तिथे प्रेमाची सुरुवात होते. पहिली नजरानजर, चिडवाचिडवी,त्यानंतर मैत्री आणि मग प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात.. त्याच जागी पहिली ब्रेक-अपची ठिणगीही पडलेली असते. ती जागा म्हणजे कट्टा. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! नवी कोरी, शॉर्ट आणि स्वीट लेखमालिका.

मी तुमच्यासारखाच तुमच्यातच येऊन हरवलेला आणि कुठे तरी तुम्हाला वेगवेगळ्या रूपांत सापडत गेलेला.. मी पिढय़ान्पिढय़ा एकाच जागी ठाण मांडून बसलोय हे खरं! पण तुम्ही पोरं मनाने मला कुठे कुठे घेऊन गेलात.. कॉलेजजवळच्या नाक्यावरून मोबाइलवर आणि सीसीडीपासून तुमचं.. आजकाल काय आलंय ते.. हां..बर्गरकिंग.. हे असं सर्वदूर पसरत नेलंत तुम्ही मला स्वत:बरोबर. हे असं असलं तरी इथे वर्षांनुर्वष ठाण मांडून बसलेल्या माझ्यापाशी यायचा शिरस्ता काही तुम्ही चुकवला नाहीत. केवळ तुमच्यातल्या उत्साहाने मला चिरतरुण ठेवलंय. एकदा तुमचे पाय मला लागले की, आपलं वेगळंच टय़ुिनग जमून जातं नाही! तुमचं माझ्याशी.. माझं तुमच्याशी एक अव्यक्ताचं नातं जुळत जातं. ही वर्दळ.. हा गजबजाट.. तुमचा हशा.. चहा, सँडविच, सिगारेटींचे झुरके, मफली.. असं सगळं सगळं दिवसाअखेरीस ओसरतं. तुम्ही तुमच्या तुमच्या वेगळ्या वाटांनी परतता. जाताना तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला रितं करून जाताय असं, पण तुमच्या नकळत तुम्ही तुमच्यामागे किती काय काय ठेवून जात असता याची तुम्हाला कल्पना नाही. रिकामा गाभारा कसा एक भारलेपण लेवून असतो तसा तुमच्या परतीनंतरचा मीही भारल्यागत! तुमच्या चेष्टामस्करीत, भांडणात.. नेत्रपल्लवीत, करपल्लवीत. त्यांच्या मागे सोडलेल्या नाना आठवणींत मनसोक्त रमून जाणारा.. तुमच्या अनाहत नादाने सतत दुमदुमत राहणारा. तुम्ही मला आजवर चिक्कार प्रेम दिलंत.. नाऊ इट्स माय टर्न बडीज!
तुमच्यासाठी माझ्याकडून एक थोडीशी गंमत! सध्या माझ्या काही भन्नाट दोस्तांच्या जगात नेमकं काय चाललंय ते मला कळतच नाहीये. त्यांचे प्रश्न.. मत्री आणि प्रेमाबद्दलचे समज-गरसमज.. भ्रम-विभ्रम.. असं काय काय मी कित्येक दिवसांपासून पाहतोय, ऐकतोय. काही जण प्रचंड बडबड करणारे.. काही अगदीच म्युट.. भले इतरांना ऐकू जात नसलं तरी माझ्या या म्युट दोस्तांचं म्हणणंही मला ऐकू येतंच की! पण काहीही म्हणा, ही सगळीच मंडळी खूप जेन्युइन.. खरी खरी दोस्तमंडळी आहेत माझी!
त्यांना पडलेले सगळेच्या सगळे प्रश्न मलाही पडलेत. प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असतातच म्हणा. माझ्या या दोस्तांचं वाटणं, एक्स्प्रेस होणं, लो फील करणं, कधी तरी भलतंच खुशीत येणं, कधी तरी अचानक मिक्स्ड फीिलग्ज, हे सगळं माझ्या आत आत भिनत गेलंय. त्यांचे सगळे किस्से, त्यांचं नात्यांचं जग, प्रेमाबिमाची जाण कम कुतूहल.. असं सगळंच मला तुम्हाला छान फुरसतीने सांगायचंय. बघू.. तुमचेही प्रश्न आमच्यासारखेच आहेत का! आपण सगळे मिळून आपल्या उत्तरांचा शोध घेऊ या! चला, मी करतो सुरुवात एक एक किस्से सांगायला. मला माहितीये.. तुम्ही तुमच्या या लाडक्या कट्टय़ाला आज नक्की बोलू द्याल, कारण तो खूप क्षण.. तास.. दिवस.. वर्षे.. गप्पच बसलाय!
एक गंमत सांगू? तुम्हाला वाटतं नं.. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप चांगलं ओळखता असं? पण तुम्ही पूर्णपणे ओळखता का हो त्यांना? तुम्ही त्यांना जितके ओळखता त्याच्या पलीकडेही त्यांच्या मनात खूप काय काय चाललेलं असतं. हेच सगळं तुमच्या या कट्टय़ाला म्हणजे मला दिसतं. माझ्या नजरेतले हे माझे.. तुमचे बडीज.. गाइज अदरवाइज कसे असतात माहितीये? ऐका तर मग.. (क्रमश:)