कलाकाराची खरी कसोटी असते ती म्हणजे रसिकांचं मन जिकणं. त्यात तो संगीतकार असो, चित्रकार असो किंवा अगदी ‘शेफ’सुद्धा. कलिनरी आर्ट्सच्या माध्यमातून एखाद्या नव्या पदार्थाची चव रसिकांना चाखायला लावायची नव्हे त्यांच्या जिभेवर ती रेंगाळत राहील इतक्या सुंदर चवीचा पदार्थ बनवायचा म्हणजे ‘शेफ’साठी ही मोठीच कामगिरी असते. सध्या कुकिंगमध्ये मिठाईकारांचा प्रचंड बोलबाला आहे. त्यातही बेक पदार्थ विशेषत: केक, पेस्ट्रीज हे पदार्थ गल्लोगल्ली उपलब्ध असताना त्याला आपला ‘मिडास टच’ देत नव्या रूपात, ढंगात लोकांसमोर आणणाऱ्या आघाडीच्या शेफपैकी एक नाव आहे ते पूजा धिंग्राचं.. मनातील कल्पना चक्क केकवर उतरवत खवय्यांना खिलवणारी ही आजची तरुण ‘कल्ला’कार आहे.

पूजाचं नाव आजवर झालंय ते तिच्या अगदी पहिल्याच ‘मॅकारून’ या स्वीट डिशमुळे. तिने गेल्या वर्षांत व आत्तापर्यंत मक्रू न्स ते कपकेक्समध्ये खूप प्रयोग केले. पण सध्या ती एका महत्त्वाच्या प्रयोगात व्यग्र आहे, तो म्हणजे सेलिब्रेटींच्या फॅशनचे म्हणजेच सेलिब्रेटींनी कान्स महोत्सवात घातलेल्या गाऊन्सवरून प्रेरणा घेऊन त्या कपडय़ांवरील डिझाइनचे मोठे केक्स आणि कपकेक्स ती तयार करतेय. सध्या तिने सोनम कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय-बच्चन यांचा कान्समधला रेड कार्पेटवरचा लुक केकवर डिझाइन केलाय. त्यांपैकी दीपिकाचा लुक हा तिने मक्रून्ससाठी डिझाइन केला. तिने हे सर्व स्वत:च्या कल्पनेने तयार केले आहे. ‘खरं तर एखादा केक किंवा पेस्ट्री कस्टमाइज करण्याकडे माझा जास्त भर आहे. या क्षेत्रात खूप डेकोरेशन आणि डिझाइनसाठी वाव असतो’, असं पूजा म्हणते. तसेच हॉलीवूडमधीलही अभिनेत्रींच्या कान्समधील डिझानयर गाऊ न्सची प्रेरणा घेऊन तिने कपकेक्स तयार केले आहेत.

पूजाने कधी शेफ व्हायचं स्वप्न पाहिलं नव्हतं; परंतु ‘लॉ स्कूल’मध्ये असताना अगदी अचानकच आत्या-मावशींसोबत एका घरगुती कार्यक्रमासाठी पहिल्यांदा तिने ‘ब्राऊनी’ तयार केली. अंडी, बटर, पीठ, साखर नुसत्या या पदार्थानी किती चविष्ट गोड पदार्थ बनतो याच विचाराने ती भारावून गेली. इतका साधा विचार तिच्या मनात आला आणि लगेचच तिने आपलं मन हॉटेल मॅनेजमेंटकडे वळवलं. तिने तिचं लॉचं शिक्षण सोडलं आणि नंतर थेट स्वित्र्झलडला ‘सीझर रीट्स कॉलेज’मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटसाठी अ‍ॅडमिशन घेतलं. पूजा म्हणते की, ‘वकिली करायची असं मी कधीच ठरवलं नव्हतं. तसंच शेफ म्हणून काही करायचं आहे हा विचारही केला नव्हता. मात्र स्वित्र्झलडला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून मी त्यात पुरती रमून गेले होते. कलात्मक गोष्टींचा व माझा तसा कधीच संबंध आला नव्हता, पण काही तरी वेगळं करायला मिळत होतं. आणि सुदैवाने मला त्यात गती येत होती, त्यामुळे त्यावरचा आत्मविश्वासही वाढला’. पूजाला या पदार्थाचं डेकोरेशनच मुळात आकर्षित करीत होतं. त्यामुळे नक्की एखाद्या केकवर डिझाइन कसं करतात हे शिकणं म्हत्त्वाचं वाटलं. एका ओळखीतल्या मित्राने पॅरिसचं नाव सुचवल्यावर पूजाने थेट कलेचं माहेरघर असणाऱ्या पॅरिसमध्ये ‘ले कॉरडन ब्ल्यू’ या  नामांकित कॉलेजमधून वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची माहिती व त्यावरची कलाकुसर शिकून घेतली. तिथल्या मोठमोठय़ा शेफशी तिची ओळख झाली. तिथल्या तिच्या वर्गातील सहकाऱ्यांबरोबर अख्खं पॅरिस पालथं घालत वेगवेगळ्या पद्धतीच्या पेस्ट्रीज बनवणं तिने शिकून घेतलं.

