22 February 2019

News Flash

सबकी फॅशन एक!

यंदा जवळ जवळ सगळ्याच डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये जेंडर फ्लुइड (fluid) फॅशन पाहायला मिळाली.

फॅशनची मांदियाळी जिथे जमते तो ‘लॅक्मे फॅशन वीक समर रिसोर्ट २०१८’ हा भव्यदिव्य फॅशन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या फॅशन सोहळ्यात अनेक वेगवेगळ्या डिझायनर्सचे कलेक्शन सादर झाले. त्यातून अनेक वेगळे ट्रेंड्सही सेट झाले. दरवर्षी ‘लक्मे फॅशन वीक’मध्ये काही ना काही नवीन वेगळं पाहायला मिळतं. यंदा जवळ जवळ सगळ्याच डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये जेंडर फ्लुइड (fluid) फॅशन पाहायला मिळाली. स्त्री-पुरुष दोघेही वापर करू शकतील अशी युनिसेक्स फॅशन आपल्याला माहिती होतीच. आता स्त्री-पुरुषांबरोबरच तृतीयपंथीही म्हणजे लिंगभेदच पुसून टाकणारी ‘जेंडर फ्लुइड’ फॅशन डिझायनर्सनी विकसित केली असून त्या पद्धतीचे कलेक्शन या सोहळ्यात सादर करण्यात आली.

‘लॅक्मे फॅशन वीक समर रिसोर्ट २०१८’मध्ये गारमेंट्स, ज्वेलरी, फुटवेअर, बॅग, सिल्हाऊट्स, रंग अशा फॅ शनच्या सगळ्याच विभागांमध्ये जेंडर फ्लुइड  फॅशन बघायला मिळाली. कपडय़ांमध्ये स्कर्ट, लाँग जॅकेट, टॉप्स, स्कार्फ, फ्लोरल प्रिंटेड फॅब्रिक हे कोणत्याही व्यक्तीला सहज सूट होतील असे होते, तर ज्वेलरीमध्ये पुरुष मॉडेल्सनी गळ्यात मोठे नेकपीस, हातामध्ये अंगठय़ा, नाकात नथ, कानातले आणि पायातही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान केले होते. आपल्या समाजात स्त्री-पुरुषांनी वापरायचे रंगही जवळपास ठरवून दिल्यासारखेच असतात, मात्र या नव्या फॅशनमध्ये अशी कोणतीच रंगांची रूढ व्याख्या उरलेली नाही.

ऊर्वशी कौर या फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमध्ये गारमेंटसोबतच फुटवेअरसुद्धा जेंडर फ्लुइड फॅशनचे होते. तिचं कलेक्शन घातलेल्या मॉडेल्सने सारख्याच प्रकारचे फुटवेअर घातले होते. त्याबद्दल तिला विचारले असता, ‘‘आता फॅशनमध्ये खूप नवीन आणि सकारात्मक बदल होऊ  लागले आहेत. फॅशनमध्ये कोणत्याही प्रकारची असमानता अजिबात जाणवत नाही. कपडय़ांमध्ये, अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअरमध्येही आधी स्त्री-पुरुष किंवा तृतीयपंथी असे वेगवेगळे विभाग होते. सध्या तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत चालला असल्याने फॅशनमध्येही ही भेदाभेद संपुष्टात आली आहे,’’ असे ऊर्वशीने सांगितले.

‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘द प्लॉट प्लांट’ या लेबलखाली जेंडर फ्लुइड फॅशनचं कलेक्शन सादर करणाऱ्या रेशम करमचंदानी आणि सनया सुरी यांनीही फॅशन सोहळ्यातील या बदलाचे स्वागत केले. ‘‘आमच्यासाठी जेंडर फ्लुइड फॅशनचे कपडे बनवणे म्हणजे फक्त लोकांना आवडेल अशी डिझायनिंग करणं असं अजिबात नाहीये. अशा प्रकारचे कपडे भारतात तयार होऊन ते बाजारात येणं ही आजच्या काळाची गरज आहे. जेव्हा हे कपडे बाजारात येतील तेव्हाच लोकांना याची सवय लागणार आहे. कपडे हे असं एकच माध्यम आहे ज्यातून या विषयाकडे एकही शब्द न बोलता याबद्दलच्या भावना व्यक्त करता येतात,’’ असं त्यांनी सांगितलं, तर आयुषमान मित्रा या फॅशन डिझायनरनेही आपण क लेक्शन सादर करताना मोजकेच कपडे डिझाईन करतो. त्यामुळे खूप विचारपूर्वक हे काम करावे लागते, असे सांगितले. ‘‘जेंडर फ्लुइड फॅशनची संकल्पना लक्षात घेऊन कपडे डिझाईन करणं हे या वेळी माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. मुळात असे कपडे कोणीही वापरू शकतं हे लोकांना पटवून देणं गरजेचं होतं. कारण गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरण्याची सवय आपल्या देशातील स्त्री-पुरुषांमध्ये मूळ धरून आहे, तर तृतीयपंथीयांना आपण याआधी गणतीतच धरले नव्हते. मात्र आता हे सगळं बदललं असल्याने लिंगभेदापलीकडे जाणाऱ्या या फॅशनची जाण सगळ्यांना करून द्यावी लागणार असल्याचे मत आयुषमानने व्यक्त केले. आपल्या समाजात लिंगभेदावरून अनेकदा वाद होताना पाहत आलोय, पण या वादाला आता चक्क फॅशननेच उत्तर दिलं आहे. सगळे समान असा मेसेज यातून सहजरीत्या कोणत्याही वादविवादाशिवाय बोलक्या कृतीतून लोकांपर्यंत प्रभावी पोहोचतो आहे हेही नसे थोडके!

viva@expressindia.com

First Published on February 9, 2018 12:36 am

Web Title: lakme fashion week summer resort 2018 genderfluid fashion