गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

मायकेल अ‍ॅडम लिसोव्हस्की हे नाव स्वतंत्रपणे कुणाला विचारले तर त्याच्याविषयी कुणाला सांगता येणे अशक्य. पण या पोलिश व्यक्तीने फॅशन जगताला दिलेली देणगी म्हणजे १९९७ साली सर्व देशांत एकाच वेळी प्रसारित होणारी फॅशन टीव्ही ही वाहिनी. आता भारतात त्या एफ टीव्ही नामक वाहिनीचे छुपे भक्त तिच्या उघड दर्शकांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे आपल्या देशात या वाहिनीच्या आगमनानंतर प्रचंड सांस्कृतिक उलथापालथ झाली होती. लाँजरे आणि हूट कटय़ूर आदी फ्रेंच शब्दांचा आपोआप घराघरांत चुकीचा उच्चार ज्ञात झाला. पण दुसरा चांगला बदल म्हणजे आंतरराष्ट्रीय फॅशन प्रवाहाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भारतीय तरुण-तरुणींचा वर्ग जोडला गेला. मायकेल अ‍ॅडम लिसोव्हस्की यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ड्रेस डिझायनर्सना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. फॅशन शोज थेट जगभरातील नागरिकांच्या छोटय़ा पडद्यावर उमटू लागले. या मायकेल अ‍ॅडम यांना गणिताची शिष्यवृत्ती मिळावी इतके त्यांचे अंकहिशेब चोख होते. थायलंडमध्ये वस्त्रोद्योगाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी कपडय़ांच्या सुस्त आंतरराष्ट्रीय बाजाराला तेजी आणण्यासाठी एफटीव्ही काढण्याचे ठरवले. आता फॅशनमय जगताची एफटीव्ही पूर्वीचे आणि नंतरचे अशी विभागणी करता येऊ शकेल, इतका बदल वस्त्रप्रावणांच्या उद्योगात आणि विक्री प्रवाहामध्ये झाला आहे. मायकेल अ‍ॅडम यांच्या एका छोटय़ा मुलाखतीमध्ये त्यांनी फॅशन टीव्ही निर्मितीची संकल्पना आणि गरज स्पष्ट केली आहे. हे माध्यम कशासाठी होते आणि आपल्याकडच्या तरुणाईने एका विशिष्ट टप्प्यात त्याचा अतिरेकी वापर करून या वाहिनीवर सार्वत्रिक बंदी आणली, हा गमतीशीर इतिहास माहिती असला, तर या व्हिडीओला आवर्जून पाहावे. फॅशन डिझायनर्सबाबत आपल्याला फार कमी ज्ञान असते. मात्र आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स आणि ट्रेण्ड्रसचा अंगीकार तातडीने प्रत्येक देशाच्या फॅशन स्ट्रीट्सवर उमटत असतो. केवळ वाटेल त्या पद्धतीने कपडय़ांचे कोरीव काम किंवा चित्रांना कपडय़ांमध्ये परावर्तित करण्याचा प्रकार म्हणून त्याकडे पाहिले जाऊ शकत नाही. मेलिसा फ्लिस या अमेरिकी ड्रेस डिझायनरच्या कामाचा एक दिवस दाखविणारा व्हिडीओ पाहिला तर तिने लहान वयात घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल. शिक्षण आणि उमेदवारी करीत या स्पर्धेच्या सर्वाधिक लढाया असलेल्या जगामध्ये तरून जाताना तिने केलेले कष्ट तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये संपादित करण्यात आले आहेत. आपल्याला दिसणारा छोटय़ा पडद्यावरचा मॉडल्सचा कॅटवॉक सुंदर आणि सोपा वाटत असला, तरीही त्यामागे नेमके काय होते, ते पाहायला मिळेल. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मेलिसा फ्लिसचे सन फ्रान्सिस्कोमधील कलात्मक घर पाहिले, तर फॅशन डिझायनर आपल्या घराची सजावट किती वैविध्यपूर्ण रीतीने करतात हे पाहायला मिळेल. ‘प्रोजेक्ट रनवे’ या मालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या या छोटय़ा व्हिडीओजमध्ये कित्येक फॅशन डिझायनर राहतात कुठे आणि कसे, याचे दर्शन होईल. फॅशन टीव्ही येण्याआधी महिला आणि पुरुष मासिकांनी, पॉप गायकांनी आणि टीव्ही-चित्रपटांमधील सुपरस्टार मंडळींनी कपडे, उंची राहणीमान आणि जगण्याची फॅशन सर्वसामान्य जगताला पुरविली. अमेरिकेत एल्विस प्रिसले, फ्रँक सिनात्रा, ब्रिटनमध्ये बिटल्स यांनी साठच्या दशकांत पुरुष जगताला वेडे केले. प्लेबॉय, एस्क्वायर या मेन्स मॅगझिन्सनी कपडे, घडय़ाळ आणि दागिन्यांच्या जाहिरातींची परंपरा सुरू केली. ‘व्होग’ हे मासिक निव्वळ फॅशनट्रेण्ड्सच्या ज्ञानासाठीच वाहिलेले आहे. फॅशनग्रस्त पॅरिस आणि युरोपातील शहरांतून आंतरराष्ट्रीय पातळीचे पेहराव तयार झाले. कॅज्युअल, फॉर्मल आणि पार्टी वेअरिंगच्या नमुन्यांना लोकांकडून गेल्या तीन-चार दशकांत गांभीर्याने घेतले जाऊ लागले. भारतातही आता व्हिक्टोरिया सिक्रेटची अंतर्वस्त्रे मोठय़ा प्रमाणावर शहरगावांत खरेदी होतायत. फॅशन डिझायनिंग हा उत्तम करियर पर्याय आहे. तो स्थानिक पातळीवरही बराच पैसा मिळवून देत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर फॅशन डिझायनर्सतर भलतेच श्रीमंतच झालेले पाहायला मिळतात. ब्रिटिश व्होगने तयार केलेल्या ‘हाऊ टू बिकम ए फॅशन डिझायनर’ या दहा मिनिटांच्या मालिकांधील अलेक्सा चंग हिचा भाग खास पाहावा. फॅशन पत्रकार असलेली चंग मॉडल, लेखिका आणि अर्थात फॅशन डिझायनरही आहे. तिची ‘समांतर फॅशन उद्योगा’वरील दोन पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यासोबत यावर्षी तिने तयार केलेल्या फॅशन ब्रॅण्ड्सना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. व्होग आणि हार्पर बझारमध्ये मॉडल म्हणूून काम करणाऱ्या या ललनेचा या क्षेत्रातील प्रवास, अभ्यास आणि श्रम या दोन घटकांनी सुरळीत झाला आहे. अर्डम मोरालिओग्लू या जगप्रसिद्ध फॅशन डिझायनयरच्या लंडनमधील स्टोअरचे आणि त्याच्या एकूण फॅशन तत्त्वज्ञानाचे दोन व्हिडीओ आवर्जून पाहावेत असे आहेत. या सर्वच व्हिडीओजची खासीयत ही त्यांच्या देखणेपणात आहे. फॅशन टीव्ही आज पूर्वीइतका लोकप्रिय नसला, तरी आपल्या सर्वच भवतालामध्ये फॅशनचे ट्रेण्ड्स अस्तित्वात आहे. वस्तूंच्या जाहिरातींपासून ते उत्पादनावरच्या चित्र-छायाचित्रांमध्ये ते पाहिले तर सापडू शकेल.

viva@expressindia.com