छांदसी बहुळकर, क्वात्रबोन, मॉरिशस

मॉरिशस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग निळाशार समुद्र. पांढऱ्या वाळूची किनारपट्टी आणि लगून्स. हनीमून डेस्टिनेशन, रोमँटिक गेटअवे, लँड ऑफ रेनबो अँड शूटिंग स्टार्स, डोडो पक्ष्याचा देश अशी अनेक समीकरणं या छोटय़ा बेटाला जोडली गेली आहेत. मार्क ट्वेन यांनी ‘मॉरिशस वॉज मेड फर्स्ट अँड देन हेवन, हेवन बीइंग कॉपीड आफ्टर दॅट’, अशा खूप सुंदर शब्दांत मॉरिशसचं वर्णन केलं आहे. माझी मॉरिशसशी पहिली ओळख झाली ती लग्नानंतर. माझा नवरा द्वितील माहिमकरच्या नोकरीनिमित्त. विमानातून प्रथमदर्शनी मॉरिशस बघताच मी प्रेमात पडले. अथांग निळाशार समुद्र. त्यावर लाटांची चकचकीत पांढरी रेष; त्या निळाईच्याही किती वेगवेगळ्या छटा.. मधेच गडद निळा मधेच मोरपिशी; मधेच हिरवट-निळी झळाळी तर मधेच जांभुळकी छटा.. नजर जाईल तिकडे हिरवळ. उसाची लागवड. छोटय़ा टेकडय़ा. डोंगरांच्या रांगा, टुमदार घरं आणि क्वचितच दिसणाऱ्या उंच इमारतींचा हा छोटासा देश (जेमतेम मुंबईएवढा). नेत्रसुख म्हणतात ते हे! पुढील काही र्वष निसर्गाच्या सान्निध्यात जाणार, या खुशीत मी मॉरिशसच्या धरतीवर पाऊल टाकलं. आम्हाला एअरपोर्टवर आणायला आमचे घरमालक सपत्नीक आले होते. त्यांना भारतीय पोशाखात बघून भारतातच असल्यासारखं वाटलं. मॉरिशसला येऊन आणि क्वात्रबोनला राहायला लागून सहा र्वष झाली तरी भावना अजून तीच आहे.

ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?
Director Actor Jitendra Barde movie Morya marathi movie
जातीच्या दुष्टचक्राची वास्तव मांडणी

भारत आणि मॉरिशसचं अतूट नातं आहे. माझ्यासाठी मॉरिशस म्हणजे ‘मिनी-इंडिया’ आणि मॉरिशसला भारत म्हणजे ‘बडा भाई’. मॉरिशसमधील बहुतांश जनसंख्या हिंदू आहे. प्रथम १८३४मध्ये भारतीयांना इंडेन्चर्ड लेबर्स म्हणून मॉरिशसला आणलं गेलं. १८३४-१९२४ या काळात भारतातील विविध प्रांतांतून विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र येथून ४ लाख ५३ हजार ०६३ इंडेन्चर्ड लेबर्स आणण्यात आले, त्यात जवळजवळ ५० हजार मराठी माणसांचा समावेश होता. आज हे सगळे लोक इकडे मानाने राहतात. त्यातले काही तर इकडचे राज्यकर्ते होऊन देश सांभाळत आहेत. या सगळ्यांनाच आपण मॉरिशन असल्याचा अभिमान आहे. भारत त्यांची जन्मभूमी नसली तरी पुण्यभूमी मात्र निश्चित आहे. देशांतर करून आलेल्या भारतीयांना प्रथम ‘द इमिग्रेशन डेपो’ या ठिकाणी उतरवलं जाई. आज राजधानी पोर्ट लुईसमधली ही ऐतिहासिक जागा ‘अप्रवासी घाट’ म्हणून संबोधली जाते आणि ‘जागतिक वारशा’चा दर्जा तिला लाभला आहे. त्या भारतीयांची माहिती आजही तिथल्या रजिस्टरमध्ये मिळू शकते. त्या लोकांबरोबर त्यांचे धर्म, रीतीरिवाज, सण, उत्सव इकडे आले आणि येथील मोकळ्या वातावरणात रुजले. लाखो वर्षांपूर्वी पाण्याखाली लाव्हाच्या उद्रेकातून मॉरिशसभूमी अस्तित्वात आली, असं भूगोल सांगतो. मॉरिशसचा इतिहास रोमांचक असून  मॉरिशसच्या सध्याच्या मल्टि-कल्चरल आयडेंटिटीची मुळं या इतिहासात दडली आहेत. मॉरिशसवर अनुक्रमे डच (१६३८-१७१०), फ्रेंच (१७१०-१८१०) आणि ब्रिटिश (१८१०-१९६८) यांची राजवट होती. १२ मार्च १९६८ रोजी मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पन्नास वर्षांत मॉरिशस एक प्रदूषणविरहित, शिस्तबद्ध, स्वछ, शांतताप्रिय, उच्चमध्यमवर्गीय राहणीमान असलेला देश आहे. आजचा मॉरिशस भारतीय संस्कृती आणि फ्रेंच राहणीमानाचा संगम आहे.

