ट्रेकिंगचे अलिखित नियम हे अनुभवातूनच शिकता येतात.. अनवट वाटा धुंडाळताना मनात या नियमांची रुजुवात असेल तर ट्रेकिंगची मजाच आगळी!

सुरुवातीच्या दोन-तीन ट्रेकिंग अनुभवानंतरच आपल्याला कळून चुकतं की गिर्यारोहण आपला ध्यास बनणार आहे का फक्त सुट्टी व्यतीत करण्याचा एक मार्ग! ट्रेकिंग हे ज्यांच्या डीएनएमध्ये नखशिखांत भिनत जातं, त्यांच्यात केवळ आत्मविश्वास वाढतो असं होत नाही. तर आपलं सामान किती-कसं असावं इथपासून ते गडकिल्ले सर करताना एकमेकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन मदतीचा हात कायम पुढे ठेवणं, निसर्गात रमताना त्याची हानी होऊ नये म्हणून आपसूकच त्याचीही काळजी घेणं, कुठलीही गोष्ट धडाडीने पूर्णत्वास नेण्याची वृत्ती आणि आव्हान पेलण्याचा लागलेला छंद असे त्यांच्यातले सकारात्मक बदल पाहणाऱ्याला थक्क करतात. ट्रेकिंगचे अलिखित नियम हे अनुभवातूनच शिकता येतात.. अनवट वाटा धुंडाळताना मनात या नियमांची रुजुवात असेल तर ट्रेकिंगची मजाच आगळी!

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४

ज्याच्या कपाळावर आठी नावाचा प्रकारच पाहायला मिळत नाही तो असतो खरा ट्रेकर, अशांसाठी येणारे संकट हे जणू त्या संकटाचे उत्तरही सोबतच घेऊन येते. अनवट वाटा शोधत जाण्याची या ट्रेकरची वृत्ती त्याला जगण्याच्याही नवनवीन वाटांचे दर्शन घडवते, जगण्याच्या नवीन शक्यता त्याच्यासमोर सहज खुल्या होतात. हे ध्यासपर्व ज्या ट्रेकर्सच्या शरीरात जागृत होते, त्यांची ट्रेकिंगला निघण्यापूर्वीची तयारी खास बघण्यासारखी असते. कदाचित आईने खोली आवरायला सांगितल्यावर नाकं मुरडणारे हेच ट्रेकर्स त्यांच्या ट्रेकिंगच्या बॅग्ज भरताना मोठय़ा उत्साहाने आणि एकाग्रतने त्या भरतात. इतर वेळी घरगुती सामानाच्या यादीत लक्ष घालणार नाहीत परंतु गडावरती वस्ती करीत असू तर जेवणाचे घ्यायचे सामान तितक्याच तन्मयतेने ते बांधताना दिसतात. प्रवासात, गड चढताना येणाऱ्या अडचणी एका अर्थाने आधीच मनाने टिपून ठेवाव्या लागतात. त्यानुसार तयारी झाली तर प्रत्यक्ष प्रवासाआधीच अर्धी लढाई पार झालेली असते आणि तरीही ट्रेकिंगमध्ये अडचणी आल्याच तर त्यांचा मूळ स्वभाव आता त्या हाताळण्याच्या योग्यतेचा झालेला असतो. मात्र ट्रेकिंगला निघण्यापूर्वी भल्या मोठाल्या बॅग्स योग्य तऱ्हेने पॅक असल्या की एखाद्या योद्धय़ासारखे हे ट्रेकर्स सज्ज होतात.

ट्रेक सुरू करण्याआधी गडाच्या पायथ्याशी आठवणीतले एखादे छायाचित्र काढून, शिवरायांचे, भवानीचे स्मरण करून हे आधुनिक मावळे गडाच्या सुरुवातीच्या पाऊलवाटा मागे सारत, अधूनमधून भेटणाऱ्या गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत मूळ चढणीला सुरुवात करतात. मग कधी हा गड अलंग-मदन-कुलंग असू शकतो, कधी साल्हेर सालोटा असू शकतो, तर कधी राजगड-तोरणाही असू शकतो! नवनवीन वाटांचा शोध हा खास ‘ट्रेकरी’ अभिमानाचा विषय. या नवीन वाटा शोधून पुढे तिथे येणाऱ्या ट्रेकर्सना या वाटा समजायला सोपे पडावे म्हणून खास ट्रेकर शैलीतल्या खुणा त्या घनदाट जंगलात लावल्या जातात. या खुणा कुठल्या? तर काही जण वळणावळणावर एकावर एक असे तीन मध्यम आकारातले दगड रचून ठेवतात, ट्रेकिंगमध्ये मुरलेल्यांना अगदी सहज हे दगड ओळखता येतात, काही सर्वार्थाने सुसज्ज ट्रेकर्स आपल्यासोबत आणलेल्या ऑइल पेंटनी सरळ मोठ्ठाल्या दगडांवर, झाडांवर बाण काढून भविष्यातल्या ट्रेकर्सचे काम अधिक सोप्पे करून टाकतात, तर काही जण काहीच उपलब्ध नसल्यास मध्यम आकाराच्या फांद्या तोडून वाटेकडे खूण करून त्या पद्धतीने रचून ठेवतात.

