News Flash

मंगळसूत्राची फॅशन होते तेव्हा..

मंगळसूत्राची ‘फॅशन’ मात्र नवनवीन रूपानं पुढे येत आहे.

एकीकडे मंगळसूत्रादी सौभाग्यालंकारांचं बंधन म्हणजे स्त्री-पुरुष समानतेच्या, स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पनेला छेद देणारं आहे, असं मानणाऱ्या नवविवाहित तरुणींमध्ये वाढ होत आहे. त्याच वेळी दुसरीकडे मात्र मंगळसूत्राची ‘फॅशन’ मात्र नवनवीन रूपानं पुढे येत आहे. अगदी मंगळसूत्राचं ब्रेसलेट आणि अँकलेटपर्यंत ती पोहोचली आहे. तरुणाईच्या मनातील सांस्कृतिक गोंधळाचं हे प्रतीक आहे की, ‘फॅशन’च्या वाढलेल्या परिघाचं?

मंगळसूत्र, हिरवा चुडा, लाल कुंकू, जोडवी असे दागिने सौभाग्याचं प्रतीक मानण्याची संकल्पना आहे. हे दागिने विवाहित स्त्रीनं घालावेत, असा संकेत आपल्या संस्कृतीत आहेत. पण स्त्री विवाहित आहे किंवा काय हे समाजाला अशा पद्धतीने सांगायची काय आवश्यकता? मुळात असे काही विवाहित पुरुषांसाठीचे संकेत नाहीत; मग ही बंधनं, ही संस्कृती केवळ स्त्रियांसाठीच का? असे प्रश्न आजच्या तरुणीला नक्कीच पडायला लागले आहेत. त्याच वेळी दुसरीकडे मंगळसूत्राची ‘फॅशन’ मात्र नवनवीन रूपानं पुढे येत आहे.

विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालावं की नाही, याविषयी तामिळनाडूमधील एका वृत्तवाहिनेनी काही महिन्यांपूर्वी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाचा प्रोमो बघूनच अनेकांनी याला विरोध केला आणि अशी चर्चा होऊच शकत नाही, असा पवित्रा घेतला. या दडपशाहीविरोधात अनेकांनी भूमिका मांडली. या सगळ्याला पुढे राजकीय वळणही लागलं. देशभर हा विषय गाजला. अगदी त्याच वेळी शिल्पा शेट्टीनं घातलेल्या मंगळसूत्राच्या ब्रेसलेटची चर्चा फॅशनप्रेमींमध्ये रंगली होती आणि मराठी मालिकांमधल्या नायिकांची मंगळसूत्र हा बाजारपेठेतला ट्रेण्ड होता.
रोजच्या धावपळीत, धकाधकीत गैरसोय होते, म्हणून अनेक तरुणी लग्नानंतरही दागिने घालणं टाळतात. अनेक मुली आधुनिक कपडय़ांवर शोभत नाही, म्हणून मंगळसूत्रादी दागिने घालण्याचं टाळतात. पण त्याच वेळी पारंपरिक जोडवी आधुनिक थाटात ‘टो रिंग’ म्हणून आल्यावर अनेक मुलींना ‘इन थिंग’ वाटतात. ‘पिकू’सारख्या चित्रपटामधून मध्यंतरी गोल मोठय़ा टिकल्यांचा ट्रेंड निर्माण झाला होता आणि त्यामुळे अनेक मुली पुन्हा एकदा गोल रंगीत ठसठशीत टिकल्या वापरायला लागल्याचं दिसून येत होतं. आता यामधून तरुणाईच्या मनातला गोंधळ दिसतो का, असं विचारल्यावर मात्र बहुसंख्य मुली, हा गोंधळ नसून ‘प्रॅक्टिकल अप्रोच’ असल्याचं सांगतात. ‘कुठल्याही दागिना घालण्याचा किंवा न घालण्याचा लग्न हा क्रायटेरिया का असावा’, असा त्यांचा प्रश्न असतो.
सध्याच्या काळात मेट्रो सिटीजमध्येदेखील सो कॉल्ड ‘सौभाग्य लेण्यांचे’ मॉडर्न ट्रेंड बाजारात हिट होण्यामागे हेच कारण आहे, असं दिसतं. म्हणूनच मंगळसूत्राचं ब्रेसलेट हिट होतं आणि ऑनलाइन बाजारात मंगळसूत्राच्या डिझाइनचं अँकलेटही उपलब्ध असतं. ‘अशा व्हेरिएशन्समुळेच पारंपरिक सौभाग्य अलंकारांना कूलनेस मिळालाय’, असं नुकतंच लग्न झालेली नेहा सांगते. मंगळसूत्राचे असंख्य नावीन्यपूर्ण प्रकार बाजारात हिट आहेत. त्यामध्ये अमुक मालिकेतल्या नायिकेसारखं मंगळसूत्र पाहिजे, असं सांगणाऱ्या स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर आहेत. पंजाबी किंवा उत्तर भारतीय मुली लग्न झाल्यावर हातभर पांढऱ्या-लाल बांगडय़ा घालून अत्याधुनिक पेहरावात वावरताना दिसतात. जीन्स-टीशर्ट आणि हातभर बांगडय़ा सध्याच्या फॅशनमध्ये अजिबात ऑड वाटत नाहीत. ‘बांगडय़ा आवडत नाहीत असं नाही. तसा कार्यक्रम असेल, ड्रेसला शोभणाऱ्या असतील तर बांगडय़ा अगदी रॉकिंग दिसतात. रोजच्या ऑफिसच्या कामात मात्र अशा हातभर बांगडय़ा सोयीच्या नाहीत’, असं मुंबईची अवनी सांगते.
मराठी मुलींमध्येही अशा हातभर बांगडय़ा घालण्याची फॅशन नव्याने रुजतेय. हिरवा चुडा आता फॅशन स्टेटमेंट झालाय. पण हातभर हिरवा चुडा घातलेली मुलगी दिसली, तर नव्यानं लग्न झालेली असा अर्थ मात्र काढू नका. कारण एकाच हातात असा भरगच्च हिरवा चुडा हा आजचा ट्रेण्ड आहे. ‘प्लेन सलवान कुर्ता आणि कलर कॉन्ट्रास्ट साधणाऱ्या हिरव्या भरगच्च बांगडय़ा, हे निश्चितच फॅशन स्टेटमेंट आहे. मी एका ऑफिस फंक्शनमध्ये असं स्टायलिंग केलं होतं’, व्यवसायानं आर्किटेक्ट असणारी सोनाली म्हणाली.
थोडक्यात पारंपरिक सौभाग्य अलंकार हे ‘कम्पलसरी’ घालावेच लागतील, हे बंधन म्हणून नाकारणाऱ्या मुली आहेत. पण हेच दागिने वापरण्याचं स्वातंत्र्य आम्हाला असायला हवं, आम्ही ते आवडीनं मिरवू.. असंही त्यांचं म्हणणं आहे. मंगळसूत्र, बांगडय़ा, कुंकू, जोडवी असे अलंकार घालावेत की नाही, कसे आणि कधी, हे आम्हाला ठरवू द्या. संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली तिच्या पेहरावावर, सजण्यावर आणि दिसण्यावर अशी बंधनं नकोत, असाच सूर या नव्या फॅशनमधून अधोरेखित होतोय.
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:05 am

Web Title: latest trends of mangalsutra
टॅग : Marriage
Next Stories
1 टॅटूचा नवा ट्रेण्ड
2 हैं कोई जवाब?
3 नृत्यसंगीताचा डिजिटल अवतार
Just Now!
X