25 November 2017

News Flash

आऊट ऑफ फॅशन : ‘मॅचो’मॅन बदलला!

एकेकाळी स्वत:चा ‘मॅचो’पणा साजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या मुलांची पिढी आता काहीशी मवाळ झाली आहे.

मृणाल भगत | Updated: July 7, 2017 12:38 AM

गुलाबी शर्ट, फ्लोरल प्रिंट्स, ब्युटी टिप्स एरवी मुलींच्या फॅशनविश्वात सर्रास वापरले जाणारे हे शब्द आता मुलांच्या लुक्सबद्दल बोलतानाही येऊ लागले आहेत. एकेकाळी स्वत:चा ‘मॅचो’पणा साजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या मुलांची पिढी आता काहीशी मवाळ झाली आहे. त्यामुळे एकीकडे ‘हल्लीच्या मुलांना झालंय काय?’ हा प्रश्न कित्येकांना बुचकळ्यात पडतोय, तर काहींना हा बदल भावलाय. पण या सगळ्या प्रवासात मुलांनी संवेदनशीलपणा केवळ लुकमध्ये नाही तर त्यांच्या स्वभावात पण मुरवला आहे, हे मात्र खरं.

फवाद खान, रणवीर सिंग, वरुण धवन, शाहीद कपूर ते अगदी अलीकडचा प्रभास इथपर्यंत मुलींना आपल्या प्रेमात पाडणाऱ्या या नायकांमध्ये एक समान सूत्र काय आहे? अर्थात या यादीची सुरवात त्यांच्या गुड लुक्सपासून होणार हे साहजिकच आहे. त्यांचं स्क्रीनवरचं ‘दिसणं’, सिक्स पॅक अ‍ॅब्स, भन्नाट केस हे सगळे पारंपरिक मुद्दे अजूनही मुलींना पडद्यवरच्या नायकाच्या प्रेमात पडायला कारणीभूत ठरतातच. पण त्याचबरोबर आता नायकाचा ‘स्वभाव’, त्याचं वागणं हेही मुलींसाठी महत्त्वाचं ठरू लागलं आहे. युद्धभूमीवर शत्रूविरुद्ध लढणाऱ्या बाहुबलीपेक्षा देवसेनेच्या प्रत्येक निर्णयात तिच्यामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या बाहुबलीची छबी मुलींना अधिक भावली. आपल्याला आवडलेल्या मुलीने होकार देईपर्यंत तिला प्रेमाच्या नावाखाली हरप्रकारे त्रास देण्यापेक्षा नायिके च्या कामाला मान देऊन घरी परतणारा बद्रीनाथ हा आजच्या तरुणींचा नायक आहे. ‘आर. राजकुमार’मधील अँटी हिरो नायकापेक्षा शाहीद कपूर वास्तवात लग्नानंतर समजूतदार नवऱ्याच्या रूपाने दिसू लागला तेव्हा तो जास्त चर्चेत आला. रणवीर सिंगच्या ‘मॅचो’, ‘दिल्ली का मुंडा’ या प्रतिमेपलीकडे ही त्याची प्रत्येक भूमिकेमागे घेतलेली मेहनत, कामावरची निष्ठा, दीपिका आणि त्याच्या नात्यातील समजूतदारपणा याबद्दल अधिक बोललं जातं.

गेल्या काही वर्षांपासून ‘नायकत्वा’ची व्याख्या बदलते आहे. एकीकडे नायिकाप्रधान सिनेमांमुळे अभिनेत्री म्हणजे शोभेची बाहुली ही संकल्पना बदलते आहे. तर दुसरीकडे नायकही अधिकाधिक समजूतदार होत आहेत. अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’चा काळ मागे लोटला असताना बॉलीवूड नायकांनी टपोरी, हेकेखोर, नायिकेला शेवटपर्यंत त्रास देणाऱ्या नायकाच्या छबीचा स्वीकार करायला सुरवात केली. अगदी नायक सुसंस्कृत, शहरी घरातील असला तरी नायिकेला मिळविण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जाऊ  शकतो, या मताचा पुरस्कार इतकी वर्षे सिनेमांमध्ये सर्रास केला गेला. पण गेल्या काही वर्षांतील नायकांची छबी ही पद्धत मोडू पाहत आहे. त्यांच्या पडद्यावरच्या बदलत गेलेल्या छबीचा इथे ऊहापोहकरण्याचं कारण म्हणजे हा बदल फक्त सिनेमांपुरता नाही. त्यांची पडद्यावरची प्रतिमा संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांच्यात जाणवणारा बदल हा त्यांच्या फॅ शनमध्येही दिसून येतो आहे. समाजमाध्यमे, करियरचे वेगवेगळे पर्याय, बदलती जीवनपद्धती यांचा परिणाम म्हणून मुलांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला आहे. हा बदल त्यांच्या इतर वैयक्तिक आवडीनिवडीइतकाच कपडय़ांच्या निवडीमध्येही तितकाच अलगद उतरलेला दिसतो.

