23 October 2018

News Flash

‘जग’ते रहो : स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि बरंच काही..

अमेरिकन संस्कृती ही त्या त्या प्रांतागणिक बदलते.

अवधूत भागवत, ट्रॉय, मिशिगन, यूएसए.

लोकल ते ग्लोबल ही उक्ती सध्या सहजगत्या बोलली जाते आहे. आपल्याकडील तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहते आहे. या तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो तो देश, त्यांचा भोवताल, तिथली संस्कृती, साहित्य-कला, आहार-विहार, शिक्षण-करिअर आणि तिथल्या तरुणाईचा सामाजिक-राजकीय सहभाग आदी अनेक मुद्दय़ांचं प्रतिबिंब ठरणारं हे सदर.

अमेरिका! अनेकांच्या स्वप्नातला देश. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि नैसर्गिक वैविध्यानं नटलेला देश. ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनांचं नातं पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारा हा देश. इथली तरुणाई हे या देशाचं भविष्य. इथली ऊर्जाच जणू. पण अनेकदा फारसं खोलात न शिरता समस्त अमेरिकन तरुणाईला अनेकदा एक लेबल हमखास लावलं जातं की, ही तरुणाई एकदम मोकळीढाकळी आहे. अगदी ‘स्वतंत्र’ आहे. हे लेबल एकदम चुकीचं किंवा बरोबर अशा दोनच कप्प्यांत विभागता येणार नाही. किंवा ही गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, असंही दोन तुकडे पाडून सांगता येणार नाही.

इथल्या मुलांना लहानपणापासून एक फ्रीडम- स्वातंत्र्य मिळालेलं असतं. ते त्यांना हवं ते करू शकतात, ही गोष्ट इथल्या घरांमध्ये गृहीत धरलेली असते. हे इथल्या मुलं आणि पालकांनाही चांगल्या प्रकारे उमगलेलं असल्यानं इथं फ्रीडमला खूप महत्त्व दिलं जातं. उदाहरणार्थ शिक्षण. ज्या मुलांना शिक्षणाची गोडी आहे ते पुढं शिकतात. मात्र ज्यांना शिकायची इच्छा नसते ते आधीच ड्रॉप आऊ ट होतात. शिक्षणाच्या चौकटीत स्वत:ला अजिबात आखून घेत नाहीत. अमेरिकाभर हे मतस्वातंत्र्य आहे. त्याचं प्रतिबिंब इथल्या मुलांच्या करिअरमध्येही दिसतं. ज्याला जे हवं ते तो शिकतो किंवा करतो. किंवा काही वेळा शिक्षणासाठी कितीही र्वष लागली, तरी तेवढा वेळ देऊन हे लोक शिक्षण पूर्ण करतातच. काही वेळा काही जण शिक्षण मध्येच सोडतात, पण शिक्षण सोडल्याची गोष्ट स्वत:च्या जिवाला फारशी लावून घेत नाहीत. त्यापेक्षा ते दुसरा पर्याय शोधतात आणि त्यात आपलं साध्य गवसतंय का, ते पाहतात. त्यामुळं हे फ्रीडम एकाअर्थी चांगलं आहे मात्र कधी कधी त्याचे काही वेगळे परिणामही दिसून येतात. काही वेळा स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन त्याचे नकारात्मक पडसाद उमटतात. आपल्याकडे आपण कुटुंबासोबत राहतो. आपल्या कुटुंबाचं बॉण्डिंग कायम असतं. कुटुंब आपल्या पाठीशी ठामपणे उभं असतं. इथली मुलं वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी शिक्षणासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडतात. या घराबाहेर पडण्यात मुलगा-मुलगी असा काहीही फरक नाही. काही वेळा ही मुलं एकटय़ानं आल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार नसतात, त्यामुळे खूप लवकर त्यांना एकटेपणा येतो. प्रसंगी नैराश्य येतं.

