हर्षद कुलकर्णी, अरव्हाइन, कॅलिफोर्निया

नमस्कार. या सदराच्या निमित्ताने संवाद साधायचं ठरवलं मनात आठवणींचे सूर रुंजी घालू लागले.. इथे येऊन जवळजवळ दहा र्वष झाली आहेत. त्यामुळे आजवरच्या अनेक आठवणींच्या सुरावटींनी मनात घर केलेलं आहे. कोणती आणि किती सांगू. अगदी सुरुवातीचा काळ आठवतो आहे. मी कोलोरॅडो युनिव्हर्सिटीत मास्टर्ससाठी प्रवेश घेतला होता. युनिव्हर्सिटीच्या ‘होम स्टे’ या कार्यक्रमांतर्गत स्थानिक अमेरिकन कुटुंबात राहायची सोय करण्यात आली होती. आम्ही काहीजण शेरील आणि रॉन स्मिथ यांच्याकडे पाहुणे म्हणून दोन-तीन आठवडे राहिलो होतो. एक सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती. जणू त्यांची एक एक्स्टेंडेड फॅमिलीच होती. अजूनही आम्ही संपर्कात आहोत.

मध्यंतरीच्या काळात मॅनहॅटन, कॅ न्सासमध्येही राहात होतो. गेले वर्षभर अरव्हाइनमध्ये राहातो आहे. लॉस एंजेलिसपासून तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या या शहराची संस्कृती कॉस्मोपॉलिटिन आहे. बऱ्याच कंपन्या आणि त्यांची मुख्यालयं इथे आहेत. हे नियोजित आणि विकसित शहर आहे. डिस्ने लॅण्डच्या जवळ आहे. इथल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील नोकऱ्यांमध्ये भारतीय आणि चिनी लोक असल्यामुळे त्यांची संख्या अधिक आहेत. या शहाराची टिपिकल अमेरिकन शहर अशी ओळख राहिलेली नाही, तर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्यापैकी स्वत:ची ओळख निर्माण झालेली आहे. ऑफिसमध्ये अमेरिकन लोकांचं प्रमाण जास्ती असून चिनी, जपानी लोकही आहेत. पाच दिवसांचा आठवडा आणि दोन दिवस सुट्टी असं वर्क कल्चर आहे. सगळे सहकारी मिळूनमिसळून राहतात. परकेपणाची जाणीव करून देत नाहीत. अमेरिकन माणसं ओपन माइंडेड आहेत. खासगी कं पन्यांच्या नोकरीत कामाची ठरावीक वेळ असते. अगदीच गरज पडल्यास जास्तीचं काम करावं लागतं, पण युनिव्हर्सिटीत संशोधन वगैरे करत असल्यास कामाच्या तासाचं बंधन असं नसतं. काम करू तेवढं कमीच असतं. तरीही साधारणपणे दोन दिवसांची पूर्ण सुट्टी लोक घेतात. वीकएण्ड आपापल्या आवडीनिवडीनुसार घालवला जातो. मला वाचन-अभ्यास करायला जास्त आवडतं. आम्ही सुंदर स्वच्छ समुद्रावर फिरायला जातो. कॅ लिफोर्नियातील आजूबाजूच्या छोटय़ा हिल्सवर हायकिंग करायला जातो. शिवाय आठवडाभर घराबाहेर असल्याने घरातली आवराआवर आणि काही कामं असतात.

अमेरिकन लोक खूप मेहनती आहेत. इथली तरुण मुलं-मुली सोळाव्या वर्षांपासूनच स्वावलंबी होतात. स्वत:च्या पायावर उभी राहतात. नोकरी करून पुढे शिकतात. नोकरी करताना असो किंवा कोणत्याही स्वरूपाचं काम करताना, त्याविषयी लाज बाळगली जात नाही, त्यांना त्यात कमीपणा वाटत नाही किंवा त्यांना कुणीही नावं ठेवत नाही. शिकता शिकता काम करणं ही गोष्ट इथे कॉमन आहे. साधारणपणे ९० टक्के अमेरिकन मुलं पदवी घेतात. पुढे मास्टर्स किंवा पीएचडी करणारे तुलनेने कमी असतात. मी पदव्युत्तर शिक्षण घेत होतो तेव्हा माझ्या वर्गातले विद्यार्थी जवळजवळ चाळिशीपर्यंतचेही होते. त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच कामाला लागले असणार आणि राहून गेलेलं शिक्षण आता पुरं करत असावेत. प्रसंगी वडील आणि मुलगा एकाच वर्गात शिकतायेत, असं चित्रही दिसलं होतं.

