अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. या दिवशी नव्या उपक्रमाची, गोष्टींची सुरुवात होते. अर्थातच खरेदीही होतेच. त्यात सध्या लग्नसराईचे दिवस. त्यामुळे पारंपरिक दागिने, कपडे यांच्या खरेदीला ऊत आला आहे. साडय़ा आणि सराफी दुकानातल्या गर्दीवरून याचा अंदाज येईल. वेगळेपणा शोधणाऱ्या नव्या पिढीला या पारंपरिक खरेदीत काय हटके करता येईल?

लग्न समारंभाचे दिवस जवळ येत आहेत, तशी साडय़ांच्या दुकानातील गर्दीही वाढते आहे. वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या सिल्क साडय़ा ही लग्नसराईची महत्त्वाची खरेदी. विशेषत नववधूसाठी अजूनही गर्भरेशमी साडीच खरेदी केली जाते. मग कुणी पैठणीला पसंती देते तर कुणी बनारसी शालूला. हल्लीच्या बहुसांस्कृतिक जमान्यात साडीबरोबर लेहेंगा, अनारकली, असेही पर्याय लग्नसराईला हमखास दिसतात. त्यासाठी पुन्हा रेशमी कापड वापरायला प्राधान्य दिलं जातं. अनेक डिझायनर्सकडून पारंपरिक टेक्स्टाइल्सना नवीन अवतार देण्याचा प्रयत्न होत आहे. समारंभांसाठी वापरण्यात येणाऱ्या पैठणीसारख्या साडय़ा किंवा लेहेंगा याच्या पलीकडे जाऊन तुम्ही लग्न समारंभात काय वापरू शकता याचा डिझायनर्सकडून विचार केला जात आहे.

भारतीय इतिहास, वास्तुकला, शिल्पकला, भारतीय संस्कृती या सगळ्याला डोळ्यासमोर ठेवून डिझायनर्स काम करताना दिसतात. याबद्दल बोलताना डिझायनर संतोष पारेख म्हणाले, ‘‘भारतातील विविधता आपल्या संस्कृतीतून जपली जात आहे. विशेषत वस्त्रसंस्कृतीत हे वैविध्य पूर्वीपासून दिसते. म्हणूनच आपल्या टेक्स्टाइल्समध्ये प्रयोगशीलतेला वाव आहे. कांजीवरम या टेक्स्टाइलवर मी काम केलंय. भारतात कांजीवरम साडय़ा समारंभात, लग्नात वापरल्या जातात. याच टेक्स्टाइलवर मी प्रयोग करून कांजीवरम लेहेंगा तयार केलाय. त्यावर काम करताना मला दोन महिने लागले. दिसायला अतिशय सुंदर आणि वापरायला सहज वाटणारा कांजीवरम लेहेंगा बनवणं हे काम तांत्रिकदृष्टय़ा बऱ्यापैकी किचकट होतं. याचं मार्केट नक्कीच मोठं असेल असं मला वाटतं.

वेळ खूप लागला तरीही एका पारंपरिक भारतीय टेक्स्टाइलवर प्रयोग करून त्यातून काहीतरी नवीन रूप तयार करता आलं याचं मला समाधान आहे.’’ रिसेप्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कांजीवरम साडय़ांसाठी कांजीवरम लेहेंगा हा अतिशय नवीन आणि सुंदर पर्याय नक्कीच ठरेल. याशिवाय करवल्यांना वापरण्यासाठी केवळ अनारकली किंवा नेहमीच्या लेहेंग्यापेक्षा वेगळा पर्याय आहे.

