अमेरिकेत ‘न्यूक्लिअर पॉवर प्लांट’मध्ये काम करणारी इंजिनीअर आणि नृत्य नाटय़ अकादमीची संचालिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या मधुराची आणि तिच्या अभिनयाच्या पॅशनची गोष्ट.

माझा छंद, माझी आवड म्हणजे मी आणि माझं काम म्हणजे मी. माझ्याकडे या दोन गोष्टी नसतील तर मी खरंच कुणीही नाही. कामावरची निष्ठा आणि छंदावरची श्रद्धा या दोन्ही गोष्टी जपण्याचं काम अमेरिकेत राहणाऱ्या मधुरा साने भिडे हिनं केलं. अभियांत्रिकी आणि नृत्य तसं पाहायला गेलं तर दोन वेगळी टोकं पण त्याला सांधण्याचं काम मधुरा करतेय. आर्किटेक्चरची पदवी, स्ट्रक्चरल इंजिनीअर म्हणून अमेरिकेतल्या ‘न्यूक्लिअर पॉवर प्लांट’साठी केलेलं काम या निमित्ताने ती अमेरिकेच्या कॉर्पोरेट विश्वास आत्मविश्वासानं वावरली आणि त्यासोबत अभिनय आणि नृत्याची आवडही तिने जपली. अमेरिकेत नृत्य नाटय़ अकादमीची संचालिका म्हणून ती काम पाहते. या तिच्या संस्थेच्या अमेरिकेत सध्या तीन शाखा आहेत आणि अजूनही विस्तारत आहेत.

मधुरा मूळची मुंबईची. आयआयटीच्या शैक्षणिक वातावरणात तिचं बालपण गेलं. मधुराचे वडील आयआयटी मुंबईत प्रोफेसर होते आणि आईदेखील तिथेच कॉम्प्युटर विभागात नोकरीला होती. भाऊही इंजिनीअरच झाला. असं घरात सगळं शैक्षणिक वातावरण असताना आपण इंजिनीअर न होता आर्किटेक्ट व्हायचं असा निर्णय मधुराने घेतला. ती मुंबई विद्यापीठातून गोल्ड मेडलसह आर्किटेक्चरची पदवी मिळवली. नृत्य आणि अभिनय याकडे तिचा असणारा कल लक्षात घेऊन तिच्या आईने लहानपणीच आविष्कार नाटय़संस्थेत दाखल केलं. त्या वेळी तिथे सुलभा देशपांडे व रामनाथ थरवळ यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन मधुराला लाभलं. पद्मश्री डॉ. रोशन कुमारी यांच्याकडे तिचं कथक नृत्याचं प्रशिक्षणही सुरू होतं. वयाच्या १७व्या वर्षी मधुरा कथक नृत्यविशारद झाली. त्यानंतर तिने स्वत: नृत्याचे वर्ग घेणं सुरू केलं. नाटकात अभिनय, पथनाटय़, किलबिल, बालचित्रवाणी कार्यक्रम करणं लहानपणापासून चालू होतंच. थोडं मोठं झाल्यावर ती संजना कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटर’शी जोडली गेली. त्याच दरम्यान दोन चित्रपटातदेखील काम करण्याची संधी मिळाली. मात्र पुढच्या एका मोठय़ा रोलसाठीच्या ऑडिशनसाठी गेलेली असताना निवड झाल्यानंतर ‘तुला यात काम करायचं असेल तर आर्किटेक्चरचं शिक्षण सोडून पूर्ण वेळ यासाठी द्यावा लागेल,’ असं सांगण्यात आलं तेव्हा मात्र हातात आलेली संधी तिने नाकारली आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. हा तिच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट ठरला. तो तिला अमेरिकेत घेऊन गेला आणि तिथल्या कॉर्पोरेट विश्वाशी तिची ओळख झाली. आर्किटेक्चरची पदवी सुवर्णपदकासह मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय- अर्बाना श्ॉम्पेन येथे जाण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनी दिलेले पसे वापरायचे नव्हते, म्हणून मधुराने इंटर्नशिपसाठी प्रयत्न सुरू केले. प्रोफेसर अली यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चसाठी अर्ज केला, त्यामुळे फंिडगदेखील मिळालं. ‘स्ट्रक्चरल हिस्ट्री ऑफ टॉल बििल्डग’ यावर ते संशोधन आधारित होतं. त्यावर पुढे पुस्तकंही छापण्यात आलं. या पुस्तकाची सहलेखक म्हणून मधुराचं नाव आलं. याबद्दल सांगताना मधुर म्हणते, ‘‘या संशोधनासाठी मी संपूर्ण अमेरिकेतल्या उंच इमारतींचा अभ्यास केला. ९/११च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यापूर्वी दोन आठवडे मी त्याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. या संशोधनादरम्यान मला असं लक्षात आलं की, आर्किटेक्चरसोबत स्थापत्य (स्ट्रक्चरल) अभियांत्रिकी करायला आवडेल. मग मी डय़ुअल मास्टर्स कोर्स करण्याचं ठरवलं आणि तो पूर्ण केला.’

