News Flash

‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा

माझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात.

कस्तुरी कसबेकर, लक्झ्मबर्ग

कस्तुरी कसबेकर, लक्झ्मबर्ग

माझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात. या देशाचं नावही ऐकलं नव्हतं कधी. त्यामुळे लगेच गुगलमॅपवर शोध घेतल्यावर हा देश बेल्जियम, जर्मनी आणि फ्रान्समध्ये लपलेला छोटासा देश आहे, एवढी माहिती हाती लागली.

पुढचं प्रोजेक्ट लक्झ्मबर्गला. लक्झ्मबर्ग! कुठे आहे? हा देश कसा आहे? वगैरे वगैरे खंडीभर प्रश्न मनात आलेच. हे चित्र होतं गेल्या वर्षीचं. या वर्षभरात ते पालटलं आणि आता मी विचारते, लक्झ्मबर्ग!.. नाम तो सुना होगा! आयटी क्षेत्रात असल्यामुळे प्रोजेक्टच्या ठिकाणी जावं लागतं. माझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात. या देशाचं नावही ऐकलं नव्हतं कधी. त्यामुळे लगेच गुगलमॅपवर शोध घेतल्यावर हा देश बेल्जियम, जर्मनी आणि फ्रान्समध्ये लपलेला छोटासा देश आहे, एवढी माहिती हाती लागली. मी गुगल मॅप पाहिला खरा, पण माझ्यासाठी तो पूर्णपणे अनोळखी देश होता. जर्मनीतल्या ओळखीच्यांकडून त्याविषयी काही जुजबी माहिती मिळाली. त्यामुळे कोऱ्या मनाने इथे पोहोचले. पोहोचले तेव्हा हिवाळा सुरू होता. बर्फ पडत असल्याने फारशी वर्दळ नव्हती आणि इथे सूर्यास्त तीन-चारलाच होतो. त्या सुरुवातीच्या काळात हे वातावरण मला बिलकूल आवडलं नव्हतं. पुढे काही काळाने मी रुळू लागले. प्रोजेक्ट आकार घेऊ  लागला. इथल्या हवामानाचा, लोकांचा अंदाज येऊ  लागला. तसतशी या देशाबद्दल आपुलकी वाटू लागली.

या देशात जवळजवळ ४८ टक्के लोक बाहेरचे आहेत. लक्झ्मबर्गच्या सीमेलगतचे देश आहेत बेल्जिअम, फ्रान्स आणि जर्मनी. तिथले लोक इथे येतात, नोकरी करतात आणि जातात. इथे भारतीय वंशाचे लोकही बऱ्यापैकी आहेत. लक्झ्मबर्गमध्ये जवळपास दीडशे बँका आहेत. अमेझॉन आणि स्काइपची युरोपमधली मुख्यालये इथे आहेत. स्काइपचा श्रीगणेशा इथेच झाला. अर्सेलर मित्तल ही स्टील कंपनीही इथे आहे. इथली कार्यसंस्कृती युरोपीयन पद्धतीची आहे, तर जीवनशैलीवर फ्रेंच जीवनशैलीचा प्रभाव अधिक आहे. अमेरिकन लोक थोडे अग्रेसिव्ह असतात. फ्रेंच लोक थोडे आरामशीर जीवन पसंत करतात. बहुतांशी लोक सकाळी ७ वाजता ऑफिसला हजर होतात. तीन-चार वाजता घरी जायला निघतात, कारण ते जर्मनी किंवा बेल्जिअमच्या सीमावर्ती भागांतून आलेले असतात. वर्क -लाइफ बॅलन्स आहे. प्रत्येकाला दिलेल्या ठरावीक तासांत काम पूर्ण करायचं आहे. काही कंपन्यांमध्ये सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात. उदाहरणार्थ- समरमध्ये समरड्रिंक्स अरेंज केली जातात किंवा कधी बार्बेक्यू केला जातो. सगळे जण भेटावेत, त्यांनी बोलावं, एकत्र यावं हा यामागचा उद्देश असतो. मात्र हा तासाभराचा वेळ ऑफिस अवर्समधलाच असतो.

