News Flash

खाबूगिरी : वाह रुस्तम!

खाताना वेफरचा तुकडा आणि हे आइसक्रीम दोन्ही मोडून ते एकत्र खायचं, ही संकल्पना यामागे आहे.

आइसक्रीमची चपटी लादी आणि त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेली वेफरची चकती.. गेली अनेक वर्षे चर्चगेटच्या के. रुस्तमकडे हे आइसक्रीम खाण्यासाठी गर्दी उसळते. आपले आइसक्रीम आपणच तयार करणाऱ्या या दुकानात कालानुरूप वेगवेगळे फ्लेव्हर्स मिळायला लागले आहेत.

खाबू मोशाय जुन्या गोष्टींबाबत खूप हळवा आहे. रूढी-परंपरा वगैरे सोडल्या, तर ‘जुनें जाऊ  द्या मरणालागुनी’ हे तत्त्व खाबूला मान्य नाही. त्यापेक्षा खाबू ‘जुने ते सोने’ या उक्तीवर जास्त विश्वास ठेवतो. खाबू मुंबईतील अशा जुन्या ठिकाणांच्या शोधात नेहमीच असतो. त्यातही खाण्याची जुनी ठिकाणं त्याला तीर्थक्षेत्रांसारखी भासतात. म्हणूनच इराणी हॉटेलमध्ये वगैरे साधा चहा प्यायला जातानाही खाबूच्या चेहऱ्यावर पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्याची कळा असते. अशाच वारकऱ्याच्या श्रद्धेने खाबू दर थोडय़ा दिवसांनी चर्चगेट स्थानकाजवळील एका आइसक्रीम पार्लरला भेट देत असतो.

‘आइसक्रीम पार्लर’ म्हटल्यावर जे चित्र साधारणपणे डोकावतं, ते आधी मनातून पुसून टाका! कारण हे आइसक्रीम पार्लर अजिबातच चकचकीत नाही. इथे त्या आइसक्रीमचं प्रदर्शनही मांडलेलं नाही. कुठेही गुळगुळीत कागदांवर किंवा भिंतींवर लावलेल्या फ्रेममधून आकर्षक आइसक्रीमची छायाचित्रंही नाहीत. आहे तो मुंबईकरांना गेली अनेक वर्षे या दुकानाकडे खेचणारा जिव्हाळा! के. रुस्तम हे या आइसक्रीम पार्लरचं नाव. अनेक मुंबईकरांना हे नाव नक्कीच माहीत असेल, किंबहुना इथे येऊन अनेकांनी एकदा तरी आइसक्रीम वेफरची चवही घेतली असेल. त्यामुळे खाबू त्याबद्दल नव्याने काय सांगणार, असा प्रश्न खाबूला सतावत होता. पण ढांगेच्या अंतरावर गिरगावात राहणाऱ्या फ्राइड मन्याला के. रुस्तमबद्दल माहीत नाही, हे कळल्यावर खाबूने फ्राइड मन्यासह असंख्य अज्ञ खवय्यांना हे ज्ञानाचे ‘आइस’कण चाटवण्याचा निश्चय केला.

आता तुम्ही म्हणाल, जरा थंडीगिंडी पडून ऱ्हायल्येय, तर मटणागिटनाबद्दल किंवा झणझणीत रश्श्याबद्दल लिहायचं सोडून काय बे खाबू मोशाय गारगिच्च आइसक्रीमबद्दल लिहून ऱ्हायलाय बे.. पण खवय्ये असलात, तर तुम्ही रोमँटिकही नक्कीच असाल. अशा लोकांसाठी थंडीसारखा सुखद मोसम नाही. आणि या मोसमात आइसक्रीम, तेदेखील दोघांनीच गटकावण्याची मजा काही औरच असते. त्यात मैत्रिणीला किंवा आपापल्या जोडीदाराला घेऊन गेलात, तर त्या आइसक्रीमचा स्वाद आणखीनच रेंगाळत राहण्याची शक्यता आहे. खाबू मोशाय मात्र या वेळी एकटाच गेला होता, हे आधीच स्पष्ट केलेलं बरं. चर्चगेट स्थानकातील इरॉस थिएटरच्या दिशेला असलेल्या सब-वेमधून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे मरीन ड्राइव्हच्या दिशेने चालायला सुरुवात करायची. डावीकडे एका गाळ्यात के. रुस्तम आपला दरबार मांडून किमान शतकभर बसलं आहे. आपलं आइसक्रीम आपणच तयार करणारं! दुकानात शिरल्या शिरल्या या दुकानाच्या पुरातनपणाची साक्ष पटते. अनेक वर्षांमध्ये दुकानाच्या अंतर्भागात फार बदल झालेला नाही. इतकंच नाही, तर फार वर्षांमध्ये रंगाचा हातही फिरलेला नाही, हे लक्षात येतं. पण हे अवलोकन करता करता भिंतीवर चिकटवलेल्या किंवा अडकवलेल्या मेन्यूकार्डवर नजर पडते आणि स्तिमित व्हायला होतं. या दुकानात ६० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये तब्बल ४७ वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात. पिस्ता, चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी आणि मँगो या आदीम फ्लेव्हर्सपासून सुरू झालेला हा प्रवास आता नेसकॅफे, पान मसाला, कोकनट क्रश, सिताफळ, पेरू, लिची अशा विविध फ्लेवर्सपर्यंत येऊन पोहोचला आहे.

