News Flash

उन्हाळ्यात मेकअप करताय?

मेकअप करणे ही आता केवळ नटण्याची गोष्ट राहिली नसून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून येण्यासाठी ती महत्त्वाची गोष्ट झाली आहे.

आपल्या कामाबरोबरच स्वत:ला प्रेझेंट करणे ही आता काळाची गरज झाली आहे. तुमच्या राहण्याला आणि दिसण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मेकअप करणे ही आता केवळ नटण्याची गोष्ट राहिली नसून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून येण्यासाठी ती महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आपण कितीही घाईत असलो तरी स्वत:ला नीट कॅ री करायचे असल्यास किमान लिपस्टिक आणि काजळ किंवा आयलायनर तरी हवेच असे मानणाऱ्या अनेक मुली आणि स्त्रिया आपल्या आसपास असतातच. भर उन्हातही हाच लूक कायम ठेवणे थोडेसे त्रासदायक वाटत असले तरी अवघड नक्कीच नाही. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे, त्यामुळे घाम पुसत असतानाच आपला मेकअप तर खराब होणार नाही ना अशी चिंता अनेकींना असते. आता उन्हाळ्याच्या दिवसांतही तुम्हाला नेहमीसारखेच अप टु डेट दिसायचे असेल तर मेकअपसाठी उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

फेशियल करताना..

फेशियल करणे ही हल्ली अनेकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. कधी चेहरा खराब झाला म्हणून तर कधी थकवा आला  म्हणून फेशियल केले जाते. याचा रक्ताभिसरण क्रिया चांगली होण्याबरोबरच चेहरा ताजातवाना दिसण्यासाठीही उपयोग होतो. चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने त्याची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.  फेशियलमुळे त्वचा स्वच्छ होते तसेच मृत भाग बाहेर जाण्यास मदत होते. याबरोबरच वाढलेले वय लपवण्यासाठीही फेशियलचा चांगला उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये त्वचा घामाने चिकट होते, तसेच काळवंडते. पण याच काळात लग्नसराई असल्याने फेशियलशिवाय पर्याय नसतो. अशावेळी आपल्या त्वचेला सूट होईल असे चांगले फेशियल करावे.

 • तुमच्या त्वचेला सूट होईल असे फेशियल निवडा.
 • फेशियलआधी वॅक्सिंग आणि शेव्हिंग करू नका.
 • चेहऱ्याला काहीही न लावता फेशियल करण्यासाठी जा.
 • फेशियल आधी आणि नंतर लगेच उन्हात जाणे टाळा.

सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना..

 • ‘फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं’, या विचारानेच प्रत्येकजण लग्न सोहळ्यात आपण छान कसे दिसू याचा विचार करत असतात. कपडय़ांच्या खरेदीपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सगळ्याचीच खरेदी करतात. मात्र या वस्तू खरेदी करतानाही योग्य ती काळज घ्यायला हवी.
 • आपण खरेदी करत असलेली वस्तू चांगल्या ब्रँडची आहे की नाही तपासून घेणे.
 • लिपस्टिक, लायनर, फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट यांची शेड आपल्या त्वचेवर सूट होईल अशी आहे का ते तपासणे. त्या प्रसाधनाची एक्सपायरी डेट न विसरता तपासणे.

लिपस्टिक कशी आणि कोणती वापरावी?

लिपस्टिक लावणे ही आता पूर्वीप्रमाणे केवळ हौस राहिली नसून मेकअपचा दैनंदिन भाग झाली आहे. पूर्वी केवळ सणसमारंभांना जाताना किंवा लग्नकार्यात लिपस्टिक लावली जात असे. मात्र, आता व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी लिपस्टिक लावल्यास त्यात काही वावगे मानले जात नाही. ही लिपस्टिक जास्त उठावदार दिसावी आणि दीर्घकाळ टिकून रहावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते.

 • कोरडय़ा ओठांवर लिपस्टिक लावताना त्याआधी लिपग्लॉस वापरावा.
 • मिसमॅच लिप लायनर लावू नये.
 • जुनी लिपस्टिक वापरल्याने ओठ खराब होतात.
 • जास्त काळ आणि सतत लिपस्टिक लावली तरीही ओठ खराब होतात.

बोल्ड कलर्स उन्हाळ्यात जास्त चांगले दिसतात. टॅंजरिन, रेड, प्लम, हॉट पिंकच्या वेगवेगळ्या शेड्स तुमचा समर लुक खुलण्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतात. ग्लिटर लिप्स लुकसाठी तुम्ही कलर टॅंजेरिन टॅंगोसारखी नारिंगी लिपशेड वापरून तिला ग्लिटर टॉप कोट देऊ  शकता.

तेलकट त्वचेसाठी

 • त्वचा खूपच तेलकट असेल तर त्यांनी चणा, मसूर किंवा मूगडाळीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने फायदा होतो. लिंबाच्या रसामुळे चेहऱ्यावरचा काळवंडलेपणा जातो. लिंबू नैसर्गिकरित्या टॅनिंग दूर करते. त्यामुळे याचा रोज वापर केला तर लवकरच फरक जाणवू लागतो.
 • जर तुमची त्वचा रुक्ष असेल तर त्यात लिंबाच्या रसाऐवजी दुधावरची साय वापरावी. काहीवेळ या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा आणि पाण्याने धुऊन टाकावे. सायीमुळे चेहऱ्याला चकाकी येते.
 • सारे प्रॉडक्ट हे वॉटरप्रूफ असले पाहिजेत. घामामुळे हळूहळू चेहऱ्यावर मेकअप फुटू लागतो. घाम आल्यामुळे आपण तो रुमालाने फुसतो पण या नादात मेकअपही निघून जातो. वॉटरप्रुफ मेकअप असल्याने तो घाम आला तरी पटकन निघून जात नाही.
 • ज्यांना सारखा घाम येतो त्यांनी सोबत ड्राय टिश्यू ठेवावे. घाम आला की तो हलकेच टिश्यूने टिपावा. यामुळे मेकअप खराब होत नाही.

काजळ लावताना..

 • ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्या चेहऱ्यावरील मेकअप काही काळाने पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे मेक अप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
 • आपण लावत असलेले काजळ चांगल्या गुणवत्तेचे असेल याची काळजी घ्या. त्यातही ते वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. हे काजळ स्थानिक ब्रँडचे असेल तर ते लगेच पसरते.
 • आपल्या डोळ्याभोवती तेलकटपणा आहे असे वाटल्यास डोळ्यांभोवती कापसाने पुसून त्याठिकाणी पावडर लावा आणि त्यानंतरच काजळ लावा.
 • काजळ योग्य पद्धतीने आणि पुरेसे लावल्यास ते पसरत नाही. मात्र खूप गडद काजळ लावल्यास ते नकळतपणे काही वेळाने डोळ्याच्या बाहेर येते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:03 am

Web Title: makeup in the summer summer makeup tips
Next Stories
1 फॅशनदार : फॅशन करिअर?
2 कॅफे कल्चर : कॅफे एक्सलसिअर शतकाच्या उंबरठय़ावर
3 ‘प्लस’ फॅशन
Just Now!
X