इथे लक्झ्मबर्गीश या बोलीभाषेसह फ्रेंच भाषा प्रामुख्याने बोलली जाते. लक्झ्मबर्गीश ही जर्मन भाषेच्या जवळ जाणारी भाषा आहे. लोक फ्रेंडली, प्रेमळ असले तरी मात्र भाषेचा थोडासा प्रश्न येतोच. स्थानिक लोक लक्झ्मबर्गीश बोलतात. त्यांना इंग्लिश फारसं येत नाही. मुलांना शाळेत जर्मन, फ्रेंच आणि लक्झ्मबर्गीश या तीन भाषा शिकवल्या जातात. पुढे उच्चशिक्षण घेताना मुलांचा इंग्रजीशी परिचय होत असल्याने त्यांचं इंग्रजी तितकंसं चांगलं नाही. त्यामुळं त्यांच्याशी फ्रेंच किंवा लक्झ्मबर्गीशमध्ये संवाद साधल्यास ते चांगलं बोलतात. मला जर्मन भाषा येत होती थोडीफार. फ्रेंच इथे आल्यावर शिकते आहे. आमच्या मीटिंग्जही बहुतांशी वेळा फ्रेंचमध्ये होतात. त्यामुळे सुरुवातीला मुख्य संवाद साधण्यातच अडथळा येत होता. आता फ्रेंच शिकायला लागल्याने गोष्टी सुकर होऊ  लागल्या आहेत. रोजच्या व्यवहारांतही फ्रेंचचा उपयोग होऊ  लागला आहे.

युरोपमध्ये जाण्यासाठी लागतो तो शेंगेन व्हिसा. शेंगेन हे याच देशातलं मोसेला नदीकाठी वसलेलं एक शहर आहे. त्याच्या सीमेला लागून जर्मनी व फ्रान्सच्या सीमा आहेत. शेंगेनला ‘बर्थप्लेस ऑफ युरोप विदाऊ ट बॉर्डर्स’ असं म्हटलं जातं. शेंगेन तहाची स्वाक्षरी राजकन्या मारिया अँस्ट्रीडने मोसेला नदीकिनारी केली होती. जर्मन, फ्रान्स व लक्झ्मबर्ग हे तीनही देश शेंगेन शहरापाशी एकमेकांलगत असल्याने तहाच्या स्वाक्षरीसाठी हे शहर निवडण्यात आलं. इथे एक युरोपीयन म्युझियमही बांधण्यात आलं आहे.

हा देश संस्कृतीप्रधान आहे. काही जुन्या रूढी अजूनही इथे सांभाळल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘शुबरफॉयर’ म्हणजे आपल्याकडे जत्रा असते तशी जत्रा. ही जत्रा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होते आणि वीस दिवस चालते. त्यामध्ये निरनिराळे खेळ, चित्तथरारक कसरती, रोमहर्षक खेळ, खाण्यापिण्याची अगदी रेलचेल असते. स्थानिक पदार्थ- गोमपेरेकिचेलचेरचे स्टॉल्स भरपूर असतात. हा पदार्थ म्हणजे कांदा, बटाटय़ाचा कीस आणि अंडय़ाचं कटलेट यांचं मिश्रण असतो. लहानथोर सर्व जण या जत्रेत सहभागी होतात. दरवर्षी ही जत्रा मोठय़ा उत्साहाने भरताना दिसते. मला आपल्या जत्रेचीच आठवण आली. अशा ठिकाणी जाण्यामुळे त्याच त्या रुटिनपेक्षा थोडा विरंगुळा मिळतो. काही जण तिथे फक्त पार्टीसाठी येतात, काही फक्त खेळण्यासाठी, तर काही जण चक्क फक्त खादाडी करतात. एरवी इथे चटकन लोक दिसत नाहीत, पण अशा इव्हेंट्सच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. गेली अनेक वर्षे इथे ग्रेप वाइन फेस्टिव्हल सुरू आहे. द्राक्षांचे मळे असणारे रहिवासी ग्रेप हार्वेस्टसाठी, वाइन पिण्यासाठी लोकांना आमंत्रण देतात. मुख्यत्वे ग्रेव्हिनमार्कर आणि रेमीश् या भागांमध्ये साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हा फेस्टिव्हल साजरा होतो. याच कालावधीत अ‍ॅपल पिकिंगचीही प्रथा आहे. सफरचंदाचे बागाईतदार आपल्या बागा सर्वासाठी खुल्या करतात. लोक आपल्या आवडीप्रमाणे सफरचंद झाडावरून तोडून विकत घेतात. तेव्हा सफरचंदाचा जॅम, सरबतही विकत मिळतं.

या देशाच्या खाद्यसंस्कृतीत फ्रान्स व जर्मनीतील पदार्थाचं मिश्रण आहे. इथली बेकरी उत्पादनं अप्रतिम आहेत. ‘ओबरविस’ या सुप्रसिद्ध बेकरीतला माक्रॉन हा पदार्थ त्यांची खासियत आहे. इथले ‘ज्युड मॅट गार्डेबाअनेन्’ अर्थात पोर्क आणि बीनचा पदार्थ, ‘कॅचकेइस्’ किंवा ‘कॅ नकॉईलोट्टे’ अर्थातच चीज हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. इथल्या भारतीय स्टोअर्समध्ये इडलीच्या पिठापासून ते चटणीपर्यंत, मसाले, फ्रोझन पोळ्या, भाज्या, खोवलेला नारळ आदी अनेक गोष्टी मिळतात. त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. नेपाळी लोकांची वस्तीही इथे खूप असून त्यांचीही पाच-सहा रेस्तराँ आहेत. मात्र त्यांच्या पदार्थाना भारतीय पदार्थाची तितकीशी चव नाही.

