या असित कुलकर्णीचं होतं आणि ते पूर्ण करण्यात तो यशस्वीही झाला. असितने रुईया महाविद्यालयामधून इतिहास या विषयात पदवी घेतली. आणि मग पुढे फिल्ममेकिंगचं शिक्षण घेण्यासाठी थेट लंडनची ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’ गाठली. सध्या फिल्ममेकिंगमध्ये उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या असितने त्याच्या फिल्ममेकिंगच्या पदवीच्या प्रोजेक्टसाठी एक माहितीपट बनवला. यासाठी असितने ‘पोलो आणि पोनी’ अशा आगळ्यावेगळ्या विषयाची निवड केली.

युनिव्हर्सिटीने एकदा विषयाला मान्यता दिली की विद्यार्थ्यांना जगभरात कुठेही जाऊ न तो प्रोजेक्ट करता येतो. यासाठी लागणाऱ्या कागदपात्रांपासून ते कॅमेरा, माईक अशा सगळ्या साधनांपर्यंत युनिव्हर्सिटी सगळ्यासाठी मदत करते. हा प्रोजेक्ट टीममध्ये करायचा असतो. म्हणून मग असितने त्याच्या दोन वर्गमित्रांसोबत हा प्रोजेक्ट केला. त्याची संकल्पना पूर्णत: असितची होती. याबद्दल असित सांगतो, ‘मला कधीही कॅमेरा नवीन नव्हता. मी गेल्या आठ वर्षांपासून भारतामध्ये वाइल्डलाइफ फोटोग्राफी करतोय. मला कॅननचा नॅशनल अ‍ॅवार्डही मिळालेला आहे. माझ्या घरात नॉर्थ ईस्टबद्दल खूप आपुलकी आहे. माझे वडील त्यांच्यापरीने तिकडे बरीच सामाजिक कामं करतात. त्यामुळे तिकडच्या बऱ्याच लोकांचे संबंध असल्याने माझ्या प्रोजेक्टच्या दरम्यान मला वेगळं असं काही वाटलं नाही’. मात्र त्याचा विषय वेगळा ठरला हे नक्की. या विषयासंबंधी माहिती देताना, पोलो हा खेळ मणिपूरमध्ये पोनी या घोडय़ाच्या प्रजातीवर बसून खेळला जातो. ही खास मणिपुरी पोनीची प्रजाती भारतातल्या बाकीच्या प्रजातीपेक्षा वेगळी असते, अशी माहिती त्याने दिली. या दोघांना एकत्र घेऊन काही तरी करायचं असं माझ्या डोक्यात आलं. आणि या विचारातून हा माहितीपट तयार झाला, असेही असितने सांगितले. या फिल्मसाठी असितने डीओपी म्हणून काम बघितलं. तर लिखाण आणि  दिग्दर्शनाची धुरा ध्वनी वासाने सांभाळली आहे. ध्वनीही मूळची मुंबईची आहे. केविन गीटाऊहा केनियाचा निर्माता आहे. त्याने या माहितीपटाचं एडिटिंग आणि कॅमेरा सांभाळला आहे. तर सुशांत रिसबूड या असितच्या रुईया कॉलेजमधील मित्राने कार्यकारी निर्माता म्हणून काम बघितलं आहे.

काही सेकंदाच्या जाहिरातीसाठीही अनेक दिवसांची मेहनत असते. मग एवढा माहितीपट करण्यासाठी तयारी तर आधीपासूनच करावी लागणार. या तयारीबद्दल असित म्हणतो, ‘मी या माहितीपटाचं प्री-प्रॉडक्शन जानेवारी महिन्यातच सुरू केलं. मार्च-एप्रिल या महिन्यात खऱ्या कामाला सुरुवात झाली. लंडनमधूनच आम्ही लोकेशनसाठी परवानगी, काही लोकांशी बोलणं अशी बऱ्यापैकी कामं केली होती. मे महिन्यामध्ये आम्ही तिकडे गेलो. पोलो हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे. अमेरिका यात खूप पुढे आहे. यूके, फ्रान्स, केनियाच्या टीम या खेळात जगातल्या टॉप टीम मानल्या जातात. पण मूळचा हा खेळ आपल्या भारताच्या मणिपूरचा आहे. हे आपल्याकडच्या लोकांना माहीतच नाही. आणि हीच महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा या माहितीपटाचा हेतू आहे’.

