News Flash

फॅशनेबल तारांबळ

आपल्या रोजच्या फॅ शनवर पाणी न पडता आला दिवस साजरा करताना तारांबळ उडतेच.

पाऊस काही कधी सांगून येत नाही. अचानक भरलं आभाळ बरसू लागतं तेव्हा भिजल्या मातीचा दरवळ घ्यायचा आनंद पुरता संपायच्या आत आपल्याला भिजलेले कपडे, बॅग, चपला.. सगळ्या गोष्टी दिसतात.

पावसाची चाहूल लागूनही आपण पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल स्वत:लाच दोष देऊ लागतो. तिथल्या तिथे आता कपडे काय घालायचे? चप्पल बदलावी लागेल की सँडलच घ्यायची आणि आता बॅग कुठली घ्यायची? आतलं सामान भिजायला नको.. एक ना अनेक प्रश्न डोक्यात गर्दी करतात. त्याची उत्तरं आपण शोधतोच. तरीही दरवर्षी पाऊस पडतो आणि दरवर्षी पहिल्या पावसात आपली फॅशनेबल तारांबळ उडते..

‘किती ती गरमी.. कधी पाऊस येतोय असं झालं आहे’. ‘ये रे ये रे पावसा..अब बस ऐ बारीश तू बरस जा.. अशा डायलॉगबाजीत रमलेले आपण पहिल्या पावसाचे थेंब बरसताच गोंधळून जातो. एकीक डे पहिल्या पावसात भिजतानाचे फोटो मोबाइलवर अपलोड करताना भलेही पहिल्या पावसाच्या शुभेच्छा तोंडून निघत असतील. दुसरीकडे मात्र पाऊस म्हणजे चिखल सारा.. पाऊस कपडे खराब करतो, पाऊस म्हणजे वैतागवाडी.. पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे झाडी.. अशा एकाचवेळी त्रासाच्या आणि आनंदाच्या दोन्ही भावनांमध्ये आपण हिंदोळे घेत राहतो. पावसासाठी आपण पूर्वतयारी करत नाही असं नाही, पण कित्येकदा छत्रीपासून कपडय़ांपर्यंत सगळं निवडूनही त्यातल्या चुका पाऊस पडल्यावरच लक्षात येतात आणि मग पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला तरी आपल्या रोजच्या फॅ शनवर पाणी न पडता आला दिवस साजरा करताना तारांबळ उडतेच.

पावसाळा आला की नवनवीन, रंगीबेरंगी फॅशनेबल रेनकोट, चप्पल, छत्री बाजारात येतात. पण प्रत्येक छत्री, रेनकोट ही फॅशन सोबत आपली गरज पण पूर्ण करेल असं होत नाही. उंचीला मोठय़ा असणाऱ्या, रंगीबेरंगी, सुंदर पिंट्र असणाऱ्या छत्र्या आपण खरेदी करतो. पण त्या उंचीला जरी मोठय़ा दिसत असल्या तरी त्या उघडल्यावर जेमतेम आपला देह सामावून घेण्याइतक्याही मोठय़ा नसतात. मग काय? छत्री असूनही आपण ओलेचिंब.. त्यात आपल्याबरोबर कायम खांद्यावरची पर्स किंवा बॅग असतेच. कॉलेजेस-क्लासेस सुरू झाले असल्याने कित्येकदा पाठीवर मोठमोठय़ा सॅक असतात. एवढय़ा सगळ्या पसाऱ्यासह आपलं संरक्षण करण्यासाठी ती फॅशनेबल छत्री काही तयार नसते. छे! त्यापेक्षा रेनकोटच घेतला असता तर किती बरं झालं असतं, हा विचार न चुकता मनात डोकावतो.

पण फसगत करण्याच्या बाबतीत रेनकोटही काही कमी नसतात. दरवर्षी बाजारात रेनकोटचे नवनवीन प्रकार येतात. नवीन रंग, स्टाईल सगळ्यात हरखून आपण रेनकोट खरेदी करतो. कपडय़ांप्रमाणे रेनकोटही घालून आपल्याला होतोय ना तो.. याची खातरजमा करून आपण तो घेतलेला असतो. आपल्या आवडीचा, रंगाचा रेनकोट घालून तोऱ्यात आपला नित्याचा प्रवास करताना नेमकं पावसाचं पाणी धबधबा कोसळायला लागल्यानंतर पावसाचं पाणी रेनकोटवरून खाली बाहेर ओघळायचं सोडून थेट आतमध्ये शिरतं. रेनकोटचं कापड आपण बघून घेतलं नव्हतं हे बरोबर तेव्हाच लक्षात येतं. कधी त्याची चन नीट उघडझाप करत नाही. पण बारीकशा पावसात लक्षात न आलेल्या या गोष्टी मोठय़ा पावसांत खूप तारांबळ उडवतात. रेनकोट जर फक्त आपल्याच मापाचा असेल तर बॅगेवरून चढवल्यावर तो आपला राहतच नाही. ओढूनताणून बॅगेसह आपण स्वत:ला रेनकोटमध्ये कोंबलं की ना मग पाऊस आपल्याला सोडतो ना आपल्या बॅगेला.. रेनकोट आहे म्हणून बिनधास्त असलेले आपण.. कधी त्या रेनकोटचे तीनतेरा वाजतात ते आपल्याला समजतसुद्धा नाही.