बहुतांशी वेळा वीकएण्डला काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात. मग ते कधी कॅन्सर पेशंटसाठी करायचं काम असेल, निसर्ग संवर्धनाचं काम असेल, गावातल्या नदीची साफसफाई असेल अशी विविध प्रकारची काम युनिव्हर्सिटीतर्फे अधिकांशी चालतात. विद्यार्थी असताना मी अनेकदा यात सहभाग घेत होतो, आता वेळ मिळेल तसा सहभागी होतो. सध्या मी रिसर्च सायंटिस्ट म्हणून जॉब करतो आहे. पाण्याशी निगडित प्रश्नांच्या संदर्भात संशोधन-तंत्रज्ञानाबद्दल  आम्ही काम करतो आहोत. माझी बायको शुबर्णा चॅटर्जी ह्युमन जिओग्राफीमध्ये पीएचडी करते आहे.

कॅलिफोर्नियात कोकणासारखं वातावरण आहे. कॅ लिफोर्निया वगळता बाकी ठिकाणी बरीच थंडी असते. कोलोरॅडोमधली रॉकी माऊं टनची रेंज खूपच सुंदर आहे. तिथे उन्हाळ्यात आम्ही हायकिंगला जायचो. कॅ न्ससमध्ये राहात असताना मी आणि शुबर्णा प्रेअरी ग्रासलॅण्डसला गेलो होतो. मैलो न् मैल गवताळ कुरण पसरलेलं आहे. पर्यावरणाविषयी इथे खूूपच जागरूकता आहे. इथली नॅशनल पार्क असोत किंवा नायगारासारखा धबधबा म्हणा, या सगळ्या गोष्टींचा लोकांना प्रचंड अभिमान आहे. विविध ठिकाणी वावरताना चुकून कुणी रस्त्यावर कचरा टाकलाच तर मागून येणारा तो उचलून कचरापेटीत टाकतो. मुळात जाणूनबुजून कचरा केला जात नाही. कुणी तसं केलं तर त्याला मोठा दंड केला जातो आणि प्रत्यक्षात तो दंड वसूल केला जातो. केवळ पाटी लावली जात नाही. त्यामुळे कायद्याचा धाक असतोच, पण मुळात लोकांची मानसिकता स्वत:चं घर, शहर, राज्य, देश स्वच्छ ठेवावा अशीच आहे. शालेय जीवनापासूनच तसे धडे गिरवले जातात. पर्यावरण असो किंवा कायदा असो किंवा वाहतुकीचे नियम, तेही तितक्याच कटाक्षाने पाळले जातात.

जवळपास ८० टक्के लोक फिटनेसविषयी जागरूक आहेत, कारण इथे हवा थंड असते. खाण्यात दूध, चीज, मीट इत्यादी पदार्थ जास्ती असतात. त्यामुळे त्यांना फिजिकल फिटनेसची गरज भासते. शिवाय अत्याधुनिक सोयीसुविधा खूप असल्यामुळे तितकं  एक्झर्शन होत नाही. जॉगिंग, सायकलिंग आणि जिमला अनेकजण जातात. अलीकडे बऱ्याचजणांनी ऑफिसला सायकलने जायला सुरुवात केली आहे. त्यांच्या ऑफिसतर्फे त्यांना काहीतरी भेटवस्तू दिली जाते. माझ्या कंपनीत आम्हाला फिटबीट हे स्मार्टवॉच ख्रिसमस गिफ्ट म्हणून दिलं होतं. अमेरिकन फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि थँक्स गिव्हिंग डे मी जवळून बघितला आहे. ख्रिसमस इव्हला मुलाबाळांना-नातवंडांना घरी बोलावलं जातं. डिनर, गिफ्ट वगैरे मोठा बेत आखलेला असतो.

