वेदवती चिपळूणकर

‘रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात,’ असं म्हणून पुलंनी फार जुन्या काळीच आपल्याला अशा मानव अवतारांची ओळख करून दिली आहे, ज्यांना शब्दश: ‘वल्ली’ हे संबोधन वापरता येईल. फारसं कौतुकाचं नसलेलं ‘लीजण्ड’ हे संबोधन फार काही वाईट अर्थाने किंवा निगेटिव्हही वापरलं जात नाही. अवलिया असल्यासारखे वागणारे, बोलणारे आणि प्रत्येक बाबतीत तेवढाच ‘कहर’ करणाऱ्या या लोकांना ‘लीजण्ड’ म्हटलं जातं. पुन्हा एकदा हा मूळ शब्द जुनाच, अगदी सगळ्या शब्दकोशांमध्ये सापडेल, सहज सापडेल असा! पण सध्या ज्या कारणासाठी हा शब्द प्रसिद्ध आहे, असे मानवी नमुने मात्र कोणतीच डिक्शनरी देऊ  शकणार नाही.

या ‘लीजण्ड्स’ना कोणती एक व्याख्या लावता येत नाही किंवा कोणत्या एका ठरावीक क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवता येत नाही. पण साधारणत: सगळ्यात जास्त वेडेपणा करणारी किंवा सगळ्यात जास्त ‘इनोसंट’ असणारी अशी लीजण्ड्स एका टोकाला आणि कोणत्याही गोष्टीवर कितीही तिरपागडा विचार करू शकणारी लीजण्ड्स दुसऱ्या टोकाला! यांचं कोणत्याच गटांत विभाजन होऊ  शकत नाही. मित्रांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी असा लीजण्डरी नमुना असतो, तर काही वेळा समस्त ग्रुपच लीजण्ड्सचा बनलेला असतो. एखादाच लीजण्ड असणारा ग्रुप त्या एखाद्याच्या वेडेपणाला हसतो, पण लीजण्डरी असणारा ग्रुप मात्र रस्त्यावरच्या एखाद्या बॅनरवर कॅ मेऱ्याचं चित्र बघून लगेच त्याच्यासमोर पोज करतो आणि अख्खा ग्रुपच यात सामील असल्याने रस्त्यावरच्या इतर लोकांनाही गोंधळात टाकतो. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटामध्ये दाखवला गेलेला रस्त्यात आरडाओरडा करणारा ग्रुप अशाच ‘लीजण्ड्स’नी बनलेला असतो.

कधी काळी ‘लीजण्ड’ हा शब्द महान वगैरे लोकांना वापरला जायचा आणि लीजण्डरी हे विशेषण अशाच घटनांना वापरलं जायचं, ज्या ‘रिमार्केबल’ असायच्या. आता मात्र लीजण्ड हा शब्द अशा लोकांसाठी वापरला जातो ज्यांचा पांचटपणा, वेडेपणा, ‘इनोसन्स’ वगैरे वगैरे गोष्टी इतरांच्या कल्पनेच्या बाहेर असतात.

viva@expressindia.com