कालौघात अन्य व्यायाम प्रकारांप्रमाणेच योगाही सध्या जगभर प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रेंड्सच्या अवतारात आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. याआधी ‘पॉवर योगा’ची ओळख सेलिब्रिटींमुळे झाली होती. सध्या इंटरनेटमुळे अ‍ॅक्रो योगा, अ‍ॅरोबिक योगापासून ते परदेशात लोकप्रिय असलेल्या बीअर योगापर्यंत अनेक योगप्रकार ट्रेंडमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या योग दिनानिमित्ताने या बदलत्या ‘योग’प्रवाहांचा घेतलेला आढावा..

योगसाधना आणि भारत यांचा संबंध अगणित वर्ष जुना आहे. वेद, उपनिषदं, स्मृती इत्यादींमध्ये वर्णिलेली योग साधना इथपर्यंत या संबंधाचे पुरावे आहेत. जैन आणि बौद्ध धर्म स्थापनेच्या काळातसुद्धा चांगले आचरण आणि विचार यासोबत योगाचे महत्त्व शिकवले जात होते. मध्यंतरीच्या काळात या योगवैभवाकडे दुर्लक्ष करत इतर फिटनेस प्रकारांना आपलेसे के ले जाऊ लागले होते. मात्र गेल्या काही वर्षांत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ देशभर उत्साहाने साजरा के ला जाऊ लागला आणि योगाला पुन्हा एकदा तरुणाईच्या दैनंदिनीत स्थान मिळालं. पण कालौघात अन्य व्यायाम प्रकारांप्रमाणेच योगाही सध्या जगभर प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रेंड्सच्या अवतारात आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. याआधी ‘पॉवर योगा’ची ओळख सेलिब्रिटींमुळे झाली होती. सध्या इंटरनेटमुळे अ‍ॅक्रो योगा, अ‍ॅरोबिक योगापासून ते परदेशात लोकप्रिय असलेल्या बीअर योगापर्यंत अनेक योगप्रकार ट्रेंडमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या योग दिनानिमित्ताने या बदलत्या ‘योग’प्रवाहांचा घेतलेला आढावा..

योगाचं दररोजच्या जीवनातलं हे महत्त्व आणि फायदे लक्षात घेता त्याचा पुरस्कार करण्यासाठी आणि जगात योगाचं महत्त्व पसरवण्यासाठी २०१५ साली २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर मात्र आजच्या जिमच्या जमान्यात योगाने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग निर्माण केला. रामदेव बाबांमुळे साधारण चाळिशी आणि त्यापुढच्या वयोगटातील लोकांच्या मनात योगाला अनन्यसाधारण स्थान तर मिळालंच, पण त्यामुळे घराघरांत सकाळी उठून ‘कपालभाती’ आणि योगसाधना करणारी नव्या दमाची पिढीही हळूहळू तयार होत गेली. आता साधारणत: ३० ते ४० या वयोगटात मोडणाऱ्यांनीसुद्धा योगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं सुरू केलं आहे. तर केवळ भारतच नाही जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांतील तरुणांनी योगसाधनेला आपलंसं केलं आहे. विशेष म्हणजे मूळ योगप्रकारात अनेक प्रकारचे बदल घडवून योगाला आधुनिक आणि नवीन रूप देत त्याला अतिरंजक आणि लोकप्रिय करण्याचे विशेष प्रयत्न तरुणाईकडून होताना दिसत आहेत.

यामध्ये सध्याच्या काळात सगळ्यात जास्त चर्चा होणारा प्रकार म्हणजे ‘बीअर योगा’. चक्रावलात? अजून हा प्रकार आपल्याकडे फारसा रुळलेला नसला तरी त्याच्या प्रेमात आपल्याकडची मंडळी पडलेली नाहीत हे म्हणणंही चुकीचं ठरेल. खरं तर हा योगाप्रकार बीअरप्रेमींसाठी अगदी योग्य आहे. बर्लिन, जर्मनीमधून उदय पावलेल्या या योगप्रकारात बीअरचं सेवन करता करता योगा केला जातो. या योगप्रकारात नुसतीच मजा म्हणून बीअरचं सेवन होत नाही तर त्यामागे काही वैद्यकीय कारणंही आहेत, असे दावे डॉक्टरांकडून केले गेले आहेत. अनेक डॉक्टरांच्या मते बीअरचं योग्य त्या प्रमाणात केलेलं सेवन शरीरासाठी विशेषत: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या प्रणालीसाठी उपयुक्त असतं. बीअरसोबत योगाची सांगड घातल्याने आरोग्य, मानसिक शांतता, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यास मदत होते. योगा आणि बीअर आवडणाऱ्या (उर्वरित पान २ वर)   (पान १ वरून) सगळ्यांसाठी या योगाप्रकार अगदी उपयुक्त ठरतो. बीअर न पिणारेसुद्धा अनेकजण व्यवस्थित तोल राखता यावा यासाठी बीअरच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करत हा योगाप्रकार करताना दिसतात. एकूणच काय तर सोयीप्रमाणे बदल करून घडवण्यात आलेला हा योगाप्रकार आवड आणि आरोग्य या दोन्हींची काळजी घेतो आहे.

