18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

खाऊगल्ली चेन्नई : चेन्नई एक्स्प्रेस

कारण अवघ्या दहा रुपयांची नोटसुद्धा तुम्हाला एखाद्या चांगल्या पदार्थाची चव देऊ न जाऊ शकते.

सायली पाटील | Updated: October 13, 2017 12:31 AM

के. शंकर

चेन्नई आणि आसपासच्या परिसरात खाण्याचे बरेच पर्याय आहेत. पण आपल्याला इथल्या इडली-डोसापलीकडे फारसं माहीत नसल्याने आपण त्या वाटेला जातच नाही. खरं तर खाओ मगर प्यार सेम्हणत चेन्नईच्या अनेक गल्ल्यांमधले चविष्ट पदार्थ आपली वाट पाहत असतात, पण आपली त्याकडे नजर तर जायला हवी. म्हणून तुमच्यासाठी या पदार्थाची खास ओळखपरेड..

गोव्याच्या खाऊ गल्लीपासून सुरू झालेला प्रवास आता भारताच्या दक्षिणेकडे येऊ न पोहोचला आहे. याआधीही या परिसरातील एका खाऊ गल्लीत आपण फेरफटका मारला होता. त्यानंतर उत्तर आणि पूर्वोत्तर खाऊ गल्ल्यांचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा आपली सफर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने दक्षिणेत पोहोचली आहे.

काही मंडळींना चेन्नईतील खाऊ गल्ल्यांची वाट आपोआपच सापडते. पण काहींना मात्र त्यासाठी बरीच ओढाताण करावी लागते. हरकत नाही, जास्त फिरल्यामुळे भूकही जास्त लागेल या तत्त्वावर ही ‘खादाडपंती’ अविरत सुरूच राहते. चेन्नई, तामिळनाडूची राजधानी. राजकीय घडामोडींचं मुख्य शहर, लोकांची गर्दी, खाद्यपदार्थाची चंगळ आणि एकंदर वातावरण पाहता इथल्या खाऊ गल्ल्यांमध्ये किंवा बाजारामध्ये फिरताना तुम्हाला हाताशी काही सुटे पैसे बाळगण्याची गरज आहे. कारण अवघ्या दहा रुपयांची नोटसुद्धा तुम्हाला एखाद्या चांगल्या पदार्थाची चव देऊ न जाऊ शकते.

इथल्या मार्केट्समध्ये फिरताना तुम्हाला एक छोटासा स्टॉल लावून त्यावर खरवस विकणारी काही मंडळी दिसतील. अवघ्या दहा रुपयांमध्ये खरवसचा आयताकृती तुकडा कापून त्याचे आठ ते दहा लहान तुकडे कापून पानावर किंवा कागदावर ठेवून ते आपल्याला खाण्यासाठी दिले जातात. खरवस सर्वानाच ठाऊ क आहे. पण इथला खरवस एकदा खाऊन पाहाच. ‘पाल कडपू’ या नावाने इथे हा खरवस विकला जातो. साखरेचं प्रमाण आणि तो वाफवण्याची पद्धत यांमध्ये सुरेख समतोल साधला गेल्याचं खरवसचा एक तुकडा आपल्या जिभेवर ठेवताच लक्षात येतं.

दाक्षिणात्य पट्टय़ामध्ये समुद्रकिनारी फिरायला जाण्याला अनेक जण प्राधान्य देतात. चौपाटीवर फिरण्याव्यतिरिक्त आणखी एक आवडीची गोष्ट म्हणजे पोटपूजा. खारा वारा, अथांग समुद्र आणि त्याच्या पाण्याचा आवाज, कधीही न थांबणाऱ्या लाटा अशा माहौलमध्ये ‘सुंदल’ विकणारे लोक इथे पाहायला मिळतात. ‘सुंदल’ हा एक प्रकारचा भेळीसारखाच पदार्थ आहे. काहींच्या मते हा कोशिंबिरीच्या जवळ जाणारा पदार्थ. काबुली चणे उकडून त्यात मीठ घालून कढीपत्ता, राई, मिरचीची फोडणी घातली जाते. याला जोड असते ती म्हणजे खवलेल्या ओल्या नारळाची आणि कैरीच्या पातळ कापांची. शेंगदाण्याच्या पुडीप्रमाणे एका लहानशा पुडीतून ‘सुंदल’ आपल्याला दिलं जातं.

इथे फिरताना कोणत्या वेगळ्या ठिकाणी आलो आहोत हे भासत नाही. हो, पण इथली भाषा त्याची वारंवार जाणीव करून देते. चाट, मिठाई हे सर्व पदार्थ इतर ठिकाणांप्रमाणेच खाल्ले जातात. डाळ भजी, कांदा भजी, वडा हे पदार्थ इथे फार आवडीने खाल्ले जातात. त्यासोबत टोमॅटोची ताजी चटणी म्हणजे क्या बात!