भारतीय वंशाच्या लोकांच्या रेस्तराँमध्ये आपल्याला हव्या त्या चवीचे पदार्थ करून दिले जातात. इथे फक्त दाक्षिणात्य रेस्तराँ नाही. भारतीय रेस्तराँ पंजाबी लोकांची आहेत. मराठी पदार्थ आणि वस्तू इथे मिळत नसल्याने येतानाच पुष्कळसं सामान आणलं आणि नंतर मागवलंही. फास्टफूडला खूप महत्त्व असल्याने मॅकडोनाल्डस् आणि बर्गर किंग फार आवडते आहेत. तरुणाईत बीअर पिण्याचं प्रमाण खूपच आहे.

इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच पार्क आहेत. सायन्स म्युझिअम्स आहेत. मोठय़ांचं आणि मुलांचं व्यवधान गुंतून राहावं, अशा अ‍ॅक्टिव्हिटीज सतत चालू असतात. फिटनेससाठी प्रायव्हेट क्लासेस घेतले जातात. योगाचे क्लासेस चालतात. शिवाय साल्सा, झुंबा वगैरे नृत्य प्रकार फिटनेससाठी शिकले जातात. उन्हाळ्यात सायकलिंग वगैरे गोष्टी आवडीने केल्या जातात. मी स्वत: योगा करते आणि जिमला जाते. या आरोग्यदायी सवयींना इथे आल्यावर अधिक चालना मिळाली. इथे आपली कामं आपणच करायची असतात. भारतात त्यामानाने मदतीचा हात मिळतो, सामान चटकन उपलब्ध होतं. थोडीशी धावपळ होतेच. ‘इंडियन असोसिएशन ऑफ लक्झ्मबर्ग’ हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सणवार साजरे करतो. शिवाय एकमेकांना ओळखणारे भारतीय वंशाचे लोक ग्रुपने उत्सवाचं सेलिब्रेशन करतात. ‘दिवाळी पॉटलक’ म्हणजे प्रत्येक कुटुंबाने काही तरी खायला आणायचं आणि एकत्र सेलिब्रेट करायचं. मध्यंतरी ‘इंडिया डे’ सेलिब्रेट करण्यात आला. भारतीय नृत्य प्रकार आणि खाद्यपदार्थाची स्टॉल्सच्या माध्यमातून माहिती देत लोकांना भारताविषयीची सविस्तर माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश होता. २३ जूनला ‘लक्झमबर्ग नॅशनल डे’च्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी असते. त्या दिवशी परेड असते. संध्याकाळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही केली जाते.

इथे मी खूप ट्रेक्स केलेत. वॉकिंग ट्रेल्स करता करता निसर्गाच्या सान्निध्यात जाता येतं. त्यामुळे मन:शांती मिळते आणि आपसूक व्यायामही होतो. मला केक शिकायची खूप आवड असून इथल्या बेकरीमध्ये केक शिकायचा आहे. इथली तरुणाई समाजमाध्यमांवर बऱ्यापैकी अ‍ॅक्टिव्ह आहे. मीडियात बघितलेल्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे काही गोष्टी प्रत्यक्ष न बघता त्याबद्दल मत तयार होतं. विशेषत: भारतामधल्या घडामोडींबद्दलच्या बातम्यांमुळे भारतात येणं त्यांना असुरक्षित वाटतं. हा नकारात्मक परिणाम दूर सारण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था, स्त्रीशक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आदींची माहिती द्यायचा मी प्रयत्न करते. लक्झ्मबर्गमधले लोक आपल्याला आपलंसं करून घेतात. आपल्या ज्ञानाला मान दिला जातो. त्यामुळे आपल्याला इथली जीवनशैली आवडू शकते.. आता तुम्ही निदान एवढं तर नक्की म्हणू शकाल.. लक्झ्मबर्ग, नाम तो सुना हैं.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:40 am

Web Title: luxembourg tourism luxembourg city nightlife in luxembourg
Next Stories
1 ‘कट्टा’उवाच : लीजण्ड
2  ‘पॉप्यु’लिस्ट : झिरपलेले संगीत..
3 ब्रॅण्डनामा : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन
Just Now!
X