बीअर योगाप्रमाणेच एक आगळावेगळा योगाप्रकार म्हणजे ‘सप’ (रवढ) योगा. पाण्यावर पॅडलबोर्ड ठेवून त्यावर योगाप्रकार करणे हे या प्रकाराचे महत्त्व. पाठीचा कणा आणि अंगकाठी उत्तम करण्यासाठी या योगाप्रकाराचा मार्ग अवलंबला जातो आहे. भारतात या प्रकाराचं प्रस्थ अजून तितकंसं नाहीये मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये या प्रकाराला विशेष पसंती मिळते आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या पॅडलबोर्डवर उभं राहून शीर्षांसन करणं योगाप्रेमींना विशेष आवडतं आहे. सर्फिगच्या जोडीला केल्या जाणाऱ्या या योगप्रकाराचा नजारा आणि कर्तब बघणं खरंच अनोखा अनुभव ठरतो आहे.

योगाप्रेमींना भुरळ घालणारा आजच्या पिढीचा आणखी एक आवडता आणि नव्याने जन्मास आलेला योगप्रकार म्हणजे ‘एलिअन स्टाईल योगा’. रामदेव बाबांचे योगप्रकार पाहणाऱ्यांसाठी खरं तर हे नवीन नाही, मात्र त्यांच्या इतक्याच कुशलतेने हा योगाप्रकार करणं तरुणाईचं ध्येय बनलं आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत कमरेतून वाकून पोट आत खेचून घेऊन ते गोल फिरवणं या प्रकारात केलं जातं. पोटाची चरबी कमी करणं तसंच पचन संस्था सक्षम करणं यासाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो. याशिवाय, तरुणाईमध्ये सध्या लोकप्रिय होच चाललेले प्रकार म्हणजे एरिअल योगा आणि अ‍ॅक्रो योगा. दोरीच्या साहाय्याने हवेत लटकत केली जाणारी योगासने म्हणजे एरिअल योगा. या योगामध्ये शरीराची हालचाल तुलनेने बैठय़ा योगापेक्षा जास्त होते आणि त्यामुळे वजन घटवण्यासाठीही मदत होते. शिवाय हे योगा एकाग्रता वाढवणे, तोल सांभाळणे यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही सांगितले जाते. ‘अ‍ॅक्रो’ किंवा ‘अ‍ॅक्रोबॅट’ योगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारांसाठी दोनजण आवश्यक ठरतात. एकमेकांचा तोल सांभाळत केल्या जाणाऱ्या या योगप्रकारामुळे तुमच्या शरीराची लवचीकता वाढते आणि शरीराचा तोल राखण्याचीही सवय होते. त्यामुळे या योगप्रकारालाही तरुणांमध्ये विशेष पसंती मिळते आहे.

‘र्रिटीट योगा’ आणि ‘म्युझिकल योगा’ हे आणखी नवे प्रकार जगभरात सगळीकडेच प्रसिद्ध आहेत. त्यातही ‘र्रिटीट योगा’ला तरुणाईची सर्वाधिक पसंती आहे. रोजच्या धबडग्यात व्यायाम किंवा योगा करण्यापेक्षा गर्दीपासून दूर जात खास त्यासाठी सुट्टी घेऊन बीच किंवा तत्सम शांत ठिकाणी जायचे. अशा ठिकाणी योगा आणि स्पा दोन्हींचा आनंद घेता येतो. र्रिटीट योगाचे पॅकेजेसही ट्रॅव्हल कंपन्यांकडून उपलब्ध होऊ लागले आहेत. सततच्या कामाने किंवा अभ्यासाने येणारा ताण घालवण्यासाठी हल्ली प्रत्येकजण ब्रेकच्या शोधात असतो. ‘र्रिटीट योगा’मुळे हा ब्रेक खऱ्या अर्थाने शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी वापरण्याकडे अनेकांचा कल आहे. ‘म्युझिकल योगा’मध्ये नवे काही प्रकार नसले तरी ठरावीक प्रकारच्या संगीताच्या तालावर योगाचे प्रकार करण्यावर यात भर दिला जातो. हल्ली आपल्या आवडीनुसार संगीत घेऊन त्यावर योगा करण्याची सोय उपलब्ध आहे.

योगाचे असे एक ना अनेक प्रकार सतत बदलत जाणाऱ्या ट्रेंडनुसार निर्माण होत आहेत. एक विशिष्ट वयानंतर योगा करणं चांगलं हे समीकरण मागे पडून आता सगळ्या वयोगटातील लोक आपापल्या परीने योगसाधना करताना दिसतात. प्रकार कुठलाही असो शेवटी योगामध्ये आणल्या जाणाऱ्या पद्धतींमुळे योगाचं महत्त्व आणि त्याबद्दलचं प्रेम तरुणाईमध्ये वाढतच असल्याने त्याविषयी तक्रार करण्याचंही कोणतंच कारण उरलेलं नाही. तुम्हाला हव्या त्या शैलीत हा ‘योग’मंत्र घेऊन फिटनेस सांभाळायचा संकल्प निदान यावर्षी करायला काहीच हरकत नसावी!