मॉरिशिअन तरुण पिढी उत्साही आणि स्टायलिश आहे. लग्न झाल्यावर, फ्रेंच जीवनशैलीनुसार ही तरुण मंडळी आईवडिलांपासून वेगळी राहतात, पण त्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे पालक आणि  इतर नातेवाईकांबद्दल खूप आत्मीयता आणि जिव्हाळा वाटतो. करिअर, सोशल आउटिंग्ज आणि फॅमिली गेटटुगेदर्सचा समतोलही ते सांभाळतात. समुद्रकिनारी मित्रपरिवारासोबत गप्पा मारत, बिअर पीत बसणं हे इथल्या रविवारचं चित्र. मॉरिशन माणसाला बिअर अत्यंत प्रिय! शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस कलिग्सबरोबर ड्रिंक्स घेणं, सोशिअलाइझ करणं हा जणू अलिखित नियम. इथल्या सगळ्याच वयोगटातील लोकांचा फिट राहण्याकडे कल आहे. जिममध्ये तरुण-तरुणींची गर्दी असते तर इतर लोक मॉर्निग-इव्हनिंग वॉक करताना दिसतात. जागोजागी वॉकिंग ट्रॅक्स आणि जॉगिंग पार्क्‍स आहेत. युरोपप्रमाणे मॉरिशसमध्येही  फुटबॉल फॅन्स जास्त आहेत. पब्ज किंवा बारमध्ये एकत्र जमून फुटबॉल मॅच बघणं, आपल्या टीमला चिअर करणं हा इथल्या तरुणाईचा आवडता छंद. मैदानी खेळ खेळायला तरुण मंडळींना आवडतात, त्यामानाने वॉटरस्पोर्ट्सकडे कल कमी आहे. मॉरिशन माणूस हा मुळात धार्मिक आहे. हिंदू धर्मीयांच्या घराच्या बागेतील एखाद्या कोपऱ्यात लहान-सुबकसे मंदिर बांधून घेतलेले असते. गंमत म्हणजे इकडे रोमन लिपीतली पोथी, श्लोकांची पुस्तकं सर्रास मिळतात. देवनागरी न वाचता येणारी मंडळी रोमन लिपीतले श्लोक म्हणतात. ख्रिस्ती मॉरिशन रविवारी आवर्जून चर्चमध्ये जातो, शुक्रवारचा नमाज चुकवणारा मुस्लीम मॉरिशन क्वचितच. याला तरुण पिढी अपवाद नाही.

मॉरिशस हे हॉलिडे डेस्टिनेशन. साहजिकच इकडे खाण्यापिण्याची रेलचेल आहे. मॉरिशिअन, इंडियन, चायनीज, फ्रेंच, थाई, इटालियन असे वेगवेगळे कुझिन्स मिळतात. भारतासारखं मॉरिशसचं स्ट्रीट फूड खूप प्रसिद्ध आहे. अननस, लिची, लोंगान, संत्री, केळी, पपई, पॅशनफ्रुट अशी बरीच ट्रॉपिकल फळं इथं मुबलक आणि चविष्ट मिळतात. मॉरिशन मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल मला खूप कुतूहल होतं. हळूहळू कळत गेलं की, खूप पिढय़ांपूर्वी आलेल्या या मराठी मंडळींनी त्यांची खाद्यसंस्कृती जपली आणि जोपासली आहे. इकडच्या मराठी घरांमध्ये सणासुदीला मोदक, पुरणपोळी, अळूवडी, आमटी, करंजी हे प्रकार आवर्जून बनवले जातात. हे पदार्थ दिसायला आपल्या पदार्थासारखे असले तरी बनवण्याची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे, चवीतही बराच फरक आहे. पण त्यांचा आपली संस्कृती, रीतिरिवाज आणि खाद्यपदार्थ जोपासण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. तरुणपिढीतही हा मराठी बाणा रुजलेला दिसतो. त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम आहे, तुटकं का होईना, पण ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. काहीजण माझ्याकडे मराठी शिकायलादेखील येतात. या सगळ्याचं मला खूप अप्रूप वाटतं. माझी विद्यार्थिनी मला एकदा म्हणाली, ‘आज माझा उपवास आहे’. मी म्हणाले, ‘तुम्हीही उपवासाला साबुदाणा खिचडी खाता का?’ त्यावर ‘साबुदाणा खिचडी काय असते? नो नॉनव्हेज आणि नो दारू म्हणजे आमचा उपवास’,  हे तिचं उत्तर ऐकून मी चाटच पडले.

