News Flash

Watchलेले काही : आयरिश नृत्यशास्त्रदर्शन!

काही शतकांचा इतिहास असलेला हा नृत्यप्रकार औद्योगिक क्रांतीच्या शतकापासून जगाला माहिती झाला.

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

टायटॅनिक या चित्रपटात नायक-नायिकांच्या ओळखीनंतरचा एक प्रसंग आला आहे. उच्चभ्रूंच्या पार्टीमध्ये सुरू असलेला संथ, संयत बॉलडान्स पाहून नायक रमत नाही. तो नायिकेला सोहळ्याचा खरा आनंद पाहायचा असेल, तर तिसऱ्या वर्गातल्या प्रवाशांमध्ये चल असे म्हणत तेथे दाखल होतो. तिथल्या दणदण वाजणाऱ्या बॅकपायपर, ड्रम्स आणि मेंडोलिन-व्हायोलिनच्या सुरांमध्ये चालणारे नृत्य अनेकांना परिचित किंवा आवडीचेही असू शकते. तात्कालीन तिसऱ्या वर्गात केला गेलेला हा नृत्यप्रकार अशास्त्रीय अजिबातच नाही. आपल्याकडच्या कथ्थक नृत्यप्रकाराइतकेच ते शास्त्रांकित आणि अवघड आहे. संगीतावर केवळ पदलालित्य किंवा पायआपटण्याची क्रिया म्हणून त्याकडे पाहता येऊ शकत नाही. संपूर्ण शरीराची लवचीकता त्या नृत्याला अर्पण केल्याशिवाय हे नृत्य सुफळ आणि संपूर्ण होऊ शकत नाही.

काही शतकांचा इतिहास असलेला हा नृत्यप्रकार औद्योगिक क्रांतीच्या शतकापासून जगाला माहिती झाला. सण-समारंभांमध्ये आर्यलडमधील पारंपरिक वाद्यांतील आनंद नृत्यामध्ये व्यक्त करताना त्याची सुरुवात झाली. १९२७ सालापासून या नृत्यप्रकाराला राजकीय पाठबळ मिळाले आणि त्याचे रीतसर शिक्षण सुरू झाले. आर्यलडमधून त्याचा प्रसार ऑस्ट्रेलिया ते अमेरिका खंडांमध्ये झाला. या नृत्याची वर्ल्ड चॅम्पियनशीप दरवर्षी भरविली जाते. युटय़ुबमुळे या नृत्याची शिकवणीही सुलभपणे जगभरात प्रचारित  झाली आहे. पण त्याआधी या नृत्यातील बारकावे पाहणे डोळ्यांना छान व्यायाम आहे.

इनोव्हा आयरिश डान्स कंपनीमधील नृत्यांगनांनी आजच्या पॉप म्युझिकमधील गाण्यांना एकत्रित करून ब्रिटन्स गॉट टॅलेण्टमध्ये केलेला नृत्याविष्कार अगदीच नव्या पिढीचा टॅप डान्स आहे. पोशाखापासून चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह यांचे एकत्रित रूप त्यांच्या नृत्यामध्ये एकरूप झालेले आहे.

हे नृत्य एकटय़ाने केले जाते तसेच समूहानेही. युजिन काझोव्ह या व्हिडीओ दिग्दर्शकाने स्टेप्स नावाची टॅप डान्सची एक तीन मिनिटांची चित्रफीत  बनविली आहे. यात ध्वनी, रंग, प्रकाशयोजना यांचा अद्भुत वापर करून या टॅप डान्सला एकत्र केले आहे. पोलंड, ब्राझील, ब्रिटन, चीन, जपानमधले टॅप डान्सर येथे एकत्रितरीत्या या नृत्यप्रकाराचा आविष्कार करताना दिसतात.

अमेरिकेत वॉशिंग्टनमधील एका चौकात या नृत्याची वाद्याविना जुगलबंदी पाहताना या नृत्याने होणाऱ्या प्रत्यक्ष आवाजाची आणि त्यातील बारकाव्याची कल्पना येऊ शकेल. हा जराही सोपा प्रकार कसा नाही, याची जाणीव या व्हिडीओद्वारे समजू शकेल.

ऑस्ट्रेलियातील सिडने सेंट्रल स्टेशनवर आर्यलडच्या पर्यटन विभागाने केलेला उत्स्फूर्त नृत्याविष्कार भरपूर देखणा बनला आहे. कोणतीही पूर्वसूचना देता केल्या गेलेल्या या नृत्यात एकामागोमाग एक आयरिश आणि स्थानिक कलाकार एकत्र येताना दिसतात. प्रशस्त जागेमध्ये या समूह नृत्याने तयार झालेल्या आनंदलहरी व्हिडीओमध्ये उतरल्या आहेत. जपानमध्ये या नृत्याचा बऱ्यापैकी अंगीकार झालेला दिसतो. या नृत्याचे अनेक जपानी व्हिडीओ आहेत. आयरिश लोकांहूनही अधिक लवचीक असलेले त्यांचे शरीर येथे नाचताना वाकलेले पाहायला मिळू शकते.

आयरिश लोक त्यांच्या कठीणोत्तम संगीताबाबत अभिमानी आहेत, तसेच या नृत्याबाबत किती गंभीर असू शकतील, याचे उदाहरण दाखविणारा एक व्हिडीओ आहे. २०१० साली तीनशे नव्वद टॅप डान्सर एकत्र येऊन या नृत्याच्या सामूहिक दर्शनाचा एक विश्वविक्रम झाला होता. त्यानंतर तो दरवर्षी मोडण्यासाठी टॅप नृत्याचे भक्त एकत्रित येत राहिले. २१ जुलै २०१३ रोजी त्यांनी या नृत्याचा सर्वात मोठा विक्रम करायचे ठरविले. ४४ राष्ट्रांमधील १६९३ टॅप नृत्यकलाकार एका नदीकिनारी मानवी साखळी करून जमले आणि त्यांचा तो नृत्यविक्रमही पूर्ण झाला. हा व्हिडीओ पाहणेही गमतीशीर अनुभव आहे. यात सर्वसामान्य माणसे, लहान मुलेही नृत्याच्या भल्यासाठी उतरली आहेत. नुसतीच हौस असून चालत नाही, तर एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही किती गंभीर असता, त्यातून गोष्टी चांगल्या घडत असतात. आपण किती पारंपरिक नृत्यप्रकार गमावून बसलो आहोत. सणा-समारंभांपुरतीदेखील पूर्वी होणाऱ्या पारंपरिक नृत्यकला आता अस्तंगत होत चालल्या आहेत. डान्स स्टुडिओ आपल्याकडे गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीसारखे बोकाळले असले, तरी त्यांच्यात आयरिश बाणा बिंबवणे कठीण आहे. तूर्त आपल्याकडे नसला, तरी कोणता तरी देश कोणत्यातरी पारंपरिक नृत्याची देखभाल कशी करतो, हे पाहण्यासाठी आयरिश नृत्यशास्त्रदर्शन प्रत्येकाने घ्यावे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:34 am

Web Title: irish choreography irish dance video
Next Stories
1 व्हायरलची साथ : सुडाची भावना
2 ‘ताण’लेल्या गोष्टी : मी किती बिचारा!
3 अटक, मटक खाऊ चटक
Just Now!
X