गेला दीड महिना आंतरराष्ट्रीय संगीत जगत भक्तीरसात न्हाऊन निघाले आहे. ब्रिटन-अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात ड्रेक या गायकाचे ‘गॉड्स प्लान’ हे गाणे सलग सात आठवडे सर्वच संगीत याद्यांत पहिल्या स्थानी आहे. काही आठवडय़ांपूर्वी त्याने या गाण्याचे वेगळे व्हर्जन अपलोड केले. ज्यात गरीब आणि गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी देवासारखा धावून येणारा हा कलाकार चित्रित करण्यात आला आहे. या चित्रीकरणावर टीका झाली, तरी त्याने अडचणीत सापडलेल्यांना केलेली आर्थिक मदत दिखावा नसून प्रत्यक्ष पडताळणी करून दिल्याचे समोर आले. कलेतूनही आर्थिक स्वार्थ शोधणाऱ्या या कलाकाराची परमार्थरूपी अवस्था हा या आठवडय़ाचा विषय नाही. बहुतांशी संगीत गंभीर देशांच्या गीत याद्यांमध्ये कमीला कबायो या क्युबन-अमेरिकी गायिकेच्या गाण्याच्या ‘हवाना’ या गाण्याने पुन्हा आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकावर पटकावलेले स्थान, ही आठवडय़ातील संगीतपटलावरची लक्षवेधी घटना होती.

सर्वच गीतकार, संगीतकार आणि गायकांचे आपली पौगंडावस्था व्यतीत केलेल्या शहरावरचे प्रेम अबाधित असते. एखादे शहर व्यक्तीला घडविते तितकेच बिघडविण्याची क्षमता राखून असते. या शहरांप्रति आपल्याकडे किती गाणी लिहिली गेली असावीत, याचा विचार जेव्हा येतो तेव्हा ‘मुंबई’ नगरीचे दरेक काळात शोषण झाल्याचे ऐकू येते. ‘बंबई नगरीया तू देख बबुवा’चीच पुनरावृत्ती सर्वभाषिक शहरमाहात्म्य, येथील व्यक्तींच्या आणि जगण्याच्या वर्णनात येते. ज्यांनी ऐकली नसतील त्यांनी सुनीता रावच्या ‘परी हू मै’ या पहिल्या अल्बममधील आणि लकी अलीच्या ‘सुनो’ या अल्बममधील मुंबई शहरावरचे गाणे आवर्जून ऐकावे. देशातील इतर शहरांबाबत डोक्याला ताण दिला तर अलिकडे अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलेले ‘दिल्ली’वरचे आकर्षक गीत, काश्मीरवर पूर्वी केव्हातरी झालेले गाणे इतकीच आठवण लगेच होते. इंग्रजी गाण्यांचे श्रोते असलात तर शहरांवर कलाकारांनी व्यक्त केलेल्या प्रेमाची, आदराची विविध रूपे समोर येतील. यातली गंमत म्हणजे मुंबईवर जशाप्रकारे श्रद्धांध होवून गाणी लिहिली जातात, तसला प्रकार दिसत नाही. कमीला कबायो हिच्या ‘हवाना’ या ताज्या गाण्यामध्ये क्युबामध्ये घालविलेल्या यौवनावस्थेतील कालावधीचा भाग येतो. त्यात भेटलेल्या तरुणाविषयीची आठवण येते आणि हवाना शहरात घालविलेल्या दिवसांविषयीचे भावूकवजा प्रेम व्यक्त होते. या गाण्याची चाल, वाजणारा पियानो आणि वापरलेला कोरस या सगळ्यांचा परिपाक दोन डझनांहून अधिक देशांच्या संगीत याद्यांमध्ये या गाण्याला अग्रभागी घेऊन गेला. पियानोसोबत शहराशी संबंधित आत्मकथन मांडणारे आणखी एक सुंदर गाणे मार्क कोन या गायकाचे ‘वॉकिंग इन मेम्फिस’ हे थोडे जुने गाणे प्रत्येक संगीतप्रेमीने ऐकावे. मेम्फिसमध्ये असलेल्या एलविस प्रेसले या महागायकाच्या स्मारकाला, निवासस्थानाला भेटण्यासाठी जाताना दिसणाऱ्या घटकांचे आलेल्या अनुभवांचे-आठवणींचे आणि हॉलीवूडवरचे हे प्रवासगीत आहे. बेगडी उपमा-विशेषणांची गर्दी न करता, मेम्फिसमधला फेरफटका गाण्यात शब्दबद्ध झाला आहे. ‘ब्युटिफुल साऊथ’ या ब्रिटिश बॅण्डच्या नव्वदच्या दशकातील ‘रॉटरडॅम’ या गाण्याचा व्हिडीओ आजही लोकप्रिय आहे. हे प्रवासगाणे रॉटरडॅम शहरातील बेरकी माणसांवर लिहिले गेलेले आहे. त्यातील गिटार स्लाईड कानांमध्ये घर करून बसेल, इतकी सुंदर आहे. सुफीयान स्टिव्हन्स या श्रवणीय गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायकाच्या शिकागो या गाण्याचा स्तंभात यापूर्वी उल्लेख करण्यात आला आहे. या गायकाने शहराप्रति तसेच आपल्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविषयी कृतज्ञता अनेक आत्मचरित्रात्मक गाण्यांतून व्यक्त केली आहे. इलिनॉय या अमेरिकी शहरावरचे प्रेम त्याने ‘कम ऑन फिल द इलिनॉय’ या अल्बममधून व्यक्त केले आहे. त्यातील शीर्षकगीतासह सगळीच गाणी प्रचंड मोठा संगीतानुभव आहे. वाद्ये, चाली आणि शब्दांचे असंख्य प्रयोग सातत्याने या अल्बममध्ये दिसतात. साठच्या दशकामध्ये हिप्पी चळवळीचे, स्थलांतरित आणि मोकळ्याढाकळ्या जगण्याचे प्रतीक बनलेल्या ‘सॅन फ्रान्सिस्को’ या शहरावरचे गाणे ऐकणेही अत्यावश्यक आहे. सत्तरीच्या दशकातील रॉक बॅण्डमध्ये अग्रस्थानी असलेल्या लेनर्ड स्कीनर्र्ड या बॅण्डचे ‘स्वीट होम अलाबामा’ खास ऐकावे, ते त्यातल्या तगडय़ा गिटार तुकडय़ांसाठी. या शहरातील संदर्भानी ओतप्रोत भरलेल्या या गाण्यामुळे या बॅण्डचे गाणे आजतागायत विस्मृत झालेले नाही. कित्येक सिनेमांमध्ये ते वापरले गेले आणि या गाण्याच्या नावाचा एक चित्रपटही आला. आपल्या शहरावर आपले अबाधित प्रेम असतेच. अन् एखाद्या वयात त्यावर उफाळत्या कविताही आतून आलेल्या आणि डायरीच्या पानांवर नोंदल्या गेलेल्या असतात. या गाण्यांमधली शहरांवरची शब्दप्रतिभा अनुभवलीत तर आपसूक तुलना करीत त्या नोंदल्या क्षणांची पुनरावृत्ती होऊ शकेल.

म्युझिक बॉक्स

  • Camila Cabello – Havana
  • Marc Cohn – Walking in memphis
  • Sufjan Stevens – Come On! Feel The Illinoise!
  • The Beautiful South – Rotterdam (Or Anywhere)
  • Scott McKenzie – San Francisco
  • Lynyrd Skynrd – Sweet Home Alabama
  • Taylor Swift- Welcome to New York

viva@expressindia.com