आत्तापर्यंत मुलींची मक्तेदारी असलेला गुलाबी रंग मुलांच्या कपाटात शिरला हे आपण याआधी वाचलं, पाहिलं आहे. गुलाबी शर्ट, ट्राऊझर, जॅकेट एवढंच नाही तर गुलाबी टाय, शूज, बॅगपॅकही मुलांकडे आवर्जून पाहायला मिळतात. ब्रेकअप झाल्यानंतर ऑनलाइन साईटवरून गुलाबी ब्लेझर आणि फ्लोरल शर्ट घातलेला जाहिरातीतील मुलगा ‘वेकअप’ मोड झाल्याचं मान्य करताना मनाची सकारात्मकता लक्षात आणून देतो. हा गुलाबी रंग जसा त्यांनी आपलासा केला तसंच त्यांच्या साचेबद्ध फॉर्मल कपडय़ांमध्येही बरेच बदल झाले. नारंगी, पिवळा, पोपटी, आकाशी असे फ्रेश रंग, नाजूक प्रिंट्स, रंगीत पँट्स, आरामदायी ब्लेझर, सूटचे पर्याय असे कित्येक नजरेत येणारे बदल गेल्या काही वर्षांत दिसून येतात. आता तर अगदी ‘फ्रायडे ड्रेसिंग’सारख्या प्रकारांमध्ये शॉर्ट पँटसुद्धा आवर्जून वापरल्या जातात. मस्क्युलीन लुकचा करारी साचा मोडत कपडय़ांमधील  फेमिनीन नजाकतता आता मुलांनीसुद्धा स्वीकारली आहे. धोती पँट, कुर्ता, सलवार, दुपट्टा यांच्यासोबत कपडय़ांचे वेगवगळे प्रयोग मुले आवर्जून क रतात. अगदी मेकअप नाही, पण सुंदर दिसण्याची मुलांची खटपट आणि आजच्या जगाची गरज याच्याबाबत मागे आपण बोललो आहोतच. पण ‘छान सजण्याचं काम मुलींचं’ या समजुतीचा काळही मागे पडतो आहे. नथ, ब्रेसलेट, पेंडेंट, कानबाली असे मुलांच्या ज्वेलरीचेसुद्धा कितीतरी प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एरवी प्लेन टी-शर्ट किंवा स्ट्राईप शर्टच्या पुढे न जाणारी मुलांच्या खरेदीची यादी आता फंकी प्रिंट्स, पॅटर्नपर्यंत जाऊन पोहचली आहे. अगदी सॉक्स, बॉक्सर, टोपीसारख्या कपडय़ांच्या छोटय़ा प्रकारांमध्येसुद्धा कितीतरी पर्याय पाहायला मिळतात. बो, टाय यांच्यातील वेगळेपण आता ऑफिसेसमध्येही स्वीकारायला सुरवात झाली आहे. एरवी मुंबईच्या कडक उन्हातसुद्धा फिटेड गंजी, ब्लॅक लेदर जॅकेट, घट्ट डेनिम आणि डोळ्यावर चष्मा या रावडी प्रतिमेला छेद देत सुटसुटीत टी-शर्ट, समर श्रग आणि धोती असा मस्त लुक आता कुल ठरतोय. उगाचच ‘कुल’पणाच्या नावाखाली भडक रंग, विचित्र प्रिंट्स वापरण्याऐवजी नाजूक, सुंदर फ्लोरल, समर प्रिंट्स मुलांच्या कपाटात पाहायला मिळत आहेत. टी-शर्ट्सवर प्रिंट केल्या जाणाऱ्या आक्रमक कोट्सची जागाही आता सकारात्मक कोट्सनी घेतली आहे.

कपडे आणि स्वभाव यांच्यातील साम्य याबद्दल बोलू तितकं कमी आहे. आधुनिक पुरुषपणाची व्याख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने बदलते आहे. मुलींवर सत्ता गाजवून, अरेरावी, मिजास दाखवून मर्दुमकी सिद्ध करता येत नाही, याची जाणीव मुलांनाही होऊ  लागली आहे. त्यांच्या स्वभावातील मवाळपणा अर्थातच त्यांच्या कपडय़ांमध्ये उतरला आहे. पटत नसेल तर एकदा मुलांच्या कपाटात झाकून नक्कीच बघा.

viva@expressindia.com

First Published on July 7, 2017 12:36 am

Web Title: macho man look change macho man fashion macho man trend