नवरात्र हा देवीचा सण, स्त्रीशक्तीचा जागर. विविध रूपातील शक्तीला पूजण्याचा उत्सव. आजच्या ‘प्रोफेशनल वुमन’मध्ये प्रेरणादायी शक्तीची विविध रूपं कशी दिसतात हे सांगणारं अभिनेता स्वप्निल जोशीचं हे पत्र..

सप्रेम नमस्कार!  पत्रास कारण की, उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होतोय. स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या या उत्सवाचं निमित्त साधत, बरेच दिवस मनात साठलेलं तुमच्याशी बोलायचं होतं. तुमच्याप्रति असलेल्या भावना किंबहुना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही  खरं तर मला ओळखता अभिनेता म्हणून. एक हीरो म्हणून. पडद्यावरचा हीरो मी असेन, पण मला असं वाटतं, तुम्हीच खऱ्या हीरो असता.. खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या. तुमच्याकडूनच मी प्रेरणा घेतो, शक्ती घेतो.

शक्ती म्हणजेच स्त्री . या शक्तीची दुर्गा, काली ही आक्रमक रूपं, तशी सरस्वती, लक्ष्मी ही शांत व वैभवशाली रूपंही आहेत. ही सगळीच रूपं विलोभनीय आहेत. तुम्हा स्त्रियांचीही अशी विविध रूपं आहेत. विविध क्षेत्रांत आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सक्षम, कणखर अशा ‘ प्रोफेशनल वुमन’चं तुमचं रूप आम्हाला तुमच्यातील शक्तीची जाणीव करून देतं, तर तितक्याच प्रेमळ आणि आत्मीयतेने आम्हाला खाऊपिऊ  घालणारं तुमचं गृहिणीचं रूप आम्हाला तुमच्या वात्सल्याची प्रचीती देतं. तुम्ही कोणत्याही रूपात असलात तरी नेहमी सुंदरच दिसता. इथे मी केवळ बाह्य़सौंदर्याविषयी बोलत नाहीये, आत्मिक सौंदर्याविषयी बोलतो आहे.       (उर्वरित पान २ वर)

हे तुमचं आत्मिक सौंदर्यच आम्हाला मोहात पाडतं. मला असं वाटतं की, सजीव सृष्टी निर्माण करताना निर्मात्याने सर्वात निर्मळ निर्मिती केली ती स्त्रीची. तुमच्यात जे अनेकविध कलागुण आहेत त्यांनी तुम्ही सर्वजणी आम्हाला आपलंस करता. माझ्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांची रूपं मला स्वतला खूप प्रेरणादायी वाटतात. तुम्ही सर्वजणी म्हणजेच आई, पत्नी, मैत्रिणी, सहकारी या सक्षम आणि स्वाभिमानी आहात. म्हणूनच तुम्ही मला जास्त सुंदर वाटता. तुम्ही नेहमी असंच असावं असं मला वाटतं.

माझ्या आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधील नायिकाही अशाच आत्मविश्वासू, बिनधास्त आणि तडफदार! या नायिकांसमोर अनेक संकटे आली, परंतु त्या संकटांना त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले. मला माझ्या चित्रपटांच्या दिग्दर्शक, लेखकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी मला अशा चित्रपटांतून भूमिका करण्याची संधी दिली. खरंतर आजकाल चित्रपटात एकच हीरो असा नसतोच. आजच्या नायिकाही सिनेमाच्या ‘हीरो’ असतात. आपल्या सशक्त अभिनयाने अभिनेत्री हे ‘हीरोइझम’ चित्रपटात उतरवतात. अभिनेत्रीच नव्हे तर दिग्दर्शिका, पाश्र्वगायिका, संगीत दिग्दर्शन, मेकअप आर्टिस्ट, वेशभूषाकार, विविध तंत्रज्ञ या अशा कितीतरी आघाडय़ांवर आपल्या उत्तम कामाचे कसब दाखवणाऱ्या तुम्ही सर्व स्त्रिया या नक्कीच पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने प्रगती करत आहात. मला सांगायला अभिमान वाटतो की ‘मितवा’ या चित्रपटात तर केवळ मी एकटा पुरुष होतो बाकी सर्व स्त्रिया पडद्यामागे आणि पडद्यावर विविध विभागांची धुरा सांभाळत होत्या. या कलाकृतीतील प्रत्येक अंगाला स्त्रीचा परीसस्पर्श लाभला आहे. त्यामुळे ही कलाकृती अधिक दमदार झाली आहे. आज संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच स्त्रीशक्तीचं दर्शन घडवणारी आहे असं नक्कीच म्हणता येईल.

या वेळी मला असंही सांगावंसं वाटतं की, चित्रपट क्षेत्राशी संबंधित स्त्रियांविषयी समाजाची असलेली संकुचित, बुरसटलेली विचारसरणी कधीच गळून पडली आहे. हे सकारात्मक चित्र निर्माण करणाऱ्या तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टी ही स्त्रीमय होऊ  पाहतेय त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रं तुम्ही लवकरच व्यापून टाकाल याची मला खात्री वाटते. जशी तुम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली आहे तसेच तुम्ही स्वसंरक्षणाचे धडेही गिरवले पाहिजेत. ही काळाची गरज आहे.

या पत्राच्या निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारताना मला समस्त पुरुषवर्गालाही सांगावंसं वाटतं की, स्त्रियांचा आदर तुम्ही करताच, पण स्त्रियांवर स्वसंरक्षणार्थ हात उचलायची वेळ येऊ  नये ही आपली जबाबदारी आहे. जाता जाता सर्व स्त्रियांना माझं एकच सांगणं आहे. तुम्ही स्त्रिया कस्तुरी मृगाप्रमाणे आहात. तुमच्याकडे कस्तुरी आहे. ती कस्तुरी ओळखा. या कस्तुरीचा सुगंध म्हणजेच तुमचं आत्मिक सौंदर्य. ते असंच दरवळत राहो. या कस्तुरीची जाणीव तुम्हाला झाली की वर्षांचा प्रत्येक दिवस हा स्त्रीशक्तीचा दिवस असेल, त्यासाठी कुठल्याही निमित्ताची गरज पडणार नाही. तुमच्या कस्तुरीच्या सुगंधाने तुम्ही आम्हालाही समृद्ध केलंय. त्याबद्दल तुमचे शतश: आभार.

तुम्हा सर्व जणींचा मित्र,

स्वप्निल जोशी

(शब्दांकन – अश्विनी पारकर)