विनय नारकर

काही महिन्यांपूर्वीच हम्पीजवळील अनेगुंदी येथे तिथल्या उच्चशिक्षित वयोवृद्ध राजांशी भेट शक्य झाली होती. त्यांनी या भागातील व कर्नाटकातील अन्य भागातील हातमाग परंपरा आणि हस्तकलांबद्दल रोचक व अभ्यासपूर्ण माहिती दिली. मोलकालमुरू गावाबद्दल आणि तिथल्या साडय़ांच्या परंपरेबद्दलही त्यांनी सांगितलं.

मी  गेल्या वर्षी माझे इरकल साडय़ांचे कलेक्शन बनवले. त्या अभ्यासादरम्यान मला एका वेगळ्या प्रकारच्या साडीचे छायाचित्र पाहायला मिळाले. ते होते कर्नाटकातील मोलकालमुरू या साडीचे. या साडीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी उत्सूक होतो.

काही महिन्यांपूर्वीच हम्पीजवळील अनेगुंदी येथे तिथल्या उच्चशिक्षित वयोवृद्ध राजांशी भेट शक्य झाली होती. त्यांनी या भागातील व कर्नाटकातील अन्य भागातील हातमाग परंपरा आणि हस्तकलांबद्दल रोचक व अभ्यासपूर्ण माहिती दिली. मोलकालमुरू गावाबद्दल आणि तिथल्या साडय़ांच्या परंपरेबद्दलही त्यांनी सांगितलं. माझ्या इरकल साडय़ांच्या प्रदर्शनादरम्यान, मुंबईतील माझे एक स्नेही आदित्य नाडकर्णी यांनी त्यांच्या संग्रहात दाखल झालेली एक जुनी साडी दाखवली. नाडकर्णी हे भारतीय वस्त्रपरंपरेचे रसिकअभ्यासक आणि संग्राहक आहेत. त्यांनी दाखवलेली साडी ही नेमकी मोलकालमुरूच होती. त्यांनी मला ती साडी अभ्यासासाठी दिली. ती साडी घेऊन आम्ही मोलकालमुरू गावाच्या शोधात निघालो.

कर्नाटकातील चित्रदुर्ग या शहराजवळ मोलकालमुरू हे गाव आहे. अगदी आडबाजूला असलेले हे गाव आजही अश्मयुगाच्या खुणा मिरवताना दिसते. पूर्ण गाव दगडांच्या मोठमोठय़ा डोंगरांनी वेढलेले आहे. कित्येक घरेसुद्धा अशा डोंगरांना लागूनच बांधलेली आहेत. कधीकाळी ब्रिटिश सैनिकांनी आक्रमण केले असता या दगडांना ठेचकाळून त्यांचे गुडघे फुटले व ते परत गेले. ‘मोलकालमुरू’ म्हणजे फुटलेले गुडघे.. अशी ही या गावाच्या नावाची दंतकथा आहे.

हे गावच कुठे आहे हे माहीत नव्हते, तिथे कुणी ओळखीचे असणे तर शक्यच नव्हते. गावाबाहेर हमरस्त्याजवळ एका अतिथिगृहात उतरलो. तिथल्या लोकांजवळ विणकरांबद्दल विचारणा केली. त्यांनी एक-दोन विणकरांना तिथे बोलावून घेतले. त्या तिशी-चाळिशीतील विणकरांनी आमच्या जवळील साडी बघून सांगितले की, अशा साडय़ा इथे बनत नाहीत आणि कोणी बनवणारही नाही.

त्यानंतर आम्ही गावात जाऊ न विणकरांच्या वस्त्या व घरे यांचा शोध घेऊ  लागलो. आम्हाला सगळ्या विणकरांकडे कांजीवरम साडय़ांसारख्या साडय़ांचे उत्पादन होताना दिसत होते. मोलकालमुरूची खासियत असलेल्या या पूजा साडय़ा कुठेच दिसत नव्हत्या. बरेच विणकर महाराष्ट्रातून कधीकाळी स्थलांतरित होऊन इथे स्थायिक झालेले दिसले. त्यांची आडनावे गायकवाड, चव्हाण, कदम अशी आहेत. आम्ही मराठी आहोत म्हटल्यावर त्यांना आनंद होत होता, आणि ते त्यांच्या मराठीत बोलू लागायचे. एखाद्दुसरा शब्द समजायचा..बाकी आनंदच. मी पत्नी व मुलासहीत गेलो होतो त्यामुळे सगळ्या गप्पाघरगुती स्वरूपाच्या होऊ न जात होत्या. पण तशा साडय़ांचा शोध काही लागत नव्हता. असे करत आम्ही एका दुकानात पोहोचलो. त्यांनी त्यांच्याकडच्या साडय़ा दाखवायला सुरुवात केली. आमच्या प्रतिक्रिया पाहून मालकाने आम्हाला विचारले की तुम्हाला नेमके काय हवे आहे. आमची विचारपूस केली. मराठी आहोत म्हटल्यावर तोही जरा खूश झाला. त्यांचे आडनाव होते गायकवाड. आमच्या जवळची साडी दाखवल्यावर आधी तोही म्हणाला अशा साडय़ा आता बनत नाहीत. आमचा आग्रह पाहून तो जरा विचारात पडलेला दिसला. आम्हाला थांबायला सांगून तो वरच्या मजल्यावर असलेल्या त्याच्या घरी गेला. येताना त्याच्या वडिलांना घेऊन आला.

ते साधारण पंच्याहत्तरीतील गृहस्थ होते. त्यांना आम्ही ती साडी दाखवली. ती साडी हातात घेताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कंठ दाटून आला. जरा सावरल्यावर ते म्हणाले की ही साडी त्यांनीच विणलेली आहे. त्या साडय़ांसाठी त्यांना ऐंशी-एक्याऐंशी साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर इंदिरा गांधींनी अशी साडी नेसून छायाचित्रेही काढून घेतली होती. या विणकराचे नाव ‘शिवाजीराव गायकवाड’. त्यांच्या भावूक होण्याचे कारण निराळेच होते. ते म्हणाले, त्या वेळी पुरस्कार मिळाल्यावर त्यांना ही साडी त्यांच्या पत्नीला भेट द्यायची होती. परंतु त्यांना ते परवडणार नव्हते. आता त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, पण पत्नी हयात नाही.

अशा भेटीनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी येतो म्हणून निघालो. दुसऱ्या दिवशी त्यांना भेटून आम्ही अशा साडय़ा विणण्याची त्यांना विनंती केली. ते म्हणत होते की आता कुणालाही ते काम येत नाही. आमचा आग्रह पाहून त्यांनी, ज्या विणकरांनी अशा साडय़ा विणल्या होत्या, त्या दोघा-तिघांकडे आम्हाला नेले. नंतर काही दिवसांच्या प्रयत्नांनी आम्हाला तशी साडी बनवणे शक्य झाले. मोलकालमुरूवरून परत येताना गाडीमध्ये बसल्यावर आमचा पाच वर्षांचा मुलगा म्हणाला, ‘मला खेळणी मिळाल्यावर जसा आनंद होतो, तसा आनंद बाबाला विणकर मिळाल्यावर होतो’.

(शब्दांकन – तेजश्री गायकवाड)