उद्या जर कोणी तुम्हाला म्हणालं, की नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी येण्याने तुमच्या कपडय़ांच्या निवडीवर परिणाम झालाय, तर? म्हणजे असं की, मोदींना पाठिंबा म्हणजे एकाअर्थी स्वदेशी, ‘मेक इन इंडियाच्या अजेंडय़ाला पसंती. त्यामुळेच गेल्या वर्षभरात खादी, हातमागाच्या  कलेक्शन्सची संख्या वाढली. पाहा तुमचं एक मत तुमच्या पेहरावावर परिणाम करू शकतं. मग विचार करा, रोजच्या घडामोडीत तुम्ही नकळतपणे ब्रँड्सना तुमच्याबद्दल माहिती देत असाल? तुमची आवड ब्रँड्सच्या कलेक्शन्सवर कशी परिणाम करते, याबद्दल थोडंसं..

‘वर्ल्डस ग्लोबल स्टाइल नेटवर्क’ हे नाव कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण ही कंपनी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असते. अगदी जगभरात लोक कोणते कपडे घालताहेत,  कोणत्या अ‍ॅक्सेसरीज खरेदी करताहेत याबद्दलचा एक मोठा डेटा ही कंपनी सतत गोळा करत असते. आता तुम्ही म्हणाल, ‘इतके दिवस आयकर विभाग, गुप्तचर संस्था, सायबर सेल सावधगिरी म्हणून संशयितांवर लक्ष ठेवून असायच्या हे ठाऊकहोतं. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या उठण्या-बसण्याचे हिशोबही आपण स्वत:हून देत असतो. त्यात आता कपडय़ांचीही सुटका नाही? मी काय घालतोय, याने जगावर काय परिणाम होणार आहे? मुळात हे फुकटचे धंदे करून यांना मिळत काय?’ या कंपनीच्या माहितीवरून डिझायनर्स आणि ब्रँड्सना अंदाज येतो की, तुमची आवडनिवड नक्की काय आहे आणि पुढच्या सहा महिन्यानंतर तुम्ही नक्की कशाप्रकारचे कपडे घालणार आहात. त्यानुसार डिझायनर्स आपलं कलेक्शन तयार करतात. सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर, मागच्या वर्षी या कंपनीने ब्रँड्सना सांगितलं की, यावर्षी फेमिनिझमचे वारे वाहतील. त्यामुळे वायर ब्रा, पुशअप ब्रा अशा दिसायला आकर्षक पण घालायला त्रासदायक ब्राच्या प्रकारांची मागणी कमी असेल. त्यामुळे साहजिकच ब्रँड्सनी आरामदायी स्पोर्ट्स ब्रा, कम्फर्ट ब्रा बनवायला सुरुवात केली. आजचं चित्र तुमच्या समोरचं आहे, युटय़ुब व्लॉगर सुपरवूमनपासून कित्येक बॉलीवूड, हॉलीवूड नायिका आज ‘नो ब्रा’ म्हणजेच ब्राने त्रास होत असेल, तर ब्रा घालू नका, या मताचा पुरस्कार करत आहेत. मागच्याच लेखात आपण सुटसुटीतपणा या एकाच मुद्दय़ावरून स्पोर्ट्सवेअर दैनंदिन लुकचा भाग कसे बनताहेत हे पाहिलंच. अशा परिस्थितीत कम्फर्ट ब्राची मागणी वाढते आहे.

‘ग्राहक राजा आहे,’ या संकल्पनेला सुरुवात होते, तिथपासून या सर्व अभ्यासाची गरज निर्माण होते. ग्राहकाची पसंती या तत्त्वावर चालून एखाद्या समूहाची पसंती विचारून कलेक्शन्स बनवायची ठरवली, तर प्रत्येकाची वेळेनुसार बदलणारी मतं, वाद यातून हाती काहीच लागणार नाही. त्यात कदाचित आज तुमची मागणी एक असू शकते, पण भविष्यात ती बदलूही शकते. ही तळ्यात मळ्यातली स्थिती ब्रँड्ससाठी धोकादायक ठरू शकते. अशावेळी बाजारपेठ तुमच्या ‘गरजे’चा विचार करते. तुमचं वय, काम, राहणीमान यांचा अभ्यास होतो. तुम्ही कोणत्या प्रकारचं संगीत ऐकता इथपासून कोणत्या राजकीय पक्षाला पसंती देता इथपर्यंत सगळ्याचा डेटा गोळा केला जातो. ‘झारा’ जगभरात फॅशन क्षेत्रातील सगळ्यात मोठा ब्रँड. नवीन कलेक्शन तयार करताना याचे डिझायनर त्यांची शोरूम असलेल्या प्रत्येक देशात जातात आणि शोरूममधील व्यवस्थापकाशी बोलतात, ग्राहकांची पसंती, सूचना ऐकून त्यानुसार कलेक्शन बनवितात. त्यामुळे यांची कलेक्शन्स देशानुसार बदलतात. फॅशन फोटोग्राफर स्कॉट स्चूमनने काही वर्षांपूर्वी एक प्रयोग केला. रस्त्यावर येताजाता तो चांगलं ड्रेसिंग केलेल्यांचे फोटो  टिपायचा आणि त्याच्या ‘द साटोरियलिस्ट’ या ब्लॉगवर टाकायचा. आज त्याचे फोटोज जगभरात बडय़ा डिझायनरच्या संदर्भतक्त्यात हमखास सापडतील. कारण लोकांना नक्की कसे कपडे, स्टायलिंगच्या पद्धती आवडतात हे या फोटोजमधून थेट दिसतात.

