मुंबईची तरुणी प्राजक्ता कोळी कॉलेजमध्ये असल्यापासून ब्लॉग लिहीत होती. व्हिडीओ ब्लॉगिंचं नवं माध्यम तिला सापडलं आणि ती प्रोफेशनल यूटय़ूबर बनली. Mostly Sane  नावाचं यूटय़ूब चॅनल चालवणाऱ्या प्राजक्ताचे व्हिडीओ कमालीचे लोकप्रिय असून काही व्हिडीओंची दर्शकसंख्या लाखाच्या घरात आहे. तिच्या चॅनेलला साठ हजारांच्या आसपास सबस्क्रायबर आहेत. या नव्या माध्यमाच्या ‘प्रोफेशनल क्वालिटीज’विषयी प्राजक्ता सांगतेय..

मी सुरुवातीला रेडियोमध्ये काम करत होते. तेव्हा मल्टिचॅनल नेटवर्कमधल्या एकानं मला यूटय़ूब चॅनल सुरू करण्याबद्दल सुचवलं. त्या वेळी मी फारसा विचार केला नव्हता. एकतर मला रेडियो या माध्यमात काम करायचं होतं आणि तेव्हा मी माझा ब्लॉगही लिहीत होते. एमसीएनमधल्यांनी तो वाचला होता, त्यांना माझं लिखाण आवडलं होतं.

मग दोन-तीन महिन्यांनी मी यूटय़ूब चॅनलबद्दल सिरिअसली विचार केला. सुरुवातीला माझ्या ब्लॉगवर जे लिखाण होतं त्यावर आधारितच मी सुरुवातीचे व्हिडीओ बनवले. लोक कमेंट करायचे, लाइक करायचे. माझे सबस्क्रायबरही वाढायला लागले. त्यावरून लोकांना हे आवडतंय, हे लक्षात यायला लागलं. हल्ली आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन इंटरनेटवर मिळतं. त्यामुळे मलादेखील हे माध्यम रुचलं. काहीतरी वेगळा विचार मांडायचा, पण एकदम खऱ्या माहितीवर आधारित, हे ठरवून व्हिडीओ बनवायचं ठरवलं होतं. तेच कदाचित माझं वेगळेपण ठरलं असावं.

माझ्या व्हिडीओंसाठी लागणारा संपूर्ण सेटअप माझ्या घरातच आहे. माझ्या रूममध्ये एका भिंतीसमोर मी शूट करते. एक ट्रायपॉड आहे. त्यावर कॅमेरा आणि दोन स्पॉट लाइट्स एवढय़ाच गोष्टी वापरून मी शूट करते आणि नंतरचं एडिटिंगसुद्धा मीच करते. मुळातच हे बऱ्यापैकी स्वस्त ब्रॉडकास्टिंग माध्यम आहे. त्यासाठी फारसा पसारा लागतच नाही. तुमच्या व्हिडीओच्या लोकप्रियतेनुसार जाहिरातीतून पैसा मिळू शकतो हे खरंय. पण जितके सबस्क्रायबर जास्त तितके पैसेही अधिक ही एक चुकीची समजूत आहे. यूटय़ूब आम्हाला व्ह्य़ुअर्सनुसार पैसे देते. तिथेही नुसती संख्या महत्त्वाची नाही. तुमच्या व्ह्य़ुअरशिपनुसार यूटय़ूब तुमच्या चॅनलमध्ये इन्व्हेस्टही करते. व्हिडीओआधी जाहिराती असतात. त्यातून यूटय़ूब पैसे मिळवतं आणि त्यातला तुमचा शेअर असेल तो यूटय़ूब तुम्हाला देतं. हे सगळे पैसे डॉलरमध्ये मिळतात. एक सबस्क्रायबर म्हणजे एक डॉलर मिळतो हे सगळे गैरसमज आहेत. मिळकतीत खूप चढ-उतार असतात. तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला नवी माहिती, ताजा कण्टेण्ट देत राहावं लागतं. अपडेट्स ठेवावे लागतात आणि कामात दर वेळी नवनवे प्रयोग करावे लागतात.

(मुंबईची प्राजक्ता  Mostly Sane  नावाचं यूटय़ूब चॅनल चालवते. त्याचे साठ हजारांच्या आसपास सबस्क्रायबर असून काही व्हिडीओंची दर्शकसंख्या लाखाच्या घरात आहे.)
(शब्दांकन – प्राची परांजपे)