छत्री आणि रेनकोटच आपल्याला पावसाळ्यात घाबरवतात असं नाही. आपले कपडे, चपला, ज्वेलरी सगळ्यांचीच कसोटी लागते. उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर कॉटन, कॉटन मिक्स, लेनिन असे घाम शोषून घेणारे कपडे घालतो. कित्येकदा कॉटन सोईचे आणि आवडीचे म्हणूनही आपण वापरतो. पावसाळ्यात रेनकोट, छत्री सोडली तर कपडय़ाची काही खास खरेदी करत नाही. त्यातल्या त्यात कामावर जाणारा महिला वर्ग भिजल्यावर पटकन वाळतील म्हणून सिंथेटिकचे ड्रेस घालायला सुरुवात करतात. पण सुरुवातीला मात्र उन्हाळ्यातलेच कपडे कित्येकदा अंगावर ठाण मांडून असतात. असे कपडे भिजले की लवकर वाळत नाहीत, ज्यूट असेल तर कित्येकदा भिजल्यावर त्या कपडय़ांना वास यायला लागतो. कित्येकदा पावसात भिजल्यावर ज्या नक्षीदार कु र्त्यांचा आपल्याला अभिमान असतो नेमक्या त्याच नक्षीवरचे गडद रंग अलगद कपडय़ावर ओघळतात आणि नको तेव्हा रंगपंचमी होऊन बसते. अनेक ओढण्या आपले रंग ड्रेसवर सोडतात. त्यामुळे फजितीही होते आणि कपडे थेट कचराकुंडीत पोहोचतात, हे दुहेरी दु:ख असतं. पावसाळ्यातला चिखल, रस्त्यावरून पाणी उडवत जाणाऱ्या गाडय़ा आणि कपडय़ांची अजब गट्टी आहे. रस्त्यावरचे खड्डे चुकवायचे की मागून-पुढून येणाऱ्या गाडय़ा या गणितात लाईट रंगाचे कपडे आणि त्यावर बसणारा घट्ट चिखल हे तितकंच घट्ट समीकरण आहे. कपडय़ांवर चिखल उडवणारा आणखी एक शत्रू आपणच  वागवत असतो ती म्हणजे चप्पल..

पावसाळ्याच्या दिवसांत आवडीने घेतलेली चप्पल ही आपली सखी कमी आपल्याच पायात राहून आपलीच मज्जा बघणारी शत्रू जास्त वाटते. एक तर पावसाळ्यात फ्लॅट चपला बऱ्या म्हणत त्या घालायच्या म्हटल्या तर त्या चपलांना ग्रीपच नसते. कितीही सावधपणे चालायचं म्हटलं तरी एका बेसावध क्षणी कुठे पाय घसरून कोणासमोर दंडवत पडायचा नेम नाही. सध्या ट्रेंडमध्ये असलेले कपडय़ाचे बूट तर चुकूनही वापरू नये. ते सुकता सुकत नाहीत आणि दरुगधी तर वेगळीच. पावसाळ्यात चुकूनही लेदरचे बूट किंवा चप्पल वापरली तर ती आपल्याला परत वापरायची नाही. तिची जागा सरळ घराबाहेर कचऱ्यातच ही खूणगाठ मनाशी बांधूनच त्याचा वापर केला पाहिजे. पावसाळी बूट घेतले तरी कित्येकदा त्यांचा आकार आणि मांडणी अशी असते की पाय आतल्या आतच घसरून आता बूट फाडून बाहेर येतील की काय? अशी केविलवाणी अवस्था होते. पावसात केसांचं काय करायचं हा आणखी एक प्रश्न. केस मोकळे सोडायचे की बांधायचे? पावसात केस भिजू नये म्हणून काय करता येईल?, ज्वेलरी कुठली घालायची यापेक्षा घालायची की नाही हाच यक्षप्रश्न असतो. एक ना अनेक समस्यांचा पाऊस थांबता थांबत नाही.

हे वाचता वाचता दरवर्षीची तुमची पावसातली गंमत तुम्हाला आठवली असेल. मागची तारांबळ आठवून आपल्याला या वर्षी नव्या जोमाने पावसाळ्याची तयारी करायची आहे. त्यातून जुन्या फॅशनेबल चुका टळतील, कदाचित नवीन काही चुका नव्याने कळतील.. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी हे असंच होतं..

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2017 1:00 am

Web Title: monsoon season monsoon fashion monsoon bags monsoon cloth
Next Stories
1 पावसातल्या ‘फॅशन’सरी..
2 कल्लाकार : ‘शब्दसखा’
3 आऊट ऑफ फॅशन : गुलाबी नशा
Just Now!
X