मणिपुरी पोनी हा मणिपूरच्या परंपरेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पोनी या घोडय़ाला सामान उचलायला किंवा माणसाच्या वाहतुकीसाठी कधीही वापरत नाहीत. तर आपल्याच भारतात लेह लदाखच्या बाजूला पोनीच्या काही प्रजातीचा वापर हा या कामासाठी होतो. पण पोनी हा मणिपूरच्या रहिवाशांसाठी देवासमान आहे. त्यामुळे त्याचा वापर हा फक्त लढाईसाठी आणि पोलो हा खेळ खेळण्यासाठी होतो. पोनीची देखभाल करणं तर खर्चीक आहे. त्यामुळे कुठे तरी या पोनीची देखभाल करणं कमी झालं आणि ही प्रजातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आली. पण वेळेत काही लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं त्यामुळे ही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाली नाही. आता त्यांना जपण्यासाठी, नीट वाढवण्यासाठी अनेक सेंटर उभी करण्यात आली आहेत. मणिपूरच्या ‘सगोल कांगजाइ’ या खेळाला  ब्रिटिशांनी जगभरात पोलो या नावाने ओळख मिळवून दिली, पण पुढे जाऊन आता सर्वत्र हा मूळचा खेळ भारताच्या मणिपूरचा आहे हे सगळ्यांनाच पटलं आहे. सध्या फक्त मणिपूरमधे ३५ हून जास्त पोलो क्लब आहेत. मणिपूरमधील ‘मपेल कांजीबुंग’ नावाच्या जगातील पहिल्या पोलो मैदानावर आजही पोलोच्या वार्षिक स्पर्धा होतात. यासाठी जगभरातून अनेक टीम मणिपूरमधे दाखल होतात. पण भारताच्या मणिपुरी तरुणांनी बाकीच्या राष्ट्रांना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेळा पराजित करून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. मणिपूरच्या मुलीही हा खेळ आवर्जून खेळतात. त्यातल्या काही मुली दिसायला अंगाने बारीक उंचीला ठेगण्या वाटत असल्या तरी त्या एकदा पोनीवर बसून खेळायला लागल्या तर ते बघण्यासारखं असतं, असं असित सांगतो. अर्थात, ही सगळी गोष्ट असितने माहितीपटात रंगवली आहे. सध्या हा माहितीपट युनिव्हर्सिटीपुरता असला तरी लवकरच तो हा माहितीपट सगळ्या प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

‘इंडियन स्टोरीटेलर’

असितचं ‘इंडियन स्टोरीटेलर’ नावाचं एक यूटय़ूब चॅनेल आहे. त्यावरती असित छोटे छोटे माहितीपर व्हिडीओ टाकत असतो. मराठी भाषादिनाच्या निमित्ताने असितने मराठी ‘भाषादिन इन लंडन’ असा एक छोटा व्हिडीओ बनवला. ज्यात त्याने तिकडे शिकत असलेल्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या मित्र-मैत्रिणींकडून मराठीतून जगातल्या सगळ्या मराठी भाषिकांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. याआधी त्याने प्रत्येकाला मराठी भाषेबद्दल, मराठी भाषादिनाबद्दल माहितीही दिली. त्याने नंतर ‘मेटल लव्ह’ नावाचा एक माहितीपट बनवला. ज्यात त्याने एका इटालियन कलाकारावरची कथा सांगितली आहे. हा माहितीपट लंडनच्या दोन नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये आणि मुंबईच्याही एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडली गेली होती.

viva@expressindia.com