मी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून आलोय. सध्या पुण्यात परीक्षेच्या तयारीसाठी एका रूमवर राहतोय. माझ्या रूमच्या समोर राहणारी एक मुलगी मला आवडते. ती पहिल्यापासून शहरात वाढलेली आहे, हुशार आहे, सुंदर आहे. आम्ही एकमेकांचे मित्र नाही. पण कधी कधी थोडेफार बोलतो त्यावरून मला असं वाटतंय की, तिलाही माझ्याबद्दल सॉफ्टकॉर्नर असावा. माझा प्रश्न असा आहे की तिला माझ्या प्रेमाबद्दल कसं सांगू? प्रपोज करू का? खरंच मी तिला आवडत असेन का? नाही म्हणाली तर काय? हल्ली या विचारांनी माझं अभ्यासात मन लागत नाही. माझं प्रेम सिरियस आहे. मी काय करू?
– एक दोस्त

प्रिय दोस्ता,
पुण्याची हवाच अशी आहे की ज्यामुळे तरुणाईला अभ्यासाव्यतिरिक्तही निराळीच ओढ लागते. आता ही तरुणाई छोटय़ा गावातील असो की मोठय़ा गावातील, नगर की शहरी काहीही फरक पडत नाही. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, छोटय़ा गावातल्या की मोठय़ा गावातील सगळ्याचं सेम असतं’.. आणि म्हणून जर तुला वाटत असेल की, तुला ती आवडते व तिला तू आवडत असशील तर बिनधास्त मैत्री कर ना तिच्याशी. फक्त एक लक्षात घे, मैत्रीची सुरुवात ‘आय लव यू’ने होत नाही, तर एकमेकांबद्दल वाटणाऱ्या कुतूहलाने होते, जाणिवेने होते. त्यातून आपल्याला एकमेकांचा स्वभाव, विचार, एकमेकांचे गुण व अवगुण समजतात. ‘व्यक्ती’ या सगळ्याचे मिळून ‘पॅकेजडील’ असते. त्या व्यक्तीशी जेव्हा आपण मैत्री करतो, जेव्हा ती व्यक्ती मोठी होते, अनुभवी होते, तेव्हा ती विचार करायला लागते की, आपलं एकमेकांच्या आयुष्यात काय स्थान आहे? एकमेकांचे करिअर, कौटुंबिक स्थान, स्थिती काय आहे? आणि एकमेकांची स्वप्ने काय आहेत याचाही विचार होतो आणि जबाबदाऱ्या काय? तेही विचारात घेतले जाते. या सर्व जबाबदाऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू होतो आणि ज्यात स्त्री-पुरुष समानतेचा भाव असतो तेव्हाच त्याला बावनकशी प्रेम म्हणता येईल.

मित्रा, तू तर मैत्रीच्या पहिल्याच ओळखीत घायाळ झालेला दिसतो आहेस. अभ्यासावरती लक्ष नाही वगैरे, वगैरे बोलतो आहेस. यासाठीच का तू छोटय़ा गावातून मोठय़ा शहरात आला आहेस? प्रेमात असा अव्यवहारीपणा कधीच नसतो. तेव्हा शांत हो. दोन घोट पाणी पी आणि अभ्यासाला लाग. मनातल्या मनात वाजणारी प्रेमाची विरहगीते बंद कर आणि आमीर खानप्रमाणे रुमाल अडकवून ‘आती क्या खंडाला’ वगैरे असं विचारून तुझ्या मैत्रीचं हसंदेखील करू नको. क्षणभराच्या आकर्षणाच्या पुढे करिअर महत्त्वाचं कधीच नसतं, पण प्रेम जपण्यासाठी करिअर महत्त्वाचं असतं. तेव्हा या काय, कुठल्याच मैत्रिणीसाठी करिअरकडे दुर्लक्ष करू नकोस. दोस्ता, एक सांग.. पुण्यातल्या इतक्या मुलींमध्ये तुला हीच आवडली ना रे? म्हणजेच बाकीच्या नाही आवडल्या. (तेवढय़ाशा). मग काय? बाकीच्या मुली मुळा-मुठेच्या बाजूला काय रडत बसल्यात का? नाही ना? मग समजा ती तुला नाही म्हणाली तर तुलादेखील मुळा-मुठेच्या किनारी रडत बसायची काही गरज नाही. त्यामुळे जरी तुझं अभ्यासाकडे लक्ष लागायला लागलं तर बरं होईल आणि तुझं नाणं जर खणखणीत असेल तर तुझ्याशी मैत्री करायला कोणालाही छानच वाटेल. तेव्हा आता या इश्काच्या इंगळीला शांत कर, अभ्यासावरचं लक्ष उडवू नकोस आणि त्या मैत्रिणीबरोबर चांगली मैत्री कर. ल्ल

मोकळं व्हा!
आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. मनाची घालमेल तीच आहे, पण कारणं वेगळी आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. द्विधा मन:स्थितीतून, मानसिक गुंत्यातून आपल्याला मोकळं करील, आपल्या मनातली भीती, द्वेष, शंका दूर करील. आपला प्रश्न किती साधा आहे, बाष्कळ आहे, फालतू आहे, असं म्हणून आपल्याला हसणार नाही.. तू किती मूर्ख आहेस, अशी आपली टर उडवणार नाही.. असं कुणी तरी तेव्हा हवं असतं. मनात खोलवर रुतून त्रास देणारे प्रश्न उलगडण्यासाठी असंच कुणी तरी हवं असतं.