‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ नावाचा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडलाय. चित्रपट काय, कोणी तयार केलाय, कोणी काम केलंय या गुगलीय गोष्टी आम्ही तुमच्यावर सोपवतो. मागे ‘उडता पंजाब’चंही असंच झालं होतं म्हणजे. आम्ही विचार केला असं मॅक्रो बोलायलाच नको. व्यक्तीकडून समष्टीकडे म्हणजे वन टू मेनी जावं हा आपला पॅटर्न. पण आज ‘उल्टा सोचो’.

आम्ही पेपर उघडला. पेपर ही मोबाइलमधल्या अ‍ॅपवर वाचायची वस्तू झाल्यानंतरच्या काळातही आम्ही अजून कागदरूपी पेपर वाचायला प्राधान्य देतो. कसं आहे हाताच्या बोटांना पेपरची काळी शाई लागल्याशिवाय सकाळ झालीय असं वाटतच नाही. फ्रंटपेजवरच्या एका बातमीने आमचं लक्ष वेधून घेतलं. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला’ असंच हेडिंग होतं बातमीचं. साहित्य संमेलनं, परिसंवाद, चर्चासत्रं यांच्या पोकळ गप्पांच्या बातम्यांपेक्षा हे असली स्पाइसी आम्हाला फार आवडतं. बातमीत कालच्या बातमीचा स्क्रीनशॉटही टाकलेला. मूळ वक्तव्य काय होतं ते कळायला. सकारात्मकतेच्या पुंग्या वाजत असताना निगेटिव्ह पब्लिसिटीवर भर देणारी माणसं अ‍ॅडव्हेंचरस वाटतात आम्हाला. म्हणजे बघा ना- विकासपुरुष, कार्यसम्राट, गरिबांचे कैवारी, शोषितांचे मसिहा अशी प्रसिद्धी बहुतेकांना मिळते. पण जाहीर व्यासपीठावर काहीतरी बेधडक बोलायचं. जातीधर्मपंथासंदर्भात असेल तर बेस्टच. समोर चॅनेलचे कॅमेरे, बोरुबहाद्दर पत्रकार असताना. त्या वक्तव्यावरून गावभर खरंतर राज्यभर बभ्रा उडतो. शिंगावर घेतलं रावसाहेबांनी पण शेकेल प्रकरण असंही म्हणतात लोक. इनफ चर्चा झडली की एखाद्या बूमधारीसमोर उभं राहायचं. ‘संदर्भ तोडून काढलेलं वाक्य होतं ते. कोणालाही दुखावण्याचा प्रश्नच नाही. प्रतिमा मलिन करण्यासाठी वक्तव्याचा विपर्यास केला गेला’ असं गरीब चेहऱ्याने म्हणायचं. अशी अ‍ॅक्टिंग सोपी नाही राव. वैश्विक सत्य जाहीरपणे वदतानाही तुम्ही आम्ही तीन वेळा विचार करतो. इथे तर शाब्दिक ‘यू टर्न’ घ्यायचाय. लोक हल्ली सेन्सॉरशिपला घाबरतात. ‘इस सेन्सर से मुझे बचाओ’ अशी बॉलीवूडी दिग्दर्शकांची कॅम्पेनही पाहिली आम्ही सोशल मीडियावर. पण नेतेगणांना चिंता नाही. निलंबन वगैरे होतही असेल पण प्रसिद्धी मिळते. चांगलं काम करूनही एरव्ही मिळत नाही पण असं सेन्सेशनल बोललं की हमखास फुटेज मिळतं. असे बरेच ‘विपर्यासी’ भेटतात नियमितपणाने पण त्यांना सेन्सॉरचं भय नाही.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

