ओमकार देशपांडे, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

आयटीमध्ये असल्याने मला अनेक देशांत फिरायला मिळालं. त्यापैकी मेलबर्नमध्ये वर्क-लाइफचा डोलारा चांगला सांभाळला जातो. लोक वेळेला आणि एकमेकांच्या गोष्टीला खूप किंमत देतात. इथले लोक डॉगसीटिंग करतात. प्रसंगी त्यासाठी हाफ डे घेतात. ही गोष्ट इथल्या लोकांसाठी खूप कॉमन आहे. कामाला न यायला काहीही कारण पुरतं आणि ते पुढं केलं जातं. मात्र कामाच्या वेळी काम गांभीर्याने केलं जातं.

गेले वर्षभर मी नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आहे. बायको माधवी आणि मुलगी गार्गी इथे राहायला येईपर्यंत मिळालेल्या फावल्या वेळात शक्य होईल तेवढा परिसर मी पायी फिरून पाहिला. त्यामुळे भवताल समजायला-उमजायला मदत होते. मुख्य मेलबर्न सिटीत फिरलो आणि ‘ग्रेट ओशिअन रोड’ या बेस्ट स्पॉटवर दोन-तीनदा जाऊन आलो. समुद्राला लागून असणाऱ्या या रोडचा ट्रेल या महिन्यात करायचा विचार आहे. एकूणच माणसांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेण्याला इथे पहिलं प्राधान्य दिलं जातं. मीदेखील आता फर्स्ट एड ट्रेनिंग कोर्सला जाणार आहे. लोकांना हा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने बघत असल्याने लोक हा कोर्स करतातच. कुठलाही कितीही दुर्गम भाग असला तरी तिथे अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा अतिशय तत्पर आहे. कोणतीही गोष्ट शिकताना सुरक्षेचा विचार हा पहिल्यांदा केला जातो. पादचारी चुकून रस्त्यावर गेले तरी गाडीचालक लगेच थांबतो आणि पादचाऱ्यांना जाऊ  देतो. लहानपणापासूनच सगळ्यांना या बाबतीत शिकवण दिली जात असल्याने ते आपसूकच अंगी बाणलं जातं.

मेलबर्न मोस्ट लिव्हेबल सिटी आहे. इथे नवीन लोकांचा स्वीकार सहजगत्या केला जातो. मेलबर्नमध्ये अधिकांशी चायनीज, भारतीय आणि परदेशी लोकही राहतात. लोकांना आपल्यात सामावून घेण्याची कला स्थानिकांना जमली आहे. कुणावर हल्ला वगैरे होण्यासारख्या गोष्टी बहुतांशी वेळा शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणामुळे होतात. आपण सामान्य माणसांच्या ओळखीचे असलो-नसलो तरी ते हसून ग्रीट करतात. सगळे शिष्टाचार व्यवस्थितपणे पाळले जातात. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी शिकलो, जी भारतात क्वचितच केली जाते ती गोष्ट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच ती व्यक्ती त्या ठिकाणी हजर असते. दोनच मिनिटं उशीर होणार असेल तरी ती व्यक्ती मेसेज करून तसं कळवते. कारण इथं स्वत:चा आणि समोरच्याच्या वेळेला किंमत दिली जाते.

इथले टीव्ही आणि रेडिओ प्रोग्रॅम्स सगळ्यांनी आठ वाजता झोपावं, याच दृष्टिकोनातून डिझाइन केलेले असतात. इथले लोक ते फॉलोही करतात. लवकर झोपल्यामुळे सकाळी सात वाजता कामावर हजर होतात. मला सेट व्हायला बराच वेळ लागला. सगळ्या पद्धती आणि जीवनमान समजून घ्यावं लागलं. सुरुवातीला राहण्यासाठी मी हॉटेल बुक केलं होतं. लोक लहानपणापासूनच स्वयंसिद्ध असल्याने इतरांनाही सगळं माहिती असेल, असं गृहीत धरतात. आपणहून त्यांना विचारल्याशिवाय मदत करत नाहीत. त्यामुळे पहिले दोन महिने घर शोधताना आणि व्यवहार करताना थोडासा त्रास झाला. या गोष्टी शोधेपर्यंत वेळ लागला. बहुतांशी व्यवहार ऑनलाइन होतात. इथली ट्रॅकिंग हिस्ट्री मजबूत आहे. सगळ्या गोष्टी काटेकोरपणे आणि नियमांनुसारच केल्या जातात.

