यू टय़ूबवरच्या फिरस्तीमधून हाती लागलेले काही दृक-श्राव्य अनुभव. अर्थात उल्लेखनीय यू टय़ूब चॅनेलचा लेखाजोखा. ‘स्टार्टअप’ मागच्या गमतीशीर घडामोडी उलगडणाऱ्या एका मालिकेविषयी आजच्या लेखात..

पिचर्स – टीव्हीएफ चॅनेल; दिग्दर्शक – अमित गोलानी;
कथा – अर्णब कुमार; पटकथा – बिस्वपती सरकार
सिनेमॅटोग्राफी, संगीत – वैभव बंधू

परंपरागत प्रश्न : मोठं झाल्यावर काय करणार?
अपेक्षित उत्तर : बाबांचा / कौटुंबिक बिझनेस सांभाळणार.. किंवा मग डॉक्टर होणार, इंजिनीअरिंग करणार
परंपरागत स्वप्न : चांगलं शिकून मोठय़ा पगाराची नोकरी मिळवणं.
हे असं परंपरागत स्वप्न बघायचे आणि ऐकायचे दिवस गेले आता. हातात नामांकित कॉलेजची डिग्री असेल आणि त्यापाठोपाठ संधीच्या रूपाने चालत आलेली नोकरीही असेल तरी यासोबतच आज स्वप्नं बघितली जाताहेत ती उद्योजक होण्याची, नोकरी न करता ‘स्टार्टअप’ सुरू करण्याची. तसं हे ‘स्टार्टअप’ प्रकरण काही नवीन नाही. पण,पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर या स्टार्टअप्सला एक प्रकारचे सुगीचेच दिवस आले आहेत. घरातल्या टीव्हीपासून ते फाइलमधल्या सीव्हीपर्यंत ‘स्टार्टअप’ या शब्दाला आज अनन्यसाधारण महत्त्व आलंय. अशाच स्टार्टअपबद्दल भाष्य करणारी एक युथफूल सीरिअलदेखील एका यूटय़ूब चॅनेलनं सुरू केलीय. ‘पिचर्स’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून यू टय़ूबच्या ‘हीट’ लिस्टवर आहे.
कॉर्पोरेट, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या चार मित्रांची गोष्ट म्हणजे ‘पिचर्स’. यूटय़ूबवर व्ह्य़ूज आणि सबस्क्रिप्शनच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या ‘टीव्हीएफ’ अर्थात द व्हायरल फीवर या चॅनलची ही पेशकश. नवीन बन्सल, जितेंद्र महेशॉवरी (जितूू), योगेंद्र कुमार (योगी) आणि सौरभ मंडल अशा चार यंग, टॅलेंटेड, थोडय़ाशा भित्र्या, तितक्याच धडाडीने ‘स्टार्टअप’चा फॉम्र्युला वापरायला उत्सुक असणाऱ्या तरुणांची लाइफ स्टोरी यामध्ये येते. ही कथा बहुधा बहुतेक सगळ्या होतकरू भारतीय तरुणांना अपील होतेय, कारण ती सादर करण्याची स्टाइल.
आपण स्वत:चं असं काही तरी स्टार्टअप सुरू करायचं हा या चौघांचा कॉलेजच्या थर्ड ईअरला असल्यापासूनचा मानस. ही इच्छा पूर्ण होत असताना काही धम्माल प्रसंगही घडतात.. मग तो प्रमोशनची टक लावून वाट पाहणारा जितू असो, किंवा ‘नेव्हर क्विट’ असं ज्युनिअर्सना सांगून स्वत:च क्विट करणारा योगी असो. नवीन बन्सलचा स्टार्टअपचा हा प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी जितू आणि योगीने दिलेली नोकरीची कुर्बानी आणि मग या ग्रुपमध्ये हिरीरीने सहभागी होण्यासाठी जितूच्या पगाराची जबाबदारी घेणारा मंडल हीच ‘पिचर्स’ची प्रमुख पात्र. ‘तू बिअर है’ असं म्हणत नवीन बन्सलला ‘थ्री इडियट्स’मधल्या रँचोप्रमाणे डेमो देणारा एक अवलिया भेटतो आणि तोच क्षण ठरतो या स्टार्टअपच्या ‘नांदी’चा. स्टार्टअपची सुरुवात, फंडिंग, टीमवर्क या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रसंगांमधून मालिकेतली पात्रं हाताळतात. स्टार्टअपमधली आव्हानं सांगताना ही चारही पात्र धमाल विनोदी फटकेबाजी करतात. त्यातूनच ही मालिका वेगळ्या बाजाची ठरली आहे. स्टार्टअपच्या जोडीला मग रिलेशनशिप, प्रेम, लग्न अशा साइड स्टोरीज येतातच. जितू आणि सौम्या या दाम्पत्याच्या अरेंज मॅरेजमध्ये असणारे फॉर्मल संवाद, त्यातूनच उलगडलेलं प्रेम; याउलट नवीन आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया यांच्या प्रेमाचा मॉडर्न अंदाज.. फ्लर्टिग.. दोन्हीकडे प्रेमाचा बाज वेगळा असला तरीही पार्टनरमागे ठामपणे उभं राहण्याचा स्वभाव मात्र सारखाच आहे. थोडक्यात तरुणाईला भावणारं सगळं काही या मालिकेतून दिसतं.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं म्हणतात. रिजेक्शन कोणाला चुकलं नाही. पण हेच रिजेक्शन काही तरी नवीन करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतं, ही नोट पिचर्स पाहताना प्रकर्षांनं जाणवत राहते. या मालिकेतल्या चारही प्रमुख पात्रांचे स्वभाव चार तऱ्हेचे, स्वभावाप्रमाणेच वागण्याच्या तऱ्हाही वेगळ्या. नवीन बन्सलची ज्युरी रूम, जितूचा समंजसपणा, योगीची शिविगाळ, फुल्याफुल्यांच्या शब्दांनीच सुरू होणारा संवाद, मंडलचा चुकीच्या वेळी थोडं तरी चुकीचंच वागण्याचा स्वभाव यातून मालिकेतली धम्माल खुलत जाते. हेच पिचर्सचं वैशिष्टय़ आहे. लाखांच्या घरात पगार देणाऱ्या नोकऱ्यांवर पाणी सोडल्यानंतर पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी केलेला प्लॅन सांगताना ‘ज्युरी रूम’मध्ये टॉस उडवणारा नवीन दिसतो. तो पाहून कधी तरी आपणही असं वागलो आहोत याचा आभास झाल्यावाचून राहत नाही. स्टार्टअपसाठी सतत खटाटोप करणाऱ्या या चौघांना त्यांच्यापेक्षाही वरचढ अशी अतरंगी मंडळी मिळतात आणि त्यांच्या मार्गात ‘ई-बॅरिअर्स’निर्माण करतात. पण ते अडथळे पार करत ‘पिचर्स’ त्यांना हवं ते मिळवतातच. शून्य ते सर्वमान्य असा हा खासा प्रवास पाहण्यासाठी आणि आजच्या तरुणाईच्या उपहासात्मक विनोदबुद्धीच्या दर्शनासाठी यूटय़ूबवरचे हे स्टार्टअपवाले ‘पिचर्स’ एकदा तरी बघायला हवेत.
(तळटीप : अर्णब कुमार हा टीव्हीएफचा संस्थापक आयआयटी खरगपूरचा माजी विद्यार्थी असून टीव्हीएफच्या टीममधले अनेक जण स्वत: इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटमधली नोकरी सोडून यूटय़ूबवर हे चॅनेलरूपी स्टार्टअप चालवत आहेत.)