पेपरचा फडशा पाडल्यावर आम्ही लगेच टीव्हीचा खोका ऑन केला. काल रात्रीचा चॅनेलीय चर्चेचा कल्लोळ रिपीट दाखवत होते. १३-१४ विंडोंमधून दिसणारी माणसं एकाच वेळी बोलत असल्याने चर्चेचा विषयही कळेना. विखारी वैयक्तिक टीका केल्याने एक मान्यवर मध्येच उठून निघाले. त्यांच्या कुडत्याच्या कॉलरला लावलेला माइक ताब्यात घेण्यासाठी प्रॉडक्शनची धावपळ उडाली. तावातावाने बोलताना अचानक निघाल्याने त्यांचा पाय खाली पसरलेल्या वायरींच्या जंजाळात अडकला. तेवढय़ातच अँकरने ब्रेक घेतला. दाढीच्या शेव्हिंग क्रीमची जाहिरात आली. तीन ललना एका हँडसम अशा माणसाला क्रीम चोपडून देत होत्या. शेव्हिंग क्रीम ब्रशला चोपडून चेहऱ्यावर पसरवण्याच्या कामाला मिनीटभरही लागत नाही. स्वावलंबी कामासाठी तीन माणसं, म्हणजे बाईमाणसं. क्रयशक्तीचा अपव्यय पाहून चॅनेल तात्काळ बदलला. स्पोर्ट्स चॅनेल आला. प्रीमॅच शो सुरू होता. सगळे माजी क्रिकेटपटू आपादमस्तक ढकलेले होते. या सगळ्यांच्या मध्ये अल्पवस्त्रांकित अँकरिका बसली होती.  विश्लेषण वगैरे ठीक आहे हो; टीआरपीचं काय. ते बघावं लागतं. सेन्सॉरशिपपेक्षा व्ह्य़ूअरशिप महत्त्वाची.

मॅच सुरू होईना. मग कंटाळून डान्स शोचं चॅनेल लावलं. एक परफॉर्मन्स सुरू होता. तो पाहताना हा डान्स शो आहे की सर्कस हेच कळेना. तेवढय़ात आम्हाला आवडत्या चॅनेलची आठवण झाली. मग तिकडे गेलो. मोजून ७ दिवसांत अदनान सामी अवतारावरून मिलिंद सोमण मोडमध्ये आणणाऱ्या जाहिरातींचं चॅनेल. सगळ्यात भारी म्हणजे पूर्ण वैराण डोक्यावर ३ दिवसांत केशनिर्मित्ती. आंघोळ रोज करावीच या विचाराचे नसल्याने ‘डेली सोप’ आम्ही पाहातच नाही. काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहावे म्हणून मांडीसंगणक (लॅपटॉप) सुरू केला. वेब सीरिज फार आवडतात आम्हाला. पिक्चरच्या आधी कागद दाखवतात तसला सेन्सॉरशिप प्रकार लागूच होत नाही यांना. त्यामुळे ‘ब-भ-च-फ’ शब्दांनी सुरू होणारे भाषीय आविष्कार मनमुरादपणे अनुभवू शकतो. सगळी मांडणी इन्फॉर्मल त्यामुळे ‘जे मनी (येथे मनी हा शब्द मनातलं या अर्थी घ्यावा) ते पडद्यावरी’ होऊ शकतं. इतक्यातच समोरचं काही ऐकूच येईनासं झालं. मागच्या सोसायटीत डीजे सुरू झाला. परवा रस्ता खणून मंडप घातला, काल खंडणीरूपी देणगी नेली. आज सण, म्हणजे ‘बजाते रहो’ स्वाभाविकच. वर उल्लेखलेल्या गोष्टींना ‘अनुशासन पर्व’ लागू होत नाही. मग सिनेमालाच का, असा प्रश्न पडेल तुम्हाला. ‘समाजात घडतं ते सिनेमांत दिसतं’ का ‘सिनेमात दाखवतात ते समाजात घडू लागतं’ हा कोंबडी आधी की अंडंसदृश प्रश्न तुम्हाला पाडून आम्ही रजा घेतो.

(सेन्सॉर म्हणजे प्रतिभेची गळचेपी असा लेख, सेन्सॉर मंडळाविरोधात याचिका, सेन्सॉरला हद्दपार करा या मागणीसह आंदोलन, ठिय्या, मोर्चे यापैकी काहीही करणं ही सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल. आम्ही तटस्थ भूमिकेतून तुमची कृती न्याहाळू.)

 

viva @expressindia.com

पराग फाटक