पूजाचं नाव २०१४ मध्ये फोर्ब्सच्या संपूर्ण आशियामधील ‘यंग सक्सेसफुल वुमन टॉप ३०’ या यादीत झळकलं. त्याचप्रमाणे सेलिब्रेटी फॅशन ग्लोसीज्मध्ये ती गणली जाते. सोशल मीडियावर तिचे ३ लाखपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. ‘इंडिया फिल्म प्रोजेक्ट’सारख्या मंचावर तिचे इव्हेंट झाले आहेत. सध्या ती वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इव्हेंट्स घेते. फ्रेंच फ्लेवरवर आधारित बरेच पदार्थ ती मुंबईत बडय़ा सेलिबेट्रीज पार्टीसाठी तयार करते. मुंबईत परळ, बांद्रय़ाला तिचे सेंट्रल किचन्स् आहेत. मोठय़ा लग्न समारंभासाठीदेखील तिने मोठय़ा इंचाचे केक्स तयार केले आहेत. ‘जीसी वॉचेस’च्या ग्लोबल कॅम्पेनसाठी ‘राइझिंग स्टार’ म्हणून तिची निवड झाली होती.

कुठेही नोकरी न करता पॅरिसमधून भारतात आल्यावर २०१० मध्ये तिने तिचं स्वत:चं ‘ले १५ पॅटीसरी’ आणि ‘ले १५ – कॅफे’ नावांची पेस्ट्री शॉप्स सुरू केली. त्यानंतर अल्पावधीतच एकीकडे फूड पार्लर सुरू करीत असतानाच दुसरीकडे ‘स्टुडिओ फिफ्टीन कलिनरी सेंटर’ नामक पेस्ट्री शॉपही तिने सुरू केले. पॅरिसमधून तिने व्यावसायिक शिक्षण घेतलेलं होतंच, परंतु सुरुवातीला एका विशिष्ट पदार्थासाठी लागणारे साहित्य तिला मिळत नव्हतं. पॅरिसमधून भारतात आल्यावर तिकडची तंत्रं तिला काही केल्या इथं वापरता येत नव्हती. ‘जेव्हा मी माझं पेस्ट्री शॉप सुरू केलं तेव्हा मला तशा साहित्यांची यादी मिळत नव्हती. पॅरिसमध्ये असताना आम्ही ठरवलेलं साहित्य व तंत्र वापरायचो, पण इकडे मी तयार केलेले बरेच पदार्थ म्हणजेच एखादी पेस्ट्री किंवा केक वातावरणातील उष्णतेमुळे त्यावरचं आवरण, बटर आणि इतर डेकोरेट केलेलं चीज, कॅरेमल, चॉकलेट वगैरे सर्व खराब होत होतं. विरघळायला लागलं. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे काही घडत नव्हतं. त्या वेळेस बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. मानसिकरीत्याही तणावाचे प्रसंग आले होते’, असं ती सांगते.