शिक्षणानंतर ‘स्किडमोर ओिवग अ‍ॅण्ड मेरील’ या नावाजलेल्या कंपनीत तिने काम केलं. शिकागोमधील मॅकक्रोमिक कन्व्हेन्शन सेंटरचं काम तिने पाहिलं. त्यानंतर हॉस्पिटल डिझाइन आणि औद्योगिक क्षेत्रातील इमारतींचंही तिने काम केलं. न्यूक्लिअर पॉवर प्लान्टसाठी गेली तीन र्वष काम करत होती. स्थापत्य अभियंता म्हणून आणि त्यातसुद्धा न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी काम करणाऱ्या महिलांची संख्या अमेरिकेतदेखील फार कमी आहे. याबद्दल सांगताना मधुरा म्हणाली, ‘‘तिथे स्वत: न्यूक्लिअर पॉवर प्लाण्टवर जाऊन काम करावं लागत. त्याच्या साइट व्हिजिट कराव्या लागतात. हे काम खूप जिकिरीचं असतं. या क्षेत्रात तुमचा अनुभव किती वर्षांचा याला महत्त्व नसून तुम्ही दरवेळी चोख काम करणं आवश्यक असत. फुकोशिमाच्या आपत्तीनंतर काटेकोरपणे गोष्टींची पडताळणी करावी लागते. सतत जागरूक राहून काम करावं लागतं.’’

अमेरिकेतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात पुरुषांचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं, असं मधुरा सांगते. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या, वयाने लहान-मोठय़ा लोकांसोबत काम तिने केलं आहे. अमेरिकेमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना मधुर सांगते, ‘‘माझं रूपांतर एका स्वतंत्र आणि सामथ्र्यवान स्त्रीमध्ये करण्यात कॉर्पोरेट क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. सहकाऱ्यांना समजून घेणं, समजावून सांगणं या सगळ्या गोष्टींमुळे नेतृत्वगुण कामी आले.’’ हे सगळं सुरू असताना तिच्यातील कलाकार तिला स्वस्थ बसू देत नव्हती. कथकचा नियमित रियाज सुरू होता. नृत्य नाटय़ कला अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून नृत्याचे वर्ग ती घेतच होती. तिने राजस देशपांडे दिग्दíशत ‘फाइव्ह स्केचेस’ या लघुपटात आणि काही छोटय़ा जाहिरातीत  काम केलंय. आता पूर्ण वेळ नृत्य आणि अभिनयाला द्यायचा निर्णय तिने नुकताच घेतलाय. ‘व्हजायना मोनोलॉग्ज’ आणि ‘आज की उमरावजान’ या हिंदी/उर्दू प्रयोगांचं प्रोजेक्ट ती सध्या करतेय. स्वत: नृत्य शिकवण्यासोबतच अजूनही ती आदिती भागवत यांच्याकडून कथक शिकते आहे. याकडे लक्ष देता यावं म्हणून तिने सध्या कॉर्पोरेट विश्वातून थोडा अल्पविराम घेतला आहे. कलेलाच अखंड प्रेरणास्रोत मानणारी मधुरा आणि तिची कामावरची निष्ठा आणि कलेवरचं प्रेम अनेकींना प्रेरणा देणारं आहे.

कोमल आचरेकर