कॅ लिफोर्नियामध्ये भारतीय लोक जास्ती असल्याने खायचे पदार्थ किंवा साहित्याबद्दल फारसा प्रश्न उद्भवला नाही. विद्यार्थी असताना बहुतांशी घरीच करून खात होतो. त्यासाठी भारतातून इथे येताना स्वयंपाकाचा सराव करून आलो होतो, कारण त्याआधी फारसा स्वयंपाक केला नव्हताच कधी. त्यामुळे सणावाराच्या निमित्ताने पुरणपोळी, मोदक वगैरे सगळेजण मिळून करायचो आणि अजूनही केले जातात. रुटिनमध्ये रेडीमेड पोळ्या आणल्या जातात आणि बाकी स्वयंपाक घरी केला जातो. इथल्या खाद्यसंस्कृतीवर मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा प्रभाव जास्ती आहे. पिझ्झा सर्रास खाल्ला जातो. कॅन्ससमधली युनिक डिश कॉर्न ब्रेड होती. इथलं खाद्यविश्व चविष्ट असलं तरी आपल्याकडे मिळणारं स्ट्रीट फुड मी मिस करतो.

अमेरिकन तरुणाईचे विचार बऱ्यापैकी इंडिपेंडंट असतात. मुला-मुलींची आपापली ध्येय निश्चित केलेली असतात. लग्न झाल्यावर त्यांची ध्येयं वेगळी असू शकतात. उलट एकमेकांना पाठिंबा देत त्या ध्येयाकडे वाटचाल केली जाते. भारतात काही वेळा काही प्रश्न बरेच गाजतात. इथे सामान्यांना सेलिब्रेटी मांडत असलेल्या काही काही प्रश्नांप्रती फारसा फरक पडत नाही. इथे सेलिब्रेटींना आपल्यासारखं पटकन फॉलो केलं जात नाही. लोक आपापली कामं करत राहतात. आनंदी आयुष्य जगण्यासाठी लागणारे पैसे कमावणं आणि त्यासाठी काम करणं, अशी काहीशी वृत्ती दिसते. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र मंडळं किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ‘इंडियन स्टुडंट असोसिएशन्स’ असतात. त्यांचे विविध कार्यक्रम होतात. थिएटर्समध्ये हिंदी आणि तेलुगू चित्रपट बऱ्यापैकी चालतात.

प्रत्येक शाळा-कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीची एकेक फुटबॉल टीम असतेच. इथे खेळांना महत्त्व दिलं जातं आणि खेळाडूंना प्रवेश आणि शिक्षणासाठी प्राधान्य दिलं जातं. मी कॉलेजमध्ये असताना रॅकेटबॉल खेळायचो आवडीने. म्युझिक, थिएटर, डान्स वगैरे विविध कलांविषयक अभ्यासक्रम इथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये असतात आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. अन्य विषयांचं शिक्षण घेताना कलाशिक्षण घेता येतं. कोल्हापूरमध्ये पदवीचं शिक्षण घेताना मला एका प्रोजेक्टवर काम करण्याची संधी होती, पण केवळ तांत्रिक अडचणींमुळे ते काम करता आलं नव्हतं. इथे तसं अजिबात झालं नाही. एक अभ्यासक्रम शिकताना अन्य विषय शिकू शकता, ही मुभा इथे आहे. भारतात असताना मी आवडीने हार्मोनियम शिकायचो. पुढे अभ्यासाच्या धबडग्यात ते सूर हरवले. इथे पीएचडी करताना इथल्याच म्युझिकच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. या ऑर्गन शिकण्याला माझ्या प्राध्यापकांनी कायम प्रोत्साहन दिलं. मध्यंतरी भारतात आलो होतो, तेव्हा माझा हार्मोनियम इथे घेऊन आलो आहे. सवड मिळेल तेव्हा तो वाजवतो.. आता आठवण निघालीच आहे, तर हार्मोनियम वाजवायला जरासा वेळ काढतोच. सुरावटी आणि आठवणींच्या लडी उलगडत राहतील.

viva@expressindia.com