चेन्नईमध्ये बिर्याणीसुद्धा आवडीने खाल्ली जाते. किंबहुना तामिळनाडूमध्ये बिर्याणी मिळण्याची बरीच ठिकाणं आहेत. त्यातही ‘थालाप्पकात्ती रेस्टॉरन्ट’ म्हणजे अनेक खवय्यांचा अड्डाच म्हणावा लागेल. बऱ्याच वर्षांची परंपरा असलेल्या या हॉटेलबद्दल इथे कोणालाही विचारा, लोक मोठय़ा आपलेपणानं त्यांच्या बिर्याणीची प्रशंसा करतात. बिर्याणीव्यतिरिक्त इथे इतरही पदार्थ मिळतात. बिर्याणीचे विविध प्रकार आपली भूक भागवण्यासाठी इथे सज्ज आहेत. चिकन ६५ बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, एग बिर्याणी, थालाप्पकात्ती ६५ बिर्याणी आणि कोला बिर्याणी हे इथे मिळणाऱ्या बिर्याणीचे काही प्रकार. अस्सल मांसाहारी खवय्यांसाठी थालाप्पकात्ती म्हणजे एक पर्वणीच आहे. इथे मिळणारी बिर्याणी ही हैदराबादी बिर्याणीपेक्षा फार वेगळी आहे, अगदी दिसण्यापासून ते चवीपर्यंत.

उत्तर भारतात ज्याप्रमाणे पुरीभाजी खाण्याचं प्रस्थ आहे त्याचप्रमाणे चेन्नई आणि आपासच्या परिसरात रस्त्यांवर बऱ्याच स्टॉल्सवर पुरी, भाजी आणि टोमॅटोची चटणी हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. चेन्नईमध्येच एगमोर येथील पंथेओन रोड परिसरात ‘अजनबी मिठाई घर’ नावाचं एक दुकान आहे. ‘अजनबी मिठाई घर’ नावावरून तरी इथे विविध प्रकारचे गोडाचे पदार्थ मिळत असणार असंच तुम्हाला वाटतंय ना.. पण तसं नसून इथे बहुविध प्रकारचे चाट, फ्रॅ न्की, पिझ्झा, समोसे, कचोरी असे पदार्थ मिळतात.

दाक्षिणात्य भागातील या ठिकाणी आणखी एक अनपेक्षित पदार्थ आपल्या भेटीला येतो. तो म्हणजे ‘बॉम्बे लस्सी’. लस्सीचं प्रमाण सहसा उत्तर भारतात जास्त आहे. पण इथेही ही लस्सी आवडीने खाल्ली जाते. इथे ‘खाल्ली जाते’ असं म्हणण्याचं कारण की, लस्सीसोबतच जिलेबी, कचोरी हे पदार्थही जोडीला दिले जातात. त्यामुळे ही लस्सी या पदार्थाच्या जोडीने मोठय़ा चवीने खाल्ली जाते. ‘बार्बर अगन स्ट्रीट’, ‘ट्रीप्लीकेन’ या भागात ‘बॉम्बे लस्सी’ची चव तुम्ही चाखू शकता.

चेन्नई आणि सबंध दक्षिण भारताच्या पट्टय़ात मांसाहाराला बरंच प्राधान्य दिलं जातं. अंडय़ाचा वापरही इथे बऱ्याच पदार्थामध्ये केला जातो. पण ब्रेड ऑम्लेट अनेकांच्या आवडीचा प्रकार आहे. चेन्नईच्या नाइट लाइफमध्येही हा पदार्थ अनेकांची भूक भागवतो. चेन्नईत ‘जन्नल कडई’ या नावाने काही दुकानं चालवली जातात. चिंचोळ्या रस्त्यांच्या संपण्याच्या ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या टोकाशी अशी काही दुकानं आढळतात. अवघ्या काही तासांसाठीच या खाऊ च्या खिडक्या खुल्या असतात. पण इथे पारंपरिक पद्धतीचे भजी, बोंड असे पदार्थ मिळतात. मुख्य म्हणजे घरगुती पद्धतीने बनवण्यात आलेल्या या पदार्थाची चव इतकी सुंदर असते की अनेक जण या पदार्थावर अगदी आडवा हात मारतात. मोजक्या वेळात व्यवसाय करण्याची ही पद्धत खरंच डोळे दिपवणारी आहे. चेन्नईमध्ये पर्यटनस्थळांसोबतच रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघणं सुरक्षित आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा तामिळनाडूमध्ये जाणं झालं तर या ठिकाणांना जरू र भेट द्या.. बाकी इडली-सांबार, डोसे यांचे वेगवेगळे प्रकार इथे चाखायला मिळतातच. ते सांगण्याची गरज नाही. मुंबईत आपण या पदार्थाची चव घेतोच, पण खास चेन्नईत गेल्यावर तिथलीही चव चाखून पाहायला काहीच हरकत नसावी. या खाऊ गल्लीचा धावता आढावा वाचल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत कुठल्या खाऊगल्लीत शिरायचं याचा काही बेत आखताय की नाही? करा, करा. विचार करा.. तोपर्यंत आपण भेटू पुढच्या खाऊ गल्लीत एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात एखाद्या यम्मी पदार्थासह. तोवर या दिवाळीचा पुरेपूर आनंद घ्या आणि खाऊ गल्ल्यांना जरूर भेट द्या.

viva@expressindia.com

First Published on October 13, 2017 12:31 am

Web Title: khau gali in chennai street food in chennai sundal chennai food