कपडे आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंधाचं एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री कंगना रनोट. सध्या ती राणी लक्ष्मीबाई यांच्या सिनेमावर काम करत आहे. त्यामुळे पडद्यावर सशक्त स्त्रीव्यक्तिरेखा साकारताना सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा ही छबी संभाळण गरजेचं आहे. मध्यंतरी विमानतळावर तिने बिस्कीट रंगाच्या खादी साडीसोबत पुरुषी पद्धतीचे ऑक्सफर्ड शूज घातले होते. थोडक्यात साडीतील नजाकत आणि मर्दानी लुक या दोन्हींचा संगम या छोटय़ाशा क्लृप्तीतून साध्य झाला. तिने काही न बोलता सिनेमाची चर्चाही झाली. ‘हायवे’ ‘उडता पंजाब’सारख्या सिनेमांमुळे आलिया भटची बबली गर्ल इमेज बदलली. ती आता गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. साहजिकच तिच्या आताच्या लुक्समध्ये साडी, सेमी-फॉर्मल ट्राउझर्स, गाऊन यांचा समावेश होऊ  लागलाय. नुकत्याच झालेल्या ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये गॉथिक, गडद फॅशनचा ट्रेंड प्रामुख्याने दिसला. यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनल्ड ट्रम्प यांची झालेली निवड आणि बुद्धिवादीवर्गाचा याला असलेला विरोध हेही एक कारण आहे. विरोधाचं चिन्ह म्हणून काळा कपडा बांधायची पद्धत जगभरात आहे, त्याचच हे व्यापक रूप.

ही झाली थोरामोठय़ांची उदाहरणं. आता थोडं आपल्या कपाटात डोकावूयात. गेल्या दोन वर्षांपासून एक ट्रेंड तेजीत आहे, जगातील अर्धी लोकसंख्या याच्या प्रेमात आहे आणि अध्र्याना याने बुचकळ्यात टाकलं आहे. तो म्हणजे ‘रिप्ड क्लोदिंग’ म्हणजेच फाटक्या कपडय़ांचा ट्रेंड. ‘हातात पैसा असूनही बडय़ा घरातील मुलं हे फाटके कपडे कसे वापरतात, त्यांना हे का आवडतं?’ हे कोडं कित्येकांना पडलेलं आहे. याचं उत्तर कपडय़ांमध्ये नाही तर त्यामागच्या मानसिकतेमध्ये आहे. सध्या जग प्रचंड वेगाने पुढे चाललं आहे आणि तरुणवर्ग या बदलाचा मुख्य घटक आहे. नोकरीचा अभाव, महागाई, सामाजिक अस्थिरता या सगळ्या समस्यांमधून जाताना ते पारंपरिक  मार्गावरून चालण्यापेक्षा नव्या वाटा शोधताहेत. आतापर्यंत रिकामपणचे उद्योग म्हणून हिणवलं जाणाऱ्या इंटरनेटने, ब्लॉगिंग, व्लॉगिंग, गेमिंग असे अनेक नवे करिअरचे पर्याय समोर आणले आहेत.

स्टार्टअप्सचे कितीतरी भन्नाट प्रयोग अनेकांनी यशस्वी करून दाखवले आहेत. लिंगभेदासारख्या सामाजिक प्रश्नावर सरकार किंवा समाजाकडून तोडगा निघण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वत: आवाज उठवला जातोय. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं हा पारंपारिक क्रम बदलून आपल्या पसंतीनुसार भटकंती, स्टार्टअप, छंद यांना प्राधान्य दिलं जात आहे. अशावेळी ‘पारंपारिक विचारसरणीतून आम्हाला आमच्या आयुष्यातील समस्यांची उत्तरं मिळणार नसतील तर प्रस्थापित नियम आम्ही का मानायचे?’, हा थेट सवाल तरुणाईकडून विचारला जातोय. या बंडाचा थेट प्रभाव त्यांच्या कपडय़ांवरही पडलाय. फाटके कपडे, ढगळ फिटिंग, जगावेगळी रंगसंगती असे भन्नाट प्रयोग फक्त विरोध म्हणून वापरण्यापेक्षा खरंच छान दिसतात, याची असंख्य उदाहरण ड्रेसिंगच्या माध्यमातून समोर येऊ लागली आहेत. फॉर्मल्सची जागा सुटसुटीत जिमवेअरने घेतली आहे. स्नीकर्स मुलींच्या कपाटात आले तर स्कर्ट्स मुलंही घालू शकतात, हे मान्य होतंय. एखाद्याचे राहणीमान, त्याचा आर्थिक सामाजिक स्तर, लिंग, नोकरी यावरून त्याच्या पेहरावाचं वर्गीकरण करण्यापेक्षा सगळ्यांचा ‘सुंदर दिसायचा’ मूलभूत अधिकार स्वीकारला जातोय. या सगळ्याचं पुढचं पाऊल असेल, विसंगत ड्रेसिंग.

ड्रेसच्या एका बाजूला पूर्ण बाही तर दुसऱ्या बाजूला बाहीच नाही. चक्क स्लीव्हलेस, शर्टाची एक बाजू प्रिंटेड आणि दुसरी प्लेन असे प्रकार आता कपडय़ांमध्ये आवर्जून पहायला मिळतील. त्यामुळे पुढच्यावेळी खरेदीला जाताना, ‘कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात’, असा विचार करण्यापेक्षा त्याच्याकडे अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून पहायचा प्रयत्न करा. न जाणो ड्रेसिंगमधूनही तुमच्या मनातील कित्येक भावना व्यक्त होऊ  शकतील.

viva@expressindia.com