या दुकानातील प्रत्येक फ्लेवर इतर दुकानांमध्ये मिळणाऱ्या त्याच फ्लेव्हरपेक्षा वेगळा आहे. याचं कारण दुकानाच्या मागच्याच बाजूला, तरीही लोकांना दिसेल अशा भागातच ही आइसक्रीम बनवली जातात. एक इंच जाडीची आणि साधारण सहा इंच लांबीची आइसक्रीमची चक्क लादी बटरपेपरमध्ये गुंडाळून फ्रिजरमध्ये ठेवलेली असते. त्यामुळे इतर आइसक्रीम पार्लरमध्ये होतो, तसा या आइसक्रीमचा दीदार होणं कठीण असतं. काही खानदानी स्त्रिया जशी पडदा पद्धत अजूनही पाळतात, त्यातलाच हा प्रकार! पण त्यामुळेच या आइसक्रीमच्या भेटीची उत्सुकता वाढते. ऑर्डर दिलीत की, काही क्षणांमध्येच बटरपेपरचं आवरण दूर करून दोन वेफरमध्ये गुंडाळून हे आइसक्रीम तुमच्या हातात येतं.

आइसक्रीम अशा प्रकारे देण्याचा प्रकारही खूप कमी ठिकाणी आढळतो. खाताना वेफरचा तुकडा आणि हे आइसक्रीम दोन्ही मोडून ते एकत्र खायचं, ही संकल्पना यामागे आहे. वेफरचा तुकडा आपल्या हाताची उष्णता आइसक्रीमपर्यंत पोहोचवण्यापासून थांबवतो आणि हातांवर कोणतेही ओघळ न येता आइसक्रीम खाणे सहज शक्य होते. इथे मिळणाऱ्या ४७ फ्लेव्हर्सपैकी खाबूची वैयक्तिक आवड विचाराल, तर नेसकॅफे, सिताफळ आणि व्हॅनिला विथ चॉकलेट सॉस हे खाबूला विशेष आवडले. त्याशिवाय कोकनट क्रंचमधला नारळाचा स्वाद किंवा पेरू व लिची फ्लेव्हरमध्ये येणारी त्या फळांची चव अवर्णनीय आहे.

या आइसक्रीमशिवाय इथे मँगो आणि साधी लस्सीही मिळते. तसंच लिची, पेरू आदी फळांचा ज्यूसही १० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. खाबू मोशायने या वेळी आइसक्रीमबरोबरच ज्यूसचाही आस्वाद घेण्यासाठी पेरूचं ड्रिंक मागवलं.  तिकडे काम करणाऱ्या एका पारशी – अँग्लोइंडियन किंवा ख्रिश्चन महिलेने एका ग्लासात लाल रंगाचं ड्रिंक ओतून खाबूसमोर ठेवलं. युरोपियन चित्रपटांमध्ये खाबूने या अशा रंगाचं फळांचंच पेय अनेकदा बघितलं होतं. आपल्याही ओठी ते लागणार, या आनंदात खाबूने ग्लास ओठांना लावला आणि पेरूच्या चवीचा पण पाणचट असा तो द्रव पदार्थ खाबूने फार विचार न करता घशाखाली रिचवला. खाबूला हे ड्रिंक आवडलं नाही. पुढल्या वेळी खाबू लिची ड्रिंक पिण्याच्या विचारात आहे.

के. रुस्तम ही एक परंपरा आहे. गेली अनेक वर्षे दर दिवशी सकाळी साडेनऊ  ते रात्री साडेअकरा आणि रविवारी दुपारी साडेतीन ते रात्री साडेअकरा या वेळेत दुकान उघडं असतं. काही ठरावीक काळानंतर आणखी नव्या फ्लेव्हर्सची भर पडत जाते. वर्षांनुवर्षे इथे आइसक्रीम खायला येणारे मुंबईकर नव्या आइसक्रीम पार्लरच्या लाटेतही के. रुस्तमला विसरलेले नाहीत. अजूनही या दुकानाबाहेर गर्दी असते. खाबूप्रमाणे ‘जुनं ते सोनं’ म्हणणारे अनेक लोक मुंबईत आहेत म्हणायचे!

कुठे : के. रुस्तम

कसे जाल : चर्चगेट स्थानकात उतरल्यानंतर कुलाब्याच्या दिशेकडून बाहेर पडा. बाहेर पडल्यानंतर दादरकडे पाठ करून उजव्या बाजूला समुद्राच्या दिशेने चालायला सुरुवात करा. शक्यतो डाव्या बाजूच्या फुटपाथने चाललात, तर उत्तम. डावीकडे गेलॉर्ड नावाचं हॉटेल लागेल. ते ओलांडून पुढे आलात की, ‘सीसीआय’ची इमारत दिसते. या इमारतीच्या दर्शनी भागात तळमजल्यावरच एक जुनं दुकान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:06 am

Web Title: k rustom ice cream shop
Next Stories
1 क्लिक
2 तरुणाई, पेट्स आणि बरंच काही..
3 दोस्तांच्या संगोपनासाठी ‘कॅट कॅफे’
Just Now!
X