21 October 2018

News Flash

‘कट्टा’उवाच : किडल्ट्सचं शेरेण्टिंग

‘किड्स’ आणि अ‍ॅडल्ट्स हे दोन शब्द एकत्र करून बनवला गेलेला हा शब्द सध्या कट्टय़ावरही गाजतो आहे.

लहानपणीपासूनच्या आवडीनिवडी जपत आणि काहीवेळा त्या अति कुरवाळत ही पिढी मोठी होतेय. ज्यांना ‘नाईण्टीज किड्स’ म्हटलं जातं त्या पिढीने लहानपणापासूनची अगदी सगळी खेळणीही जपली आहेत आणि त्यांच्यासोबत खेळत वेळ घालवणं हा त्यांच्यासाठीचा ‘स्ट्रेस बस्टर’ आहे. काहीशी लाडात वाढलेली आणि मोठेपणी प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावं लागत असणारी ही पिढी, ज्यांना कामातला उत्साह टिकवून ठेवण्यासाठी सतत काही नवनवीन उपाय शोधावे लागतात. लहानपण पुन्हा जगणं हा या पिढीला सापडलेला सगळ्यात उत्तम उपाय आहे. एकदा हा उपाय मिळाल्यापासून नव्याने काही शोधायची गरजच निर्माण झाली नाही. याच शैशव जपलेल्या आणि त्यात रमणाऱ्या ‘मोठय़ा’ मुलांना सध्या ‘किडल्ट्स’ नावाने संबोधलं जातं. ‘किड्स’ आणि अ‍ॅडल्ट्स हे दोन शब्द एकत्र करून बनवला गेलेला हा शब्द सध्या कट्टय़ावरही गाजतो आहे.

सिग्मंड फ्रॉइडने ज्या मनोवस्थेचा एकेकाळी एक नकारात्मक अवस्था म्हणून उल्लेख केला, ज्याला ‘पिटर पॅन सिण्ड्रोम’ म्हटलं त्याचं थोडं सौम्य स्वरूप आजकालची पिढी ताण घालवण्यासाठीचा उपाय म्हणून करू पाहते आहे. अर्थात, सोशल मीडियाचा वापर करत असलेली ही पिढी त्यांचा हा उपाय स्वत:पुरता ठेवत नाही तर सतत त्याबद्दल ‘पोस्ट’ करत राहते आणि आपलं हे लहानपण जगापर्यंत पोहोचवते. त्यामुळे इन्स्टाग्रामवर ‘किडल्ट्स’ हा हॅशटॅग शोधला तर आठ-एक हजार पोस्ट्स सहज पाहायला मिळतात. केवळ एकटय़ाने नव्हे तर लहानपणी जसं सगळ्यांना जमवून भातुकली खेळतात तशा या ‘किडल्ट पार्टीज’ होतात आणि त्या सोशल मीडियावर ‘हिट’सुद्धा होतात. ‘व्हच्र्युअल गेम्स’कडून तरुणाई पुन्हा सापशिडी, लुडो यांसारख्या बोर्ड गेम्सकडे वळण्यामागे कदाचित हेही एक कारण असू शकेल.

स्वत:चं लहानपण सोशल मीडियावरून जाहीर करणारी पिढी खरोखर लहान असलेल्या बाळांचं लहानपण जगापासून लांब कसं ठेवेल? ‘किडल्ट’बरोबरच आणखी एक शब्द व्हायरल झाला आहे. ‘इन्स्टाग्राम’वर ‘ट्रेण्ड’ होणाऱ्या छायाचित्रांमध्ये सध्या लहान बाळांच्या त्यांच्या पालकांसोबत असणाऱ्या छायाचित्रांची चलती आहे. शेअर आणि पेरेण्टिंग यांचा मिळून बनलेला शब्द आहे ‘शेरेण्टिंग’. आपल्या मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे चालण्याची, खेळण्याची छायाचित्रे, बोलण्याचे व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर करणारी मंडळी ‘शेरेण्टिंग’ करतात असं म्हटलं जातं. या शेरेण्टिंगमुळेच बाळ आराध्या बच्चन आणि बाळ तैमूर इन्स्टाग्रामवर सगळ्यांचे लाडके बनले आहेत.

‘शेरेण्टिंग’ हा हॅशटॅग वापरून इन्स्टाग्रामवर शोधलं तर त्याचेही अडीच हजार पर्याय समोर येतील. आपल्या मुलांची छायाचित्रं टाकताना आपल्यातलं मूल जागं ठेवून त्याला स्मार्ट कॅप्शनही दिल्या जातात. नवीन युगातल्या नवीन पिढीतल्या तरुणाईची जगण्याची नवीन पद्धत त्यांच्या शब्दांमधून आणि अनेकदा तर हॅशटॅगमधूनही कळत असते.

viva@expressindia.com

First Published on January 12, 2018 12:24 am

Web Title: kidult sharenting peter pan syndrome