स्थानिक इतर लोकांशी संवाद कमी साधतात, पण कधी काही व्यवहार प्रत्यक्षात करायला गेलात तर तिथले लोक फार विनम्रपणे बोलतात. काही जुजबी चौकशी करतात. आरोग्य व्यवहार आपल्याहून वेगळा आहे. जनरल फिजिशियनकडे पहिल्यांदा जावं लागतं. त्यानं शिफारस केली तरच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता येतं. ते साधारणपणे औषधं देत नाहीत. आवश्यक असल्यासच देतात. त्या त्या आजाराविषयी सविस्तर माहिती देतात. इथे ‘नर्स ऑन कॉल’ सेवा आहे. बरं नाही असं वाटल्यावर एका टोल फ्री नंबरवर प्रोफेशनल नर्स काही उपाययोजना सांगतात. तरीही बरं वाटलं नाही तर काय करावं, तेही सुचवतात.

फिटनेसच्या बाबतीत इथल्या लोकांनी प्रेरणा दिली आणि मी जिमला जाऊ  लागलो. आमच्या कंपनीत लोकांना पर्सनल ट्रेनर ट्रेनिंग देते. ऑफिस मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या बाजूलाच असून तिथे किंवा अन्य ग्राऊंडवर जाऊन व्यायाम करता येतो. इथे फिटनेसला पहिलं प्राधान्य दिलंच जातं. दिवसातल्या कुठल्याही वेळी रनिंग, जॉगिंग करणारे लोक दिसतात. ठरावीक वेळीच खातात-पितात आणि डाएट चार्ट काटेकोरपणे पाळतात. जवळपास सगळे जण सडपातळ बांध्याचे आहेत. जिमला जाऊन व्यायाम करायला वेळ नसेल तर मोबाइल जिम ही संकल्पना राबवली जाते. म्हणजे सगळ्या साधनांसहित घरी येऊन शिकवलं जातं. आपल्याहून अधिक प्राधान्य योग करण्याला दिलं जातं. जिम इतकीच योग सेंटर्सची संख्या आहे. जिममध्येही अधिक शुल्क आकारून योग शिकवला जातो. हे योग शिकवणारे भारतीय असतील, असा माझा समज होता, पण ते अभारतीय आहेत.

इथे बाहेर खाणं महाग आहे. हॉटेलमध्ये शाकाहारी पदार्थ फार कमी मिळतात. त्यामुळं पर्यटकांचे थोडेसे हाल होऊ  शकतात, मात्र स्थानिकांना शाकाहारी पदार्थ मिळणारी ठिकाणं उदाहरणार्थ – इस्कॉनतर्फे चालवली जाणारी हॉटेल्स माहिती असतात. स्थानिकांच्या जेवणात बीफ-पोर्कचा कायम समावेश असतो. माझ्या परिचयाच्या बहुतांशी लोकांना भारतीय पदार्थ आवडतात. वीकएण्डला सहकारी मित्रांना घरी बोलावतो, तेव्हा त्यांना भारतीय पदार्थ खायला घालतो. मात्र सुरुवातीला त्यांना बोलावल्यावर त्यांनी मला जेवायला बोलवण्यामागचं कारण विचारलं होतं. कारणाशिवाय इतरांकडे जात नाहीत. त्यांच्या पदार्थात मसाले नसतात, पण त्यांना त्याविषयी क्रेझ वाटते. काही जण बऱ्यापैकी तिखट खातात. अनेकदा ते फ्रोझन फूड खातात. इथे सुशी खूपच चांगली आणि विविध प्रकारची मिळते. सिडने, पर्थ आणि मेलबर्नमध्ये चायनीज लोकांची संख्या आणि व्यवहार वाढत असून मुख्य शहरात चायनाटाऊन असतंच. ऑथेन्टिक चायनीज खाणं जमतं, त्यांना इथले पदार्थ आवडतात. इथल्या एअरपोर्टवर बोर्ड आणि उद्घोषणाही चिनी भाषेत व्हायला लागल्या आहेत.

