18 November 2017

News Flash

ब्रॅण्डनामा : निरमा

गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला

रश्मि वारंग | Updated: July 7, 2017 4:41 AM

नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

काही माणसं जन्माला येतात तेव्हा ती तुमच्या-आमच्यासारखी सामान्य असतात पण कामगिरी अशी करतात की, असामान्य होऊन जातात. घरच्या कपडय़ांच्या धुलाईची पावडर ही गोष्ट इतकी साधी आणि रोजची की त्यामागे एखादी विलक्षण कहाणी दडली असण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. पण प्रत्यक्षात असं एका ब्रँडच्या बाबतीत घडलं.हा ब्रँड म्हणजे निरमा.

निरमा धुलाई पावडर, साबण, मीठ, सौंदर्य प्रसाधने अशा विविध उत्पादनांचा कर्ता निरमा उद्योग समूह. छोटय़ा छोटय़ा पायऱ्यांवरून माणूस मोठय़ा स्वप्नांची भरारी कशी घेऊ  शकतो याची कहाणी म्हणजे ब्रँड निरमा.

गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी केली. त्यानंतर गुजरात सरकारच्या भूगर्भ आणि खाणकाम विभागात कामाचा अनुभव घेतला. सरकारी नोकरी चांगली चालू होती; पण उपजत व्यापारी वृत्ती करसनभाईंना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या घरच्या अंगणात त्यांनी धुलाई पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. अगदी घरगुती पद्धतीने ही पावडर तयार होत असे. नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात करसनभाई सायकलवरून गावागावांत फिरत आणि ३ रु . किलो इतक्या स्वस्त दराने ही घरगुती धुलाई पावडर दारोदार विकत. त्या पावडरची बांधणीही घरगुती होती. हळूहळू या धुलाई पावडरबद्दल स्त्री वर्गाकडून चांगला प्रतिसाद येऊ  लागला. करसनभाईंचा हा लघुउद्योग एक ब्रँड होऊ  घातला होता. आपल्या मुलीच्या नावावरून त्यांनी या पावडरला ‘निरमा’ असं नाव दिलं. आणि करसनभाईंची घरगुती धुलाई पावडर झाली ‘निरमा वॉशिंग पावडर’. नोकरी सांभाळून सायकलवरून केलेला हा व्यवसाय भविष्यात इतका विस्तारेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

उद्योगात जम बसल्यावर करसनभाईंनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर घरी वादळ झालंच. तरी करसनभाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी छोटंसं वर्कशॉप सुरू केलं. पावडरचा दर कमी ठेवत विक्री सुरू झाली. प्रतिसाद छान मिळत होता. सगळं सुरळीत असतानाही व्यावसायिकाला अडचणींना तोंड द्यावं लागणं धंद्यात नवीन नाही. करसनभाई याला अपवाद नव्हते. त्यांनी नेमलेले विक्रेते जेव्हा दुकानात माल घेऊन जात तेव्हा दुकानदार माल ठेवून घेत; पण पैसे वसुलीच्या वेळी हात वर करत किंवा थातूरमातूर रक्कम देऊन विक्रेत्यांना वाटेला लावत. बाजारात निरमाची अशी खूप थकबाकी जमू लागली. आधीच्या वसुलीशिवाय उद्योग चालवणं कठीण झालं. तेव्हा करसनभाईंनी एक धाडसी निर्णय घेतला. सगळ्या निरमा विक्रेत्यांची त्यांनी एक बैठक बोलावली. दुसऱ्याच दिवशी विक्रेते मिळतील तर पैसे किंवा दुकानातील माल घेऊन परत आले. बाजारातून सगळा माल करसनभाईंनी काढून घेतला. मग त्यांनी टीव्ही, रेडियोचा आधार घेत महिनाभर जाहिरातींचा धूमधडाका उडवून दिला. महिनाभर सतत वाजणाऱ्या जाहिरातींमुळे महिला वर्गात निरमाचा इतका प्रचार झाला की त्या दुकानदारांकडे जाऊन स्वतहून निरमा मागू लागल्या. पण दुकानांतून तर निरमा गायबच झाली होती. याच क्षणांची करसनभाई वाट पहात होते. ज्या दुकानदारांकडे ‘पैसे द्या’ म्हणून मागे लागावं लागे, तेच आज ‘काहीही करा पण माल द्या’, अशी मागणी करत होते. त्यानंतर दुकाना दुकानात माल पोहोचला; पण थकबाकी ठेवणं बंद झालं. छोटय़ा युक्त्या व्यवसायात कशा उपयोगी ठरतात आणि त्याच पुढे व्यवसायाचा फंडा कशा बनतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.

निरमाच्या यशात जाहिरातींचा वाटा मोठा आहे. ‘निरमा. वॉशिंग पावडर निरमा. दुधसी सफेदी निरमासे आए, रंगीन कपडाभी खिल खिल जाए’ या ओळी एकेकाळी गाण्याप्रमाणे ओठांवर रुळल्या होत्या. ‘सबकी पसंद निरमा’ ही टँगलाइन आजही वापरली जाते. निरमा या अक्षरामधली ती हात फैलावणारी निरमा गर्ल आजही स्वस्त पण मस्त धुलाईचा विश्वास देते. ३ रु. किलो इतक्या दराने सुरू झालेला हा उद्योग आज विविध उत्पादनांच्या माध्यमातून पाच हजार कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. स्वत:ची नोकरी सांभाळून व्यवसाय सुरू करणाऱ्या करसनभाईंकडे चौदा हजार कर्मचारी आज काम करत आहेत.

स्वत:वर विश्वास असेल, योग्य दिशेचा अंदाज असेल आणि काही धाडसी पावलं उचलायची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही, हे करसनभाईंनी दाखवून दिले. १९९० साली करसनभाईंना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ साली फोब्र्ज मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत माणसांची यादी जाहीर केली त्यात करसनभाई ९२व्या क्रमांकावर होते. त्यांनी यंत्रांचा वापर कमी करून मनुष्यबळाचा वापर जास्त केला आणि व्यवसायवृद्धी केली. या कामगिरीसाठीच त्यांना  २०१० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निरमा उद्योगाच्या अनेक लोकोपयोगी कामांपैकी एक म्हणजे निरमा शैक्षणिक संस्था.

ऐंशीच्या दशकात अनेक परदेशी धुलाई पावडर बाजारात आल्या. निरमाला मोठी स्पर्धा निर्माण झाली. तरीही तळागाळातील एक मोठा ग्राहक वर्ग निरमाने आजही बाळगला आहे. निरमाच्या जाहिरातीतल्या हेमा, रेखा, जया आणि सुषमा, सर्वसामान्य स्त्रीवर्गाला आजही साद घालताना दिसतात. या ब्रँडचं वैशिष्टय़ं म्हणजे हा ब्रँड कायम सर्वसामान्यांचाच राहिला. हेच त्यांचं यशही म्हणता येईल आणि मर्यादाही. क्यूंकी कई बार आम होनाही, अपने आपमे खास होता है!

viva@expressindia.com

First Published on July 7, 2017 12:34 am

Web Title: information on nirma brand nirma products