18 November 2017

News Flash

ब्रॅण्डनामा  : रॉयल एनफिल्ड

रस्त्यावरून ही भारदस्त बुलेट तिच्या टिपिकल आवाजासह आपल्या बाजूने जाते तेव्हा कौतुकाने मान वळल्याशिवाय

रश्मि वारंग | Updated: June 30, 2017 5:42 AM

नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

एखादा ब्रँड वापरणं हा विशिष्ट काळात स्टाइलचा, प्रतिष्ठेचा भाग असतो पण काही ब्रँड मात्र सदासर्वदा ‘स्टाइल स्टेटमेंट’ होऊन फिरत असतात आणि असा शब्दश: रॉयल कारभार म्हणजे ‘रॉयल एनफिल्ड’ बाइक्स. रस्त्यावरून ही भारदस्त बुलेट तिच्या टिपिकल आवाजासह आपल्या बाजूने जाते तेव्हा कौतुकाने मान वळल्याशिवाय राहात नाही. ‘एनफिल्ड’ वापरणारे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात आणि ज्यांच्याकडे ती नाही तेही कधीतरी ही बाइक माझी होईल, अशा प्रेमवीराच्या थाटात आशेवर असतात. हा रॉयल कारभार आकाराला कसा आला याची कहाणी बुलेटप्रेमींना जाणून घ्यायला निश्चित आवडेल.

इंग्लंडमधल्या जॉर्ज टाऊनसेंड नामक इसमाने शिवणाच्या मशीनच्या सुया तयार करण्याचा उद्योग १८५१ मध्ये सुरू केला. हळूहळू त्याने सायकलचे पार्ट्स आणि नंतर सायकल्स बनवायला सुरुवात केली. कालांतराने व्यवसायाला नुकसानीचा फटका बसला. मग १८९१ मध्ये आर. डब्ल्यू. स्मिथ आणि अल्बर्ट एडी यांनी ही सायकल कंपनी विकत घेतली. इंग्लंडमधील एनफिल्ड रोडवर ही कंपनी असल्याने या कंपनीला नाव दिले ‘एनफिल्ड मॅन्युफॅक्चिरग कंपनी लिमिटेड’. १८९३ मध्ये या कंपनीला ‘रॉयल स्मॉल आम्र्स फॅक्टरी’कडून रायफलचे काही भाग बनवायची मोठी ऑर्डर मिळाली. ब्रिटिश सैन्याशी निगडित ही ऑर्डर खूपच प्रतिष्ठेची होती. तिचा व्यवसायात वापर करून घेण्यासाठी सायकल कंपनीच्या नावातच ‘रॉयल’ हा शब्द वाढवण्यात आला. आणि त्यातून निर्माण झालं नाव ‘रॉयल एनफिल्ड.’ या ठिकाणी ‘रॉयल एनफिल्ड’च्या ट्रेडमार्कमधल्या ‘मेड लाइक अ गन’चा अर्थ उलगडतो.

अशा या सायकल कंपनीने १९०१ मध्ये आर. डब्ल्यू. स्मिथ आणि ज्युलस गोटीएट याच्या संकल्पनेतून पहिली मोटारबाइक बनवली. हळूहळू कंपनी वाढत असताना पहिल्या महायुद्धाच्या काळात मोटारबाइक्सची मोठी ऑर्डर कंपनीला मिळाली. १९३२ मध्ये पहिल्यांदा ‘रॉयल एनफिल्ड’ची बुलेट अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी अवतरली. यानंतरचा भारतीयांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला टप्पा म्हणजे ‘मद्रास मोटर्स’च्या के. आर. सुंदरम अय्यर यांनी ‘रॉयल एनफिल्ड’ भारतात आयात करायला सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने पहिल्यांदा ‘रॉयल एनफिल्ड’ आपल्या रस्त्यांवर धडधडत धावू लागली. भारतीय सेनादलात या बुलेटला विशेष मागणी होती. ते लक्षात घेऊन भारतासाठी ‘मद्रास मोटर्स’शी भागीदारी करत ‘एनफिल्ड इंडिया’ ही कंपनी तयार झाली. चेन्नईजवळच्या तिरुवोट्टीयार इथे हा प्लांट सुरू झाला जिथे बाइकचे कीट इंग्लंडहून येत असे आणि भारतात त्याची जोडणी केली जाई. पुढे ‘इचर’ग्रुपने ‘एनफिल्ड इंडिया’ विकत घेतल्यावर कंपनीचे नाव ‘रॉयल एनफिल्ड मोटर्स लिमिटेड’ असे झाले. या संपूर्ण प्रवासात अनेक बाइकरेस जिंकणारी गाडी, सेनादलाची खास विश्वासातली ‘रफ आणि टफ’ बुलेट ही ओळख ‘रॉयल एनफिल्ड’ने मिळवल्यामुळे ग्राहकांच्या मनात या बाइकने नेहमीच एक विश्वासाची जागा संपादन केली. २००१ मध्ये भारतीय सेनादलाच्या मोटरसायकल डिस्प्ले टीमने दहा ‘रॉयल एनफिल्ड्स’वर २०१ सैनिकांचा मानवी मनोरा रचला आणि ही बुलेट नव्याने चच्रेत आली.

आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावताना ‘रॉयल एनफिल्ड’ने खपाच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पध्र्याना केव्हाच मागे टाकले आहे. वेगवेगळ्या काळात आलेल्या ‘एनफिल्ड’च्या मॉडेल्सना नेहमी उत्तम प्रतिसाद मिळाला. २००५ मध्ये ‘एनफिल्ड’ची भारतातील पन्नाशी साजरी करताना ‘थंडरबर्ड’ आणि ‘३५० इलेक्ट्रा’ ही मॉडेल्स बाजारात आणली गेली.

या बुलेटचं एक खास वैशिष्टय़ म्हणजे किशोर आणि जयाकुमार हे बंधू जगातील एकमेव असे उदाहरण आहेत जे ‘रॉयल एनफिल्ड’चे कँनिस्टर हँडपेंट करतात.

बुलेटच्या दुनियेत ‘रॉयल एनफिल्ड’ हे खूप जुनं नाव! तरीही ही गाडी दारात येण्यासाठी तिची वाट पहाणारे अधिक. गेल्या दशकभरात ‘एनफिल्ड’ रस्त्यावर सहज आढळू लागली आहे. इतक्या सहजपणे दिसूनही तिची शान, रुबाब कमी झालेला नाही हे विशेष.

भारदस्तपणा हा या गाडीचा सगळ्यात लय भारी भाग. त्यामुळे सेनादलापासून राजकीय रॅलीपर्यंत आणि बाइक रेसपासून गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सगळीकडे ती हवीहवीशी वाटते. बाइकवेडय़ांसाठी तर ही खास ब्लॅक ब्युटी. अर्थात आता वेगवेगळ्या रंगात ती उपलब्ध झाली आहे. काही ब्रँडच असे असतात की स्वत:तले  गुण ते अलगद वापरकर्त्यांकडे सरकवतात. ‘रॉयल एनफिल्ड’ला स्टार्ट मारल्यावर बुलेटचा रांगडेपणा, शान, त्याचा एक रुबाबदारपणा चालवणाऱ्याकडेही आपसूकच येतो. आणि बघणारा मनापासून दाद देतो.. एकदम ‘रॉयल’ कारभार !

viva@expressindia.com

First Published on June 30, 2017 5:31 am

Web Title: information on royal enfield