मुलं पालकांसोबत राहात नाहीत. केवळ ख्रिसमससारख्या निमित्ताने पालकांकडे जाणं-येणं होतं आणि हा कार्यक्रम पक्का ठरलेला असतो. आयटीमध्ये असल्याने मला अनेक देशांत फिरायला मिळालं. त्यापैकी इथे वर्क-लाइफचा डोलारा चांगला सांभाळला जातो. लोक वेळेला आणि एकमेकांच्या गोष्टीला खूप किंमत देतात. इथले लोक डॉगसीटिंग करतात. प्रसंगी त्यासाठी हाफ डे घेतात. ही गोष्ट इथल्या लोकांसाठी खूप कॉमन आहे. कामाला न यायला काहीही कारण पुरतं आणि ते पुढं केलं जातं. मात्र कामाच्या वेळी काम गांभीर्याने केलं जातं. त्यांची कारणं कायमच खरी असतात. इथे शुक्रवार दुपारपासून पबमध्ये जाणं किंवा एन्जॉय करण्याकडे लोकांचा कल असतो. वीकएण्डचे प्लॅन्स ठरलेले असतात. वीकएण्डला घरी असणं कमी असतं. हे प्लॅन हवामानाचा अंदाज घेऊन ठरवतात. कारण मेलबर्नचं हवामान बेभरवशी आहे. एका दिवसात चार ऋतू दिसू शकतात. बऱ्याच जणांना वाचनाची आवड आहे. म्युझिक कॉन्सर्ट वगैरेंना लोक आवर्जून हजेरी लावतात. कितीही गरीब माणूस असला तरी भीक न मागता रस्त्यावर आपली कला लोकांपुढे सादर करून पैसे जमवले जातात. ऑनलाइन साइटवर रजिस्टर करून त्यानुसार लोक एकत्र जमतात. आपल्या आवडीचे विषय त्या साइटवर नोंदवायचे आणि त्यानुसार अपडेट्स येतात. त्यासाठी सोईसुविधा कोणत्या असतील तेही कळतं. एक किस्सा आठवतोय की, ऑफिसमध्ये आम्हांला दिलेल्या ड्रॉइंग बोर्डवर कंपनीविषयीच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. चित्र काढून झाल्यावर त्याविषयी बोलायचंही होतं. तेव्हा मी काढलेलं चित्र अधिकाऱ्यांसह सगळ्यांना आवडलं. ते रिसेप्शनला लावून ठेवलं आहे. इथं फूटी हा मुख्य खेळ आहे. रग्बी आणि फूटबॉल यांचं हा खेळ मिश्रण असून इथे विभागवार संघ आणि स्पर्धा होतात. अंतिम सामन्याच्या वेळी सुट्टी असते, एवढी फूटीची क्रेझ आहे. क्रिकेटही आवडतं. मला ऑस्ट्रेलियन ओपनमधली रॉजर फेडररची मॅच ‘याचि देही याचि डोळा’ बघता आली. तो फारच सुरेख अनुभव होता. लोक खेळवेडे असून फेसबुक वगैरेंवर त्यांचे ग्रुप्स आहेत. दर शनिवारी त्यांचे संघ जमून ते सातत्याने खेळतात. फोटोग्राफी करण्याजोग्या अनेक नितांत सुंदर जागा आहेत, त्यामुळे ती शिकायचं डोक्यात आहे. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. इथली ट्राम जणू जीवनवाहिनी आहे. ती सर्वदूर पोहचली आहे. मेलबर्न ट्राम म्युझियममध्ये मजा आली. पहिल्या ट्रामच्या तांत्रिक बाजूविषयी मी कुतूहल दाखवल्याने म्युझियम बंद व्हायची वेळ पाच असूनही तिथल्या कर्मचाऱ्याने आपुलकीने आणि हसतमुखाने सगळी सविस्तर माहिती दिली. एवढं होईपर्यंत पाच वाजून दहा मिनिटे झाली होती आणि मी मागच्या एक्झिटनं बाहेर पडलो..

मी आपल्या सणांना मिस करतो. मेलबर्नमध्येही सगळे सण साजरे होतात. पण शेवटी आपले सण आपल्या लोकांसोबत साजरे करायची मजा वेगळी असते. कदाचित मी अजून तसा नवीन असल्यामुळे ग्रुप झाला नसेल, म्हणूनही असेल पण आपण सणांच्या दिवशी मोठय़ांचे आशीर्वाद घेऊन मित्रांना भेटायला जातो. एकदम सहज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-बाबांना नमस्कार करतो. तितकी सहजता इकडे नाही. मुळात सगळे लोक एकमेकांच्या घरी अपॉइंटमेंट घेऊन जातात. दिवाळीला फेडेरेशन स्क्वेअरला खूप गर्दी असते.  अजून एक अनुभव आठवतो आहे, आम्ही एकदा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडजवळ फिरत असताना अचानक कुठून तरी नाशिक ढोलचा आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघू लागलो. पण पाच सेकंद काही बोललो नाही आणि ऐकत होतो की, नक्की आपल्याला आवाज ऐकू येतोय की भास होतोय.. आम्ही आवाजाच्या दिशेने चालू लागलो आणि मेलबर्न ग्राऊंडच्या जवळ आल्यावर भगवा झेंडा नाचताना बघून एक वेगळीच मजा आली. किती तरी वेळ आम्ही तो नाशिक ढोल ऐकत होतो. नंतर आम्हाला लक्षात आलं की ऑस्ट्रेलियाचा फेमस खेळ फूटीचा सामना होता आणि त्यांनी मराठी ढोल-ताशे पथकाला तिकडे बोलावलं होतं, त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी. आपलं मराठीपण सर्व देशांत पसरलेलं पाहून खूप गर्व वाटला आणि अनपेक्षित अशा नाशिक ढोलमुळं अख्खा दिवस एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारली होती..

viva@expressindia.com