लांबच लांब कोटासारखा दिसणारा, रंगीबेरंगी नक्षीदार किमोनो म्हणजे आपल्यासाठी फक्त ‘सायोनारा.. सायोनारा’ गात इथून तिथे जपानी तरुणीप्रमाणे बागडणारी आशा पारेख डोळ्यासमोर येते. हिंदी चित्रपटांतून फार नाही पण किमोनोचं दर्शन अनेकांना घडलं आहे. अगदी कालपरवा प्रदर्शित झालेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटात कानपूरचा बद्री सिंगापूरमधल्या आपल्या प्रेयसीला भेट म्हणून चक्क किमोनो देतो. ‘किमोनो’ची तोंडओळख प्रत्येकाला असली तरी एका देशाची खासियत असलेला हा कपडय़ाचा प्रकार फॅशनच्या रथावर आरूढ होईल अशी शंका कोणालाही येणे कठीण.. पण सध्या हे ‘किमोनो’ आपल्याकडच्या फॅ शनमध्येही टॉपलिस्टमध्ये आहे.

प्रत्येक राज्याच्या संस्कृतीनुसार त्याची एक विशेष फॅशन गेल्या कित्येक वर्षांत परंपरेसारखी रुजलेली आहे. आपण ती सहजा मोडतही नाही. जसा राजस्थानचा घागरा, महाराष्ट्राची नऊवारी साडी इत्यादी. फॅ शनच्या मांदियाळीत हे प्रकार आता कुणा एकाचे राहिलेले नाहीत. आपल्याकडे येणारे अनेक परदेशी पर्यटक सहजपणे घागरा घालून फिरताना दिसतात. पारंपरिक कपडय़ांना आधुनिक साज देण्यात पश्चिमेची मंडळी आघाडीवर होतीच पण जपानसारखी पौर्वात्य देशातील मंडळीही फॅ शनच्या बाबतीत मागे राहिलेली नाहीत. जपानची खासियत म्हणजे त्यांच्या कपडय़ांवर चित्रकलेचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर केला जातो. निसर्गाचं चित्रण तेही पारंपरिक कपडय़ावर.. मग त्यात पानं, फुलं, झाडं यांचं सुंदर नक्षीकाम ओघाने आलंच.. सध्या स्टाईल ट्रेण्ड असलेला ‘किमोनो’ हे या कलाकुसरीचे प्रतीक आहे. पूर्वी जपानमध्ये शाही लोक या किमोनोचा उपयोग सर्रास करायचे. किमोनो म्हणजे वापरण्यास योग्य अशी गोष्ट.. असा त्याचा सरळसाधा अर्थ होतो. किमोनोचा साधारण लुक म्हणजे मोठे हात, पुढे बो किंवा बेल्ट तर लॉन्ग सरळ स्कर्ट अशा या किमोनोचे बरेच प्रकार सध्या तुम्ही हमखास पार्टी वेअर व सिझनल वेअर म्हणून वापरू शकता.

किमोनोची रंगसंगती : मुळात किमोनो हा प्रकार प्रिन्ट्स आणि एम्ब्रॉयडरीसाठी नावाजला जातो. परंतु केवळ रंगांनी व रंगसंगतीच्या आधारे तयार होणाऱ्या किमोनोचे सध्याचे स्वरूप जास्त आकर्षति वाटते. साध्या पण नानाविध रंगामुळे त्या वर्षांनुर्वष चालत आलेल्या परंपरेला मिळालेला वेगळेपणा, एम्ब्रॉयडरीतही आजकाल वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर दिसून येते. त्यामुळे पान, फुलं वगळता नावीन्यपूर्ण प्रिन्टस् बरोबरच वेगवेगळ्या फॅब्रिकमुळे त्याला एक नवा व साजेसा लुक येतो. उष्ण किंवा शीत रंगसंगती तसेच एखाद्या फॅमिलीतले रंग जसे गुलाबी, निळा, हिरवा किंवा वेगळ्या कलर कॉम्बिनेशनसहित हे किमोनो आकर्षति वाटतात. किमोनोचा विचार करताना त्याच्या काही वैशिष्टय़ांचा खास विचार करावा लागतो.

वैविध्य : किमोनो हा ड्रेस कोड किंवा युनिफॉर्म न राहता साडी, घागरा-चोळीत जसे मॉडर्न, ऑथेन्टिक आणि ट्रॅडिशनल बदल येतात. तसे ते किमोनोतही वापरले जातात.

किमोनोच्या स्टाइल्स

  • किमोनो लेहेंगा – लेहेंगा-चोळी-दुपट्टय़ाची दुनिया असताना लेहेंग्यावर किमोनो स्टाइल टॉप घातला तर त्याला ट्रॅडिशनल लुक मिळतो. हा लुक खासकरून ब्रायडल वेअरसाठी उत्तम ठरतो. किंबहुना, मित्र-मत्रिणींच्या लग्न सभारंभासाठी, पार्टीसाठी हा लुक तुम्ही हमखास कॅरी करू शकता. यावर ऑथेन्टिक ज्वेलरीची संगती उत्तम ठरेल.
  • किमोनो केप्स् – डिझाइनर पायल खान्डवाला हिने तिच्या ब्रायडल वेअरच्या कलेक्शनमध्ये जॉर्जेट व सॅटिन फॅब्रिकचे किमोनो केप्स् आणले आहेत. उंचीच्या बळावर प्लाझोची स्टाइल याला अगदीच शोभून दिसेल. तिचं कलेक्शन याच संकल्पनेवर भर देतं.
  • किमोनो सूट/ कार्डिगन – ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये किमोनो सूटची ओळख करून दिली गेली. याच्या सहज रंग व साधेपणामुळे फॉर्मल लुक वाटत असला तरी कॉर्पोरेट जगासह पार्टीसाठी ही निवड उत्तम ठरेल. असे कार्डिगन हे प्लस साइजमध्येसुद्धा उपलब्ध आहेत.
  • किमोनो जॅकेट्स कुर्तीवर जॅकेटची फॅशन असताना नवीन किमोनो पद्धतीचे जॅकेट्स स्टाइल म्हणून तुम्ही वापरून शकता. त्यात जीन्स, प्लाझोवर जॅकेट्स वापरताना तुम्ही हातात हॅन्ड बॅग्ज घेतल्यात तर तुम्हाला मॉडर्न लुक मिळेल.
  • किमोनो श्रग्ज – क्रॉप टॉपच्या वर खासकरून मोठय़ा लांबीचे श्रग्ज उठून दिसातात. फ्लोरल, पिकॉक डिझाइन, चेक्स असे भरलेले व पारदर्शी काळ्या, निळ्या आणि इतर रंगातील शर्गस् हे सध्या चलतीत आहेत. ऑनलाइनवर सध्या हे श्रग्ज उपलब्ध आहेत.
  • किमोनो रॉब – यात इतकं वैविध्य आहे की वेगळ्या डिझाइन्स, पॅटर्न ते वेगळ्या फॅब्रिकचे हे रॉब तुम्ही लगबगीने कुठल्याही ठिकाणी नाइट सूटपासून गॅदरिंगसाठी वापरू शकता. सध्या हे कुठल्याही ऑनलाइन स्टोअरवर सहज मिळतात.

viva@expressindia.com