मधुर भांडारकरचा ‘फॅशन’ आठवतोय? या चित्रपटात मॉडेल्सना फिटनेसचे धडे देणारी ती काटक, कणखर स्त्री .. म्हणजे लीना मोगरे. स्वतचा फिटनेस ब्रॅण्ड निर्माण करणारी देशातली पहिली स्त्री पर्सनल फिटनेस ट्रेनर. माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, बिपाशा बसू, कतरिना कैफ, कंगना रनौट अशा अनेक सेलेब्रिटींना लीना मोगरे यांनी फिटनेसचे धडे दिले आहेत. लीना यांनी फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलंय. ‘लीना मोगरेज फिटनेस’ हा प्रसिद्ध ब्रॅण्ड त्यांनी सुरू केला असून मुंबई आणि मुंबईबाहेरही त्यांच्या जीम कार्यरत आहेत. आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी व्यायामाचं महत्त्व आपण जाणतोच, पण कुणाला कुठल्या प्रकारचा व्यायाम उपयुक्त ठरेल याबाबत मनात गोंधळ असतो. सेलेब्रिटींसारखं शरीरसौष्ठव आपल्यालाही हवंहवंसं वाटतं, पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं, किती वेळ आणि कोणता व्यायाम करायला हवा हे कळत नाही. जॉन अब्राहमसारख्या सिक्स पॅक अॅब्ज सगळ्यांना मिळवणं शक्य आहे का, माधुरीचा फिटनेस, कतरिनाचा बांधा व्यायामानं कसा मिळवायचा.. आरोग्य आणि फिटनेसविषयीच्या अशा अनेक शंकांना थेट लीना मोगरे यांच्याकडून उत्तरं मिळवण्याची संधी व्हिवा लाउंजच्या निमित्ताने मिळणार आहे.

कधी : शुक्रवार, २७ नोव्हेंबर
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
वेळ : सायंकाळी ५.४५