मॉरिशसमध्ये विविध मॉल्स, लहानमोठी सुपरमार्केट्स असली तरी आठवडी बाजारही भरतो. स्थानिक भाषेत त्याला ‘ला फॉयर’ म्हणतात. आठवडय़ातल्या ठरावीक दिवशी भाजी-फळं आणि ठरावीक दिवशी कपडे, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू मिळतात. ‘ला फॉयर’मध्ये कायमच खूप गर्दी असते. इथे फिरायला आणि खरेदी करायला खूप मजा येते. फ्रेंच बोलायची सवय व्हावी म्हणून मी फ्रेंच बोलायला गेले तरी भाजीवाले, दुकानवाले हमखास हिंदी किंवा इंग्लिशमधूनच उत्तर देतात. फ्रेंच आणि क्रिओल ही बहुतांश बोलली जाणारी भाषा असली तरी सगळ्यांना हिंदी किंवा इंग्लिश येतं. त्यामुळे भाषेची अडचण जाणवत नाही. बहुतांश लोकांकडे स्वत:च्या गाडय़ा आहेत आणि ते गाडय़ांतून फिरतात. तरीही ऑफिस अवर्स वगळता फारसं ट्रॅफिक दिसत नाही. इथल्या ट्रॅफिकलाही एक शिस्त आहे, उगाच गाडी घुसवण्यासारखे प्रकार नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची नसली तरी मॉरिशन माणसाकडून सहसा त्याबद्दल तक्रार ऐकायला येत नाही. आता इकडे मेट्रोचं काम सुरू झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नक्कीच सुधारणा होईल.

आमच्यासारखी अनेक भारतीय तरुण मंडळी वेगवेगळ्या प्रांतांतून इथे नोकरीनिमित्त येतात. टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स आणि टेक्सटाइल ही इथली मुख्य क्षेत्रं. आम्हाला भावतं ते इथलं हाय क्वॉलिटी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मॉरिशसमध्ये राहताना आपण भारतापासून खूप दूर आहोत असं वाटत नाही. आम्हाला महाशिवरात्र, गुढीपाडवा, गणपती, दसरा, दिवाळीची सुट्टी असते. आम्ही दिवाळी साजरी करतो, तेव्हा आजूबाजूला मॉरिशिअन घरांमध्येही रोषणाई असते. दिवाळीला आपल्याप्रमाणे मॉरिशिअन शेजारी आम्हाला मॉरिशिअन फराळ आणून देतात. तरुणाई आजकाल विकतचा फराळ आणून देतात. मात्र आमच्या आधीची पिढी मात्र घरीच फराळ बनवते.

आर्ट, थिएटर, सांस्कृतिक कार्यक्रमांची मात्र मला खूप उणीव भासते. त्यासाठी आम्ही इथे मराठी मंडळ सुरू केले आहे. गुढीपाडव्याला मराठी भाषेतील मनोरंजनात्मक कार्यक्रम, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, श्लोक व पाठांतर स्पर्धा असा सांस्कृतिक सोहळा असतो. सुरुवातीला आम्ही जेमतेम चाळीसजण होतो. आज ही संख्या शंभरच्या वर गेली आहे. पण मॉरिशिअन माणसाला आणि तरुण पिढीला बहुधा अशी उणीव जाणवत नसावी. आपण, आपले घर, आपली नोकरी, लाइफ एन्जॉय करणं, रिलॅक्स करणं आणि समुद्रकिनारी बिअर पिणं यात तो तृप्त आहे. इतर ठिकाणांपेक्षा एंटरटेन्मेंट मीडिया, सोशल मीडियाचा प्रभाव त्या मानाने इथल्या लहान मुलांवर, तरुणाईवर फारच कमी आहे आणि त्यामुळे इथल्या मुलांमध्ये दुर्मीळ होत चाललेला एक निरागसपणा अजूनही बघायला मिळतो.

व्यक्तिश: मला कायमस्वरूपी राहायला मॉरिशस डायनॅमिकपेक्षा मोनोटोनस जास्त वाटतं. निसर्गरम्यता आणि सुखसुविधा इकडे असल्या तरी मुंबईचा केऑस आणि क्रेझीनेस मी खूप मिस करते. पण मॉरिशसला एक स्वत:चा चार्म आहे. एखाद्या परकीयालाही ते नुसतंच सामावून नाही घेत तर आपलंसं करून घेतं. मॉरिशसचं वेगळेपण हे इथल्या लोकांच्यात दडलंय. नवीन काळाशी जुळवून घेऊन त्यांनी मॉडर्न राहणीमान स्वीकारलं आहे आणि तरी ही साधी माणसं आपली संस्कृती जतन करण्यासाठी झटत आहेत. आधुनिकता आणि परंपरेचा समतोल राखण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत. भारत सोडून परदेशी स्थायिक झालेल्यांमध्ये किंबहुना त्यांच्या पुढच्या पिढय़ांमध्ये भारताबद्दलची ओढ, आत्मीयता कमी झालेली जाणवते. याला अपवाद मॉरिशस.

viva@expressindia.com