ट्रेकिंग म्हणजे फक्त या वाटा धुंडाळणं नव्हे तर निसर्गाशी असलेले आपले नातेही अधिक दृढ करणारा हा अनुभव आहे. त्यामुळे कित्येक ट्रेकर्स हल्ली त्यांच्यासोबत कायम एक भली मोठ्ठी पिशवी ठेवतात. त्यात गडावर पूर्वी फक्त ‘मज्जा’ करायला आलेल्या करामतींनी केलेला प्लॅस्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आपणहून उचलून ठेवला जातो. वर जाईपर्यंत ही पिशवी बऱ्यापैकी भरते, शेवटी गड किंवा डोंगर उतरताना ही पूर्ण भरल्यावर योग्य त्या ठिकाणी त्या कचऱ्याला स्थान दिले जाते. ट्रेकर्स निसर्गाबद्दल आणि या महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबतीत इतरांपेक्षा जरा अधिक संवेदनशील असतात. त्यांची संवेदना केवळ भावनिक नसते तर निसर्गाला अपेक्षित अशी व्यावहारिकही असते. म्हणून काही ट्रेकर्स तर केवळ या गडकिल्ल्यांच्या साफसफाई करताच मोहिमा आखतात. गडावरच्याच रहिवाशांना घेऊ न या मोहिमा अनेक वेळा फत्ते केल्या जातात. जेणेकरून गडावरील लोकांमध्ये ‘हा आपला किल्ला आहे’ ही भावना प्रस्थापित होतेच पण भविष्यात या गडांची आपणहून या गावकऱ्यांकडून काळजी घेतली जाते.

रात्रीच्या वेळी राहण्याची पाळी आलीच तर तंबूमध्ये राहणे, गुहेमध्ये राहणे, एखाद्या गावकऱ्याकडे राहणे तर कधी देवळाच्या आवारात राहणे घडले नाही तरच नवल; कारण बहुतांश वेळा हे ट्रेकर्स खास याकरिताच अशा आडवाटेला जात असतात. या सज्जनांकडून गडकिल्ल्यांवरचा थरार अनुभवला जातोच परंतु त्याचबरोबर ते रात्रीचा गड भटकणं, मित्रा-मित्रांमध्येच मिळून चूल मांडून पचेल असं रुचकर जेवण बनवणं, ते इवल्याशा तंबूमध्ये जास्तीत जास्त जण राहून रात्री सुखात झोपलेल्या आपल्याच मित्रांच्या घोरण्याचा कार्यक्रम ऐकणं, एखाद्या श्वापदाचा आवाज ऐकताच सर्वानी विनाकारण सतर्क होणं, वाटेत एखादा धडपडला असेल तर एकत्र त्याला मलमपट्टी करणं या सगळ्या गोष्टी ट्रेकिंगच्या सहजीवनात ‘मस्ट’ आहेत.

अशाच आठवणी मग मनाच्या संदुकात साठवल्या जातात. एखाद्या मुरलेल्या ट्रेकरसोबत ट्रेकिंग करीत असाल तर त्याच्यासोबत येणारा अनुभव तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरताना जर तुम्हाला ‘ए२२ओ’ असा आवाज घुमताना आढळला तर समजा ट्रेकर तुमच्या आसपास कुठे तरी आहे. आणि आपल्या हरवलेल्या मित्राचे ठिकाण जाणून घेण्यासाठी अशी जोरदार साद देतो आहे. दऱ्याखोऱ्यांतून येणारा असा आवाज म्हणजे जणू सह्य़ाद्रीमधला ओंकार आहे.

कुणी आपल्याला ट्रेकर म्हणतंय किंवा म्हणायचं टाळतंय याची तमा ज्याला कधीच नसते, जो फक्त स्वत:च्या धुंदीत एक एक गड आपल्या पायाखालून सरकवत जातो आणि या भटकंतीचा खरोखर मनापासून आनंद लुटतो, तो या ट्रेकिंग दुनियेतील खरा मुशाफिर मानता येईल. ट्रेकिंग ही एक अशी गोष्ट आहे की ज्याची आवड तुम्हाला कधी लागली, हे कधीच सांगता येत नाही, तो असा कुठला क्षण होता जेव्हा तुम्ही या छंदाच्या प्रेमात पडलात हे ठरवता येत नाही. एके  दिवशी तुम्हाला उमगतं की ‘अरेच्चा रायगड सर्व वाटांनी चढून झाला, हरिश्चंद्र गडदेखील सर्व वाटांनी सर झाला, अनेक किल्ले तर एकापेक्षा अधिक वेळा फिरून झाले!’ असे जेव्हा होते तेव्हा मनात दाटून येणारी भावना ही जगावेगळी असते, सह्य़ाद्री नावाच्या बाबाचे तुम्ही मनापासून आभार मानता, या मुशाफिरीत भेटलेल्या गावकऱ्यांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आठवता आणि याच आठवणींमध्ये रमताना पुढच्या ट्रेकची तयारी करू लागता. कारण ट्रेकरला थांबणे मान्य नसते, नकाशावरच्या वाटा संपल्या तरी ट्रेकरसाठी नेहमीच नवनवीन वाटा खुल्या होतात आणि तो अशाच अस्पर्शीत वाटांच्या प्रतीक्षेत असतो. ट्रेकिंग ही नुसती भटकंती नाही तर ते एक व्रत आहे आणि ट्रेकर हे व्रत अवलंबलेला जबाबदार मुशाफिर आहे. या पावसाळ्यातही असे अनेक गडकिल्ले या सह्य़ाद्रीपुत्रांच्या अस्तित्वाने मोहरतील, हिरवे होत जाणारे डोंगर या ट्रेकर्समुळे आतून शहारतील आणि त्यांना निरोप देताना याच सह्य़ाद्रीचे अश्रू आभाळातून बरसतील!

viva@expressindia.com