केकवरची कलाकुसर ही फार कठीण होत गेली, पण नंतर प्रत्येक गोष्ट सरावाने होतेच. केक किंवा कपकेक्सवरची कलाकुसर करताना माप लक्षात घेऊन मग आतलं डिझाईन व बाहेरचं डिझाइन हे तयार करून द्यावं लागतं. वेगवेगळ्या घटकांनी आम्ही त्या त्या रंगाच्या चवीनुसार केक डेकोरेट करतो. पेपरिंग करून डिझाइन करणे वगैरे आलंच. त्याआधी आम्ही ट्रायल केक तयार करतो, मग त्यामध्ये असणाऱ्या चुका आम्ही लक्षात घेतो. मग त्यावर प्रयोग करणं हे ओघाने येतंच. यानुसार आम्ही मग आमच्या तशा पद्धती निश्चित करून पुढे त्यानुसारच पदार्थ बनवतो. जेणेकरून परत काही चुका होत नाहीत. मग आम्ही फायनल प्लॅटिंग व फिनिशिंग करतो. सर्व कलाकुसर ही आम्ही कोणत्याही अंगाने डिझाइन करतो किंवा आम्हाला आमचे ग्राहकही बऱ्याचदा डिझाइन्स सुचवतात. त्यांच्या गरजेप्रमाणे आम्ही तशी कलाकुसर केकवर करून देतो, असं ती म्हणते. कधी कधी ती प्रक्रिया फार मोठी असते. कारण एकाच केकवर जर वेगळं डिझाइन स्ट्रक्चर करायचं असेल तर त्यासाठी वेगळे घटक पदार्थ लागतात. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रांनी आम्ही ती कलाकुसर करतो. त्यातही बरेच प्रकार असतात. जसं केक बेक करताना आम्ही त्यावर डिझाइन करतो. खरं तर किचनमध्ये काम करताना खूप कठीणही होतं जातं. जेव्हा ग्राहक आमच्याकडे येतात तेव्हा नक्की संकल्पना काय आणि कार्यक्रम कशाबद्दल आहे हे आम्ही समजून घेतो. त्यानंतर डिझायनिंगला सुरुवात होते. ‘कला, शास्त्र व तंत्र’ या तीन गोष्टींवर अवलंबून मी केक्सवर प्रयोग करते. म्हणूनच दर वेळी मला एक नवी प्रेरणा मिळते आणि नवं आव्हान पेलण्यासाठी मी तयारीत असते, असं पूजा विश्वासाने सांगते.

खरं तर पूजाच्या घरचे सगळेच खवय्ये असल्याने लहानपणापासून नातेवाइकांकडे जाताना तिला विविध पदार्थ खायला मिळत होते. ‘माझ्या बाबांचं स्वत:चं मेक्सिकन रेस्टॉरंट आहे. त्यामुळे लहानपणापासून जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा विशेषत: उन्हाळ्याच्या सुट्टीत मी रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसायचे. तिकडचा वावर मला आरामदायी वाटायचा. बाबांच्या रेस्टॉरंटमध्ये बसून तिथे काम करणाऱ्या लोकांना मी बघायचे. त्यामुळे एक रेस्टॉरंट कसं चालवतात ते हळूहळू कळत गेलं. त्याचा फायदा मला आताही होतो’, असं पूजा सांगते. मी या क्षेत्रात आले तेव्हा चांगल्या व वाईट दोन्ही बाजू स्वीकारल्या. बिझनेस करताना खूपदा तुम्हाला खाली खेचणारे हातही असतात. पण सुदैवाने मला सगळ्या आव्हानांची जाणीव असल्यामुळे मी ती आनंदाने स्वीकारली, असं तिने सांगितलं.

लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत अगदी हौशीने ‘कपकेक्स्’, ‘चॉक्स्’, ‘पेस्ट्रीज्’, ‘टार्टस्’, ‘केक्स्’, ‘मक्रून्स’ यांचा आस्वाद घेणारे अनोखे चाहते मला रोज भेटतात. पॅरिसला असताना तिकडच्या पाहुण्यांनीही माझ्या कलेची स्तुती केली होती, असं म्हणत सोनम कपूर, मसाबा गुप्ता, नचिकेत बर्वे, श्रद्धा कपूर अशा अनेक सेलिब्रेटींजनी तिच्या पेस्ट्री शॉपला भेट दिल्याचं तिने सांगितलं. पूजा सध्या तिच्या शॉपमध्ये क्लासेसही घेते. ती मक्रून्स तर शिकवतेच, पण अजून एक वैशिष्टय़ म्हणजे ती सध्या ग्रीन टीमधून तयार होणाऱ्या केक, कपकेक्सवरही काम करतेय व शिकवतेय. पूजाचे फावल्या वेळात हिप-हॉप डान्स, योगा हे आवडीचे विषय आहेत. त्याचबरोबर ‘बिग बुक ऑफ ट्रिटस्’सारखं पुस्तकही तिने लिहिलं आहे. अशा हरहुन्नरी ‘कल्ला’काराला भरभरून दाद द्यावी तेवढी कमी..!

तरुणांसाठी प्रत्येक क्षेत्रात संधी असतात असं मला वाटतं, पण त्या ओळखल्या पाहिजेत. मी कधीकाळी फक्त आईच्या हातचे केक्स बघून मोठी होत गेले. मला कधीच वाटलं नव्हतं की मी परदेशात जाऊन केक बनवणं शिकेन. त्यासाठी चिकाटी व बेधडकपणा असणंच महत्त्वाचं असतं. मी कलेपेक्षा आनंद आणि उत्साह यावर विश्वास ठेवला. त्यामुळे कुठल्याही नवीन संधीवर काम करताना मला जास्त मजा येते.        -पूजा धिंग्रा