अमेरिकन संस्कृती ही त्या त्या प्रांतागणिक बदलते. भाषेचा लहेजा आणि वागण्यातला मोकळेपणाही बऱ्याचदा बदलतो. दक्षिणेकडच्या राज्यांतील लोक बाहेरच्या लोकांशी तितकी मोकळी वागत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. पण मी नॉक्सव्हिल, टेनेसीला राहत असताना मला काही असा अनुभव आलेला नाही. मी सध्या राहतोय त्या उत्तरेकडच्या राज्यांत पुष्कळच मोकळेपणा आहे. कारण खूप पूर्वीपासूनच बाहेरून आलेले लोक इथे स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे इथे कायम सांस्कृतिक वैविध्य अनुभवायला मिळतं. मी सध्या राहतोय ते ट्रॉय हा जणू एक ‘मेल्टिंगपॉट ऑफ द मिशिगन’ आहे. या ऑटोहबमध्ये भरपूर ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीज आहेत. त्यांना पोषक उद्योगही मोठय़ा प्रमाणात आहेत. इथं खूप ओपन वातावरण आहे. कोणतंही दडपण येत नाही. वैयक्तिक आयुष्यात इथले लोक थोडेसे रिझव्‍‌र्ह आहेत. काही वेळा राजकारण्यांची काही मतं न पटल्याने त्यांना विरोध केला जातो. प्रसंगी टरही उडवली जाते. इथल्या प्रसारमाध्यमांनी काही राजकारण्यांच्या विरोधात चांगलीच मोहीम उघडलेली दिसते. आपली मतं व्यक्त करायचं स्वातंत्र्य इथे माध्यमं आणि लोकांनाही आहे. बहुतांशी वेळा रॅलीज काढणं वगैरे गोष्टी चालू असतात. या घडामोडींत एखादी व्यक्ती सामील झाली, म्हणून त्या व्यक्तीच्या वैचारिक भूमिकेचा लगोलग न्यायनिवाडा करून टाकला जात नाही. तिच्या मताला कोणतंही लेबल लावलं जात नाही. अभिव्यक्त होण्यात आणि ती अभिव्यक्ती स्वीकारण्यात मोकळेपणा आढळतो. कोणत्याही कामाला कमी न लेखलं जात नाही. शिक्षण घेणारी गरजू मुलं आणि अगदी चांगल्या घरातली मुलंही उपजीविकेचा एक स्रोत म्हणून छोटा-मोठा जॉब करतात. माझ्या ओळखीत काही जणांनी काही काळ नोकरी केली खरी, पण पदवीचं शिक्षण अपूर्ण राहिल्याने पुन्हा त्यासाठी प्रवेश घेतला आहे. सतत काही तरी वेगळं करून पाहण्याचा ध्यास इथल्या माणसांना असतो आणि ते स्वातंत्र्य त्यांना हमखास मिळतं. शिस्त, मॅनर्स, एटिकेट्स पाळण्याकडे प्रत्येकाचाच कटाक्ष असतो. इथे बऱ्याच घरांवर यूएसएचा झेंडा किंवा त्यांच्या राज्यांचा झेंडा लावला जातो. इथल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा औद्योगिक परिसरांत झेंडा लावून त्यांचं राष्ट्रप्रेम व्यक्त करतात. कम्युनिटी सव्‍‌र्हिस खूप चालते. पुरासारखी आपत्ती असो किंवा अनाथाश्रमांना मदत असो, लोक नेहमीच त्यात सक्रिय सहभागी होतात. इथे फुटबॉल, बास्केटबॉल आणि उत्तरेकडच्या राज्यांत आइस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. नॅशनल फुटबॉल लीगची इथली तरुणाई फारच मोठय़ा प्रमाणात फॅन आहे.

अमेरिकेत भारतीय रेस्तराँ भरपूर आहेत. इथले लोक तिथे आवडीने जातात. त्यांना आपले पदार्थ थोडे त्यांच्या प्रकृतीला साजेसे करून खिलवले जातात. माझ्या ओळखीतले साऊ थ कोरियातून इथे आलेले काही जण पनीर अगदी आवडीने खातात. इथल्या भारतीय मार्केटमध्ये भारतीय माणसांपेक्षा इतरांची गर्दी अधिक असते. इथल्या तरुणाईला आशियापेक्षा युरोपची अधिक माहिती आहे. इथलं कलाविश्व प्रचंड ओपन आहे. दुसऱ्यांच्या कलागुणांचं स्वागत नेहमीच करून त्यांची दखल घेतली जाते. भारतीय संगीत इथे खूप लोकप्रिय आहे. ‘कार्निगे’ या न्यूयॉर्कमधल्या हॉलमध्ये अनेक भारतीय दिग्गज कलाकांराच्या कॉन्सर्टस् हाऊसफुल्ल होतात. मुंबईबद्दल अनेकांना आकर्षण वाटतं. आपली लोकसंख्या, लोकल ट्रेन, चित्रपटांविषयी अनेकदा प्रश्न विचारले जातात. भारतातले काही फिल्मस्टार्स इथे लोकप्रिय आहेत. आपला ‘थ्री इडियट्स’ जवळपास सगळ्यांनी पाहिलेला आहे. इथल्या काही मोजक्याच चित्रपट कलाकारांभोवती एक प्रकारचं वलय आहे, मात्र ही मंडळी हस्तिदंती मनोऱ्यातच न राहता आपली मतं मोकळेपणाने व्यक्त करतात. त्यावर लोक प्रतिक्रियाही व्यक्त करतात, पण त्याचे टोकाचे पडसाद उमटत नाहीत. कारण इथे कायमच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जातो.

viva@expressindia.com

First Published on January 12, 2018 12:35 am

Web Title: indian student experience in abroad indian youngsters in abroad