24 February 2021

News Flash

खाऊच्या शोधकथा : लॉलीपॉप

लॉलीपॉप या शब्दात बाह्य़दुनियेची कवाडं मिटून स्वत:तच रममाण होण्याची एक छान सोय आहे.

आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

काही पदार्थामध्ये तुम्हाला थेट बालपणात नेण्याची ताकद असते. अगदी नव्वदीतला माणूसही ज्या गोष्टी हाती किंबहुना ओठी आल्यावर ‘बचपन के दिन भुला ना देना’ गात लहान व्हावा अशी गोळी म्हणजे लॉलीपॉप. लहान वयात गोळ्यांच्या वर्गीकरणाचा आपला अभ्यास पक्का असतो. कमी पैशांत स्वत:सोबत मित्र-मैत्रिणींनाही खाऊ  घालायच्या त्या लिमलेटच्या गोळ्या आणि गोड मिट्ट आनंदात रमून स्वान्तसुखाय चाखायचे ते लॉलीपॉप.

लॉलीपॉप या शब्दात बाह्य़दुनियेची कवाडं मिटून स्वत:तच रममाण होण्याची एक छान सोय आहे. लॉलीपॉप हा शब्द नवा असला तरी ही संकल्पना खूप जुनी आहे. अगदी आदीम आहे. गुहेत राहणाऱ्या आदीमानवानेही मधाच्या पोळ्यातून मध गोळा करताना बारक्या काडीचा उपयोग केला होता. त्या काडीवरचा सुकला मध फुकट जाऊ  नये याकरता तो त्या काडीसह चाखला जात असे. लॉलीपॉपची संकल्पना ही या मूळ कल्पनेच्या खूप जवळची आहे. चिनी, अरबी, इजिप्शियन मंडळी फळं वा सुकामेवा मधात बुडवून त्याचं मिश्रण काडीला लावून सुकवत आणि नंतर कालांतराने अगदी चवीने चाखत. मध उन्हात सुकवून कडक केल्याने बारक्या काडीच्या वापराशिवाय ते चाखणंही शक्य नसे. हे अगदी मूळ रूपातले लॉलिपॉपच म्हणायला हरकत नाही.

आधुनिक काळात कँडी, गोळी रूपातील लॉलीपॉपचं अस्तित्व १७व्या शतकात ठळकपणे दिसून आलं. सिव्हिल वॉरच्या काळात पेन्सिलच्या टोकाला लावलेल्या गोळीचं लहान मुलांना आकर्षण होतं. याच काळात साखरेच्या उत्पादनातही विलक्षण वाढ झाली होती. त्यामुळे इंग्लिशमन बॉइल्ड शुगर कँडी खूप मोठय़ा प्रमाणात आणि आवडीने खात. अशाप्रकारे साखरेचं आणि पर्यायाने गोळ्यांचं वाढतं प्रमाण कँडी उत्पादकाच्या कल्पनेला वाव देणारं ठरलं. १९०८ साली आलेल्या एका मशीनने याला हातभार लावला. ही मशीन तासाला जवळपास २४०० कँडीज काडीच्या टोकावर फिट्ट बसवत असे. १९१२ मध्ये सॅम्युअल बॉर्न नामक रशियन गृहस्थाने असं यंत्र बनवलं ज्या यंत्राद्वारे तयार कँडीत स्टिक घुसवणं शक्य होऊ  लागलं. या संपूर्ण प्रवासात जॉर्ज स्मिथ यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. जॉर्ज स्मिथ १९०८ पासून लॉलीपॉप बनवण्याच्या व्यवसायात होते. मात्र १९३१ साली त्यांनी या विशिष्ट काडीसह येणाऱ्या गोळीला लॉलीपॉप नामक संज्ञेने व्यापारचिन्हांकित केलं. दांडीसह येणारी घट्ट गोळी म्हणजे लॉलीपॉप हे समीकरण त्यांनी जोडलं. असं म्हणतात की, जॉर्ज स्मिथ यांचा रेसकोर्समधील अतिशय लाडका घोडा लॉलीपॉप याच्यावरून त्यांनी या गोळीला हे नाव दिलं पण हा मुद्दा थोडासा विवादास्पद आहे.

लॉली या शब्दाचा उत्तर इंग्लंडमधील भाषेत जीभ असा अर्थ होतो. तर पॉप म्हणजे slap. जिभेला मिळालेला झटका, तडका असं या गोळीचं वर्णन करता येईल का? नावाचा आणि या गोळीच्या रूपाचा संबंध असो वा नसो पण हे लॉलीपॉप आपल्याला टोटल रोलीपोली करून टाकतं यात शंकाच नाही. मराठी वा संस्कृतमध्ये लॉलीपॉपचं ‘शर्करायुक्त घनगोल यष्टी’ असं वर्णन कुठेतरी वाचल्याचं आठवतं, पण ते मेंदूला उमजेपर्यंत लॉलीपॉपच अंगवळणी पडून जातं.