सोलापुरातील इरकल साडय़ा प्रसिद्ध आहेत. सोलापुरातील इरकल साडय़ांमध्ये कोंडी चिक्की हा खूप जुना प्रकार. डिझायनर विनय नारकर यांनी कोंडी चिक्की या टेक्स्टाइलवर काम केलं आहे. डिझायनर विनय म्हणतात, ‘‘तीस- चाळीस वर्षांपूर्वी कोंडी चिक्की हा साडय़ांचा प्रकार बंद झाला होता. तो पुन्हा लोकांसमोर यावा या दृष्टीने मी त्यावर काम करायचं ठरवलं. बरेच हातमाग बंद पडले होते, विणकर कामासाठी नव्हते. या सगळ्यांना पुन्हा एकत्र करून मी काम करायला सुरुवात केली. इरकलसुद्धा हल्ली पॉवरलूम आणि सिंथेटिक फॅब्रिकमध्ये तयार होतात. माझ्या कलेक्शनमध्ये मला पारंपरिक पद्धतीनेच काम करायचं होतं. त्यातली पारंपरिकता टिकवून ठेवण्यासाठी मी हातमागावरील ऑथेंटिक इरकल फॅब्रिक वापरलं. सहसा लग्न समारंभात इरकल साडी नेसली जात नाही. पैठण्या, कांजीवरम यांचा जास्त वापर होतो. इरकल साडय़ांना ग्लॅमरस बनविण्यासाठी आणि पैठणी व इतर प्रकारच्या त्याच त्याच सिल्क साडय़ांना ऑप्शन म्हणून मी इरकल साडय़ांमध्ये प्रयोग केले. इरकल साडय़ांच्या बॉर्डर्समध्ये प्रयोग केले आणि त्याला शाही लुक देण्याचा प्रयत्न केलाय. यात कुठेही सिंथेटिक मटेरियल आम्ही वापरलं नाही. माझं संपूर्ण कलेक्शन हे पारंपरिक इरकल टेक्स्टाइलपासूनच मी तयार केलंय. अशी कलात्मक इरकल साडी लग्न समारंभात तुम्ही नक्कीच वेगळेपणाने वापरू शकता.’’

डिझायनर श्रुती संचेती हिने आपल्या ‘द ट्राइब’ या आपल्या कलेक्शनमध्ये झारखंडमधील टेक्स्टाइलवर काम केलं आहे. डिझायनर श्रुती म्हणाली, ‘‘मी आदिवासी जीवनातील प्रतीकं डिझाइन्समध्ये वापरली आहेत. त्यातही तोचतोचपणा टाळण्यासाठी टिपिकल वारली मोटिफ्स वापरण्याऐवजी भौमितिक आकार आणि त्यापासून तयार होणारे ट्रायबल मोटिफ्स मी वापरले आहेत. या कलेक्शनमध्ये मी निसर्गाशी साधम्र्य साधणारे रंग वापरले आहेत. या कलेक्शनचा आत्मा हा पुरातन किंवा जुना असला तरीही त्याचा लुक मात्र मॉडर्न आहे.’’

लग्नाच्या आधी असलेल्या तीन-चार महत्त्वाच्या समारंभांसाठी हे आउटफिट्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. नेहमीच्या त्याच त्या जरीच्या साडय़ांना पर्याय म्हणून जुन्याच टेक्स्टाइल्सचे नवीन पद्धतीने केलेले कपडे हा ट्रेण्ड या लग्नसराईमध्ये हमखास दिसेल. नावीन्यपूर्ण आणि उठावदार पेहरावासाठी हे पर्याय उत्तम ठरतील. लग्नसराईच्या खरेदीपूर्वी या वेगळेपणाचा विचार नक्कीच करायला हवा.

बंगाली थाट

पारंपरिक साडय़ांचा नव्याने प्रचलित होणारा प्रकार म्हणजे बालूचरी आणि स्वर्णचरी. पश्चिम बंगाल राज्यातील बिष्णुपूर गावातील रेशीम आणि जरीपासून बनवलेल्या ‘बालूचरी’ आणि ‘स्वर्णचरी’ या साडय़ा लोकप्रिय आहेत त्याच्या पदरामुळे. रेशमी पदराच्या साडय़ांना ‘बालूचरी’ तर जरीपासून बनवलेल्या साडय़ांना ‘स्वर्णचरी’ म्हणतात. या साडय़ांच्या पदरावर पौराणिक कथा विणल्या जातात. पौराणिक व्यक्तिमत्त्व, आकार आणि अखंड कथादेखील पदरावर उमटते. रामायण किंवा महाभारतातील काही प्रसंग – सीता स्वयंवर, दुष्यंत- शकुंतला, कृष्णार्जुन हे प्रसंग पदरावर विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्याला हवा तो प्रसंग कारागिराला सांगून साडीच्या पदरावर विणून घेता येतो. या साडय़ा संपूर्ण बंगाल प्रांतात – म्हणजे आपल्या पश्चिम बंगालबरोबरच बांगलादेशातही प्रसिद्ध आहेत. हल्ली मुंबई-पुण्यातही या साडय़ांना मागणी वाढली आहे. अस्सल बालुचरी सिल्क साडय़ा सहजतेने या मिळत नाहीत. बिष्णुपूरमध्ये कारागिराला सांगून मागवाव्या लागतात.

viva@expressindia.com