24 January 2019

News Flash

‘कट्टा’उवाच : रीडलंत का?

आपण सगळ्याच प्रकारे इंग्रजीला आपल्या कोष्टकात बसवलंय.

संग्रहित छायाचित्र

‘लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं, थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं’, अशा संदीप खरेच्या ‘मार्लिश’ भाषेतल्या कवितेला आपण सगळ्यांनीच कधीकाळी दाद दिली होती. त्यावेळी कदाचित आपल्याला त्याने खूप हसायलाही आलं होतं किंवा ते थोडं अतिरंजितही वाटलं होतं, पण बोलण्याच्या ओघात आपण खरोखर अनेक इंग्रजी शब्दांना मराठमोळं कधी केलं हे आपल्यालाही कळलं नसेल. पण एक गोष्ट मात्र खरी की असं इंग्रजी शब्दांना मराठी व्याकरणात बसवणं हे काही आपल्याला नवीन नाही किंवा फक्त आपली पिढीच ते करते असंही नाही.

‘टेबल’ या शब्दाचं अनेकवचन ‘टेबलं’ असं करण्यापासून ते मराठीत ‘तो’ चित्रपट म्हणून इंग्रजीतही ‘तो’ मूव्ही असे युक्तिवाद करण्यापर्यंत आपण सगळ्याच प्रकारे इंग्रजीला आपल्या कोष्टकात बसवलंय. प्रत्येक पिढी तिच्या तरुणपणात इतकी कल्पक होती की येनकेनप्रकारेण इंग्रजीला मराठीच्या नियमांत बसवण्याचे प्रयत्न सगळ्याच पिढय़ांनी केले. आताच्या तरुणाईचं जग हे प्रामुख्याने सोशल मीडियाभोवती फिरणारं आहे. त्यामुळे इंग्रजी शब्द हेसुद्धा अनेकदा तंत्रज्ञानाशी संबंधित असतात. जसे अनेक भारतीय भाषांमधले शब्द ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीत समाविष्ट केले जातात तसेच हे इंग्रजी शब्द आपल्या ‘शब्दकोशात’ आपल्या साजात आणि आपल्या ढंगात सामावले जातात.

टाइप, प्रिंट, सेंड असे सगळे शब्द हे आपल्या इतक्या रोजच्या वापरातले झाले आहेत की आपण अनेकदा हीच क्रियापदं मराठीकरण करून वापरतो. ‘टायपून व्हायचंय अजून, झालं की सेंडवते’ असे शब्दप्रयोग अगदी सहजपणे वाक्यात होतात. व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप हल्ली ‘सोडला’ न जाता ‘लेफ्टला’ जातो आणि ग्रुपमध्ये माणसं नसून ‘लोक्स’ असतात. डॉक्युमेंट हे छापलं न जाता ‘प्रिंटलं’ जातं आणि ते वाचलं न जाता ‘रीडलं’ जातं. काही वेळा ही डॉक्युमेंट्स ‘वाचणेबल’ नसतात तर काही वेळा गोष्टी ‘सांगणेबल’ नसतात. माहीत नसलेली गोष्ट ‘सर्चली’ जाते किंवा ‘गूगल केली’ जाते. कॉपी केलेले डिजिटल शब्द ‘पेस्टले’ जातात आणि डिजिटल चित्र ‘पेंटली’ जातात.  भाषा ही परिवर्तनशील असते. त्यामुळे इंग्लिश-मराठीचं भांडण किंवा त्यातला वाद म्हणून किंवा इंग्रजीने मराठीवर कसा ‘कब्जा’ वगैरे केला आहे या दृष्टीने याकडे बघण्यापेक्षा इंग्रजीला मराठीप्रमाणे या तरुणाईने वळवून घेतलं आहे हा यातला थोडा गंमतीचा भाग. इंग्रजी शब्दांना मराठी नियमांत आणि व्याकरणात बसवून तयार होणारे हे डायलॉग कट्टय़ावरच्या तरुणाईची कल्पक निर्मिती आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून या भाषेकडे पाहिलं तर हे बदल सहजपणे स्वीकारता येतील. कोणत्याही बदलांना जितकं लवकर स्वीकारू तितके ते बदल अंगी भिनवायला सोपे पडतात. तसेच हे ‘चेंजेस’ लवकर ‘अ‍ॅक्सेप्ट’ केले तर आयुष्य खूप सहज ‘जगणेबल’ होईल, असं आपलं या पिढीचं ‘लॉजिक’ आहे.

viva@expressindia.com

First Published on February 9, 2018 12:34 am

Web Title: marathi language marathi word english words marathi grammar