लॉलीपॉप ही कँडी लव्हर्ससाठी एका छान सोय आहे. जिभेत घोळवली जाणारी गोळी पूर्ण तोंड मिट्ट गोड करत असेल तर लॉलीपॉप मात्र आपल्या सोयीने गोळीचा गोडवा जिभेत झिरपवण्याची मुभा देते. गोळीसारखा लॉलीपॉप तोंडात धरून चघळण्याची सक्ती नाही. हवा तसा हवा तितका वेळ लॉलीपॉप ओठी धरावा. लॉलीपॉपच्या त्या स्टिकमुळे हात चिकट होण्याचा व्यापही टळतो. लहानपणी शाळा सुटल्यावर लॉलीपॉप ओठी धरून आपल्याच तंद्रीत घरापर्यंतचा प्रवास केल्याच्या आठवणी अनेकांच्या गाठी जमा असतील. उष्टं खाऊ  नये हे कळण्याच्या आधी आपापल्या पैशाने घेतलेला लॉलीपॉप चघळता चघळता मित्राच्या हातातला लॉलीपॉप ‘ए मला दे ना’ म्हणत चाखण्याचा मोहही लहानपणीच्या डायरीत अनेकांनी नोंदवलेला असेल.

आपल्या लहानपणापासून ते आजच्या चिल्यापिल्यांपर्यंत लॉलीपॉप तितकंच हिट आहे. आपल्या लहानपणीचा तो लॉलीपॉपचा गोल गुंडा आता चकतीसारखा भला मोठा होऊन या पिढीला रिझवतोय. आकार बदलला तरी नातं तेच आहे. हात चिकट न करता आस्वाद देण्याचा लॉलिपॉपचा नेटकेपणा एखाद्या शेफलाही मोहित करून गेला असावा. त्यातल्याच कुणीतरी या बालकांच्या लॉलीपॉपला खवय्यांच्या चिकन डिशमध्ये स्थान दिलं. काटय़ाचमच्याचा वापर न करता चिकन पीस आणि आपलं तोंड यांची थेट भेट घडवणारे चिकन लॉलीपॉप त्यामुळेच लोकांच्या पसंतीस उतरलेले दिसते. लॉलीपॉपचा हा झणझणीत अवतार मूळ रूपाच्या गुणाला जागला आहे.

मोठं झाल्यावर आपल्या नकळत ‘जग काय म्हणेल’चा अदृश्य बोर्ड गळ्यात घालून फिरणारे आपण, लहानपणीची लॉलीपॉपसोबतची यारीदोस्ती विसरून मोठ्ठं झाल्याचा आभास तर निर्माण करतो खरे ! पण मला खात्री आहे की आजही वयाच्या गणितापलीकडे हातात लॉलीपॉप आल्यावर कोण काय म्हणेल याचा विचार न करता ते ओठी धरण्याचा मोह होतो. दुनियेला विसरून बिनधास्त लॉलीपॉप खाणाऱ्यांच्या कानी, हे काय लहान मुलांसारखं? हा प्रश्न हमखास येतो. एखाददिवशी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं. एक छानसा लॉलीपॉप विकत घ्यावा. प्रेमाने त्याच्याकडे पाहात त्याच्या व आपल्यामधील प्लास्टिकचं आवरण दूर करावं. त्यानंतरची स्वादानुभूती इहलोकातील सर्व कटकटी, व्याप यांना दूर कुठेतरी सोडून तुम्हाला बालपणीचा निवांतपणा नक्की देईल. अगदी नक्की!

आपल्या लहानपणीचा तो लॉलीपॉपचा गोल गुंडा आता चकतीसारखा भला मोठा होऊन या पिढीला रिझवतोय. आकार बदलला तरी नातं तेच आहे. हात चिकट न करता आस्वाद देण्याचा लॉलिपॉपचा नेटकेपणा एखाद्या शेफलाही मोहित करून गेला असावा. त्यातल्याच कुणीतरी या बालकांच्या लॉलीपॉपला खवय्यांच्या चिकन डिशमध्ये स्थान दिलं आणि चिकन लॉलीपॉपचा जन्म झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 5:34 am

Web Title: lollipop
Next Stories
1 जिलेबी
2 खिचडी
3 पिझ्झा
Just Now!
X