08 August 2020

News Flash

विरत चाललेले धागे : जुळत चाललेले धागे

एक समाज म्हणून आपला वारसा जपण्यात अक्षम्य बेजबाबदारपणा सर्व स्तरांमध्ये दिसून येतो.

विनय नारकर viva@expressindia.com

काही लोकांकडून असं नेहमी म्हटलं जातं की ही हातमागाची वस्त्रं, खादीची वस्त्रं महाग असतात, ती जनसामान्यांपर्यंत कशी पोहोचणार.. पण विणकरांना आताही योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांची नवीन पिढी या व्यवसायात येणार नाही आणि मला वाटतं ही वस्त्रं जनसामान्यांना परवडतील अशी बनवण्यापेक्षा ज्यांना परवडताहेत त्यांनी वापरणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

या सदरातून आपण गेले वर्षभर भारतीय वस्त्र परंपरेचा इतिहास, तिचा आवाका, त्यातील प्रवाह आदी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साडी या लोकप्रिय वस्त्र प्रकारापुरता हा अभ्यास मर्यादित न ठेवता, इतरही वस्त्र परंपरांच्या अंतरंगात डोकावून बघितले. कधी इतिहासाच्या अंगाने, कधी तांत्रिक अंगाने तर कधी सौंदर्यशास्त्राच्या अंगाने या वस्त्र परंपरांकडे पाहिले. वस्त्र परंपरा आणि भारतीय समाज यांचे सहजीवन हे आपल्या समाजाचे एक ठळक वैशिष्टय़ आहे. अफाट अशा भारतीय वस्त्र परंपरेची तोंडओळख होणे हे या लेखमालेचे उद्दिष्ट होते.

या वस्त्र परंपरांपैकी ज्या लोप पावल्या किंवा लोप पावत आहेत त्यांना जाणून घेऊन त्यांच्या ऱ्हासाच्या कारणांचा ऊहापोह केला. औद्योगिकीकरण, संस्थानं नष्ट होणे, स्वस्त पर्याय, वातावरणाशी सुसंगत वस्त्रे वापरण्याबद्दलची उदासीनता, वस्त्र परंपरेचे महत्त्व आणि सौंदर्य याबद्दल अनास्था ही काही महत्त्वाची कारणे या ऱ्हासामागे आहेत. हातमागाची वस्त्रे परवडत असून देखील आळशी आणि संकुचित वृत्तीचे दर्शन घडवत, त्यांची निगा राखण्याचा बाऊ  केला जातो. एक समाज म्हणून आपला वारसा जपण्यात अक्षम्य बेजबाबदारपणा सर्व स्तरांमध्ये दिसून येतो. या सगळ्या आव्हानांना तोंड देत भारतीय वस्त्र परंपराही आज उभी आहे.

जागतिकीकरणाने सर्व समाजांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकला. एक परिणाम असाही झाला की, मानवी समूहांना एकमेकांत मिसळताना ‘आपलं’ असं काय आहे, हा प्रश्न पडायला लागला. भारतीय वस्त्र परंपरा टिकाव धरण्यासाठी धडपडत असताना लोकांच्या लक्षात येऊ  लागले की या भारतीय वस्त्रांमुळे आपले वेगळेपण अधोरेखित होते आहे. निरनिराळ्या वस्त्र प्रकारांसाठी मागणी वाढू लागली. आपल्या विविध परंपरांचा शोध सुरू झाला. तसतसं लक्षात येऊ लागलं की अनेक वस्त्र प्रकार विणणारे विणकर बरेच कमी झाले आहेत तर काही पूर्णपणे संपले आहेत.

भारतीय लोकांच्या राहणीमानात आणि अभिरुचीतही या दरम्यान अमूलाग्र बदल झाले. त्यांच्या बदलत्या गरजा आणि अभिरुची, त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या हातमाग वस्त्रांमधून व्यक्त होऊ  शकत नव्हत्या. बहुतांश विणकरांना या बदलत्या समाजाचे भान नव्हते. त्यावेळी सरकारी संस्था व डिझायनिंग शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांनी मर्यादित स्वरूपाच्या हातमाग पुरुज्जीवन कार्यक्रमांना सुरुवात केली. अशा कार्यक्रमांनी डिझायनर्स आणि स्वयंसेवी संस्थांची गरज अधोरेखित केली. लोकांची बदलती गरज, अभिरुची आणि विणकरांचे कौशल्य यांचा सुमेळ घालण्याचे काम डिझायनर्स व स्वयंसेवी संस्था करीत आहेत.

काही डिझायनर्स परंपरा आणि समकालीनता यांची सांगड घालून वस्त्रनिर्मिती करत आहेत. काही डिझायनर्स, परंपरांवर चढलेली पुटं काढून त्यांना मूळ रूपात सादर करण्यासाठी झटताहेत, काहीजण विणकामातील फक्त तांत्रिक कौशल्याचा वापर करून, परंपरांपासून पूर्णपणे वेगळी निर्मिती करताना दिसत आहेत. हे प्रयोग करणे ही एकप्रकारे साधनाच आहे. बहुतांश विणकर हे छोटय़ा छोटय़ा गावांमध्ये, दुर्गम भागांमध्ये राहातात, त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. अशा प्रयोगांसाठी विणकरांना तयार करणं, ते प्रत्यक्षात उतरवणं आणि मग लोकांपर्यंत हे पोहचवणं ही किमया साधावी लागते. या अविरत कष्टांनी आणि कल्पकतेने हातमाग वस्त्रांना एक वलय मिळत चालले आहे. या सगळ्या प्रयत्नांना लोकांचाही वाढता प्रतिसाद मिळतो आहे.

काळाच्या ओघात काही परंपरा लुप्त झाल्या, कित्येक कौशल्ये लयास गेली, पण जे शिल्लक आहे किंवा जे पुनर्जीवित करणं शक्य आहे, त्यासाठी संघटित व असंघटित प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी विणकरांनीही संघटित होऊन स्वत:चे हित जपण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी काही संस्था विणकरांना मदत करत आहेत. विणकरांसाठी शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात आहे. हे सगळं होत असतानाही विणकरांची नवी पिढी निर्माण होणं हे खूप मोठं आव्हान ठरतं आहे.

काही लोकांकडून असं नेहमी म्हटलं जातं की ही हातमागाची वस्त्रं, खादीची वस्त्रं महाग असतात, ती जनसामान्यांपर्यंत कशी पोहोचणार.. पण विणकरांना आताही योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांची नवीन पिढी या व्यवसायात येणार नाही, आणि मला वाटतं ही वस्त्रं जनसामान्यांना परवडतील अशी बनवण्यापेक्षा ज्यांना परवडताहेत त्यांनी वापरणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

भारतीय हातमाग वस्त्र परंपरेने अत्यंत रोमांचकारी प्रवास करत हा देदीप्यमान वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, त्यामध्ये भर घालून पुढील पिढीकडे तो सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 2:51 am

Web Title: indian textile traditions indian handloom textiles popular clothing type
Next Stories
1 ‘जग’ते रहो : मन रमवणारी सिअ‍ॅटलवारी!
2 ‘कट्टा’उवाच : डायरी
3 ‘पॉप्यु’लिस्ट : संगीतातला भक्तिरस..
Just Now!
X