12 December 2017

News Flash

ब्रॅण्डनामा : नटराज पेन्सिल

नटराज आणि अप्सरा हे दोन्ही ब्रॅण्ड जगभरात ५० देशांत विकले जातात.

रश्मि वारंग | Updated: September 29, 2017 12:35 AM

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

लहानपणीच्या काही आठवणी पुसू म्हणता पुसता येत नाहीत. या आठवणींमध्ये एक कप्पा आहे जाहिरातींचा. परीक्षांचे दिवस आले की, एक जाहिरात हमखास आठवते. रनिंग ट्रॅकवर पेन्सिल्स लिहिण्याच्या शर्यतीत उतरल्या आहेत. धावता धावता एका पेन्सिलचं टोक मोडतं, बाकीच्या पेन्सिल्स गडबडतात पण एक पेन्सिल अगदी सहज स्पर्धा जिंकते. कानावर वाक्य पडतं.. ‘और नटराज फिरसे चॅम्पियन.’ या जाहिरातीतल्या त्या देखण्या लाल-काळ्या-उभ्या पट्टय़ांच्या पेन्सिलने आपल्यापैकी अनेकांचं बालपण लिहितं केलं. पेन्सिलने लिहिण्याशी संपर्क तुटला असला तरी भारतातील या सुप्रसिद्ध पेन्सिल ब्रॅण्डविषयी जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल.

स्वातंत्र्यपूर्व काळातही भारतात पेन्सिल उत्पादन होत होतं, पण जर्मनी, जपान, इंग्लंड इथून आयात होणाऱ्या परदेशी बनावटीच्या पेन्सिल्ससोबत तगडी स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परदेशातून येणाऱ्या पेन्सिल्सचा ओघ आटला आणि आपल्या देशी पेन्सिलच्या उत्पादनाला चालना मिळाली. त्यात अनेक कंपन्या पेन्सिल बनवू लागल्या. १९५८ साली हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्टेशनरी वस्तू निर्माण करायला सुरुवात केली. या कंपनीची नटराज पेन्सिल अतिशय गाजली. ६२१बी स्पेशल बॉण्डेड लीड असणारी लाल-काळ्या पट्टय़ातील नटराज पेन्सिल भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. विद्यार्थीच नाही तर सुतारकाम करणारे कारागीर, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी सगळ्यांचीच ‘नटराज’ आवडती झाली. नटराजच्या जुन्या जाहिरातीतून तिचा ‘बोल्डपणा’ अधोरेखित होत राहिला. नटराजची एक छापील जाहिरात आठवते. जोराने डळकारी फोडणारा सिंह आणि खाली कॅप्शन.. ‘फॉर व्हेन यू वॉण्ट युअर रायटिंग साऊंड लाईक धिस’.. नटराज पेन्सिल. नंतर ‘चलती ही जाए’ किंवा ‘नटराज मेक्स यू विनर’ ही टॅग लाइन वापरली जाऊ  लागली. हिंदुस्थान पेन्सिलची नटराज जितकी लोकप्रिय झाली तितकीच ‘अप्सरा’ही गाजली. या एक्स्ट्रा बोल्ड पेन्सिलने एक्स्ट्रा मार्क्‍स मिळवून द्यायचं आश्वासन दिलं.

या दोन अत्यंत लोकप्रिय पेन्सिलसह हिंदुस्थान पेन्सिल मार्केटमध्ये ६०/६५ टक्क्यांहून अधिक शेअर बाळगून आहे. आज हिंदुस्थान पेन्सिलच्या भारतातील ५ ठिकाणच्या १० फॅक्टरीजमधून दर दिवसाला जवळपास ६ ते ८ लाख पेन्सिल्स, दीड लाख शार्पनर्स, अडीज लाख खोडरबर, एक लाख पट्टय़ा आणि १ लाख पेनांचं उत्पादन होतं. याशिवाय रंग आणि रंगीत पेन्सिलीसुद्धा तयार होतात.

नटराज आणि अप्सरा हे दोन्ही ब्रॅण्ड जगभरात ५० देशांत विकले जातात. या पेन्सिलचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्या नॉनटॉक्सिक आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकनाने त्यांना मान्यता दिली आहे. पेन्सिल म्हटलं की वृक्षतोड आलीच, पण या पेन्सिलसाठी कंपनीने उजाड माळावर विशेष वृक्षलागवड केली आहे. त्याच्यापासून पॅकिंगसाठी रिसायकल केलेला पुठ्ठा वापरला जातो. त्या अर्थाने हा ब्रॅण्ड पर्यावरणस्नेही आहे.

चायनीज पेन्सिलनी भारतात स्वत:चा पाय रोवण्याचा प्रयत्न करूनही या ब्रॅण्डला धक्का लागला नाही हे विशेष. त्यामुळे आजही परिक्षा असो किंवा चित्रकला स्पर्धा नटराज आणि अप्सराचीच आठवण होते. लहानपणी कंपासमध्ये कितीही पेन्सिली भरल्या असल्या तरी खरी शोभा यायची ती नटराज पेन्सिलीनेच. त्यातही वर्गात कुणाचा वाढदिवस असला की वाढदिवसाची भेट म्हणून नटराज पेन्सिल अगदी हक्काची होती. आजच्या पिढीला ‘अप्सरा’ अशी जवळची वाटते. शाळेच्या दिवसात वर्गात पेन्सिलला टोक काढण्याच्या नावावर टाइमपास करणे, चाळा म्हणून पेन्सिलीचं पाठचं टोक चघळणे, पेन्सिलच्या टोक काढून उरलेल्या भागाची फुलं बनवणे अशा फावल्या वेळातल्या उद्योगांना या पेन्सिलनी मोलाची साथ दिलेली असते. आजही कुठे नटराजचे लाल-काळे पट्टे दिसले की झर्रकन् मधला काळ गळून आपण शाळकरी होतो.

काही ब्रॅण्डमध्ये काळाचे काटे मागे फिरवायची ताकद असते.. त्याची जर शर्यत लावायची झाली तर तिथेही ‘नटराज इज ऑलवेज चॅम्पियन!’

viva@expressindia.com

First Published on September 29, 2017 12:35 am

Web Title: information on natraj pencil