गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

गेल्या शतकभरातील शोधांचा परिणाम आपल्या श्रवणज्ञानामध्ये आणि श्रवणसंवेदनांमध्ये वाढ करणारा ठरला. मनोरंजनासाठी चावीच्या रेकॉर्ड प्लेअरवर तबकडी (रेकॉर्ड) फिरविण्यापासून ते आता काही सेंटी मीटरच्या पेनड्राइव्हमधून हजारो गाणी सोबत वाहवणाऱ्या संगीतभक्तांना दरवेळी संगीतकारांनी केलेल्या प्रयोगांनी नादावून सोडले. आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांबद्दल पोटतिडकीने बोलणारे गेल्या दोन-तीन पिढय़ांमधील अनेक लोक भेटतील. निव्वळ दैवी, अलौकिक वगैरे विशेषणांनी त्या गाण्यांचे कौतुक करताना पाहायला मिळेल. पण नक्की आर. डी. बर्मन यांनी संगीतात केलेल्या प्रयोगांबाबत निव्वळ बोलबडबडय़ा संगीतदर्दीना काहीच सांगता येणार नाही. ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या गाण्यामध्ये त्यांनी वापरलेल्या काचेच्या ग्लासांच्या माहितीइतपतच त्यांचे कुतूहल कौतुक असेल. आर.डी. बर्मन यांची बहुतांश प्रायोगिक गाणी ही त्यातल्या कॉर्ड प्रोजेक्शनमुळे वेगळी वाटतात. वाद्यांच्या ‘सस्पेन्शन कॉर्र्डस’ या कठीणवर्गीय कॉर्ड्समध्ये बहुतांश चांगली गाणी बेतण्यात आलेली आहेत. त्यामुळे वेगळेपणा हा त्या कॉर्ड्सच्या ध्वनिपरिणामाचा भाग आहे. ‘हम तुम से मिले, और जुदा हो गये’ या रॉकीमधील गाण्यातील गिटार कॉर्ड प्रोजेक्शन त्या काळातील सर्व गाण्यांहून भिन्न आहे. त्या काळात जागतिक संगीतामध्ये होणाऱ्या प्रयोगांशी समांतर असे संगीत बर्मन यांनी आणले होते. त्यांनी  केलेल्या सर्व डान्स नंबर्सवर भल्या भल्या कलाकारांची नृत्य करताना फेफे उडायची. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामध्ये ‘निशा’ या गाण्यावर कमल हासन आणि रिना रॉय यांचे अवघडल्यासारखे अतिनृत्य हे उदाहरणादाखल पाहिल्यास लक्षात येईल. संगीतक्रांतीचा टप्पा सर्वच घटकांना बदलतो, असे नाही. ए.आर. रेहमान यांच्या गीतांचा उदय झाला तेव्हा आपल्याकडे रेडिओ प्रोगाम घराघरांत ऐकले जात होते. चित्रपटाच्या प्रसिद्धीचे ते एकमेव मोठे साधन होते. सकाळी ८.३० ते १० चित्रपटांची गाणी आणि माहिती ट्रेलरसारखी तोंडी सांगितली जाई. उपग्रह वाहिन्या आल्यानंतर पहिले हा रेडिओ प्रोगाम बंद झाला. तर रेहमानच्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील रेमो फर्नाडिसचे ‘हम्मा’ हे गाणे रेडिओ प्रोग्रामवर वाजू लागले तेव्हा ते इन्स्टण्ट हीट झाले. दूूरदर्शनवर पहिल्यांदा त्याचे चित्रीकरण पाहायला मिळाले, तेव्हा हे गाणे आवडणारे सगळे हिरमुसले इतके त्याचे सामान्य चित्रीकरण वाटले. या गाण्यात वापरलेल्या पारंपरिक वाद्यांचा आधुनिक शैलीत केलेला वापर कानांना श्रीमंत करणारा होता. मात्र त्या गाण्यातील कोणत्याही बिटला न्याय देऊ शकेल इतके नृत्य चित्रीकरणात आले नाही. (अलीकडे त्याचे आणखी वाईट चित्रीकरण झाले होते.) याच काळात ‘हम से है मुकाबला’ चित्रपटातील ‘ओले ओ’ या गाण्याला प्रभुदेवा या नृत्यकलाकाराने न्याय दिला. वेस्टर्न चित्रपटांची पाश्र्वभूमी आखून तयार झालेल्या या गाण्याचे चित्रीकरण मायकेल जॅक्सन वेगातील नृत्यामुळे छान वाटले होते. भारतातील सिनेसंगीतातील क्रांतीचे प्रत्येक टप्पे हे गमतीशीर चित्रीकरणासोबत आहेत.

परदेशी सिनेमातही संगीतप्रयोग होतात. त्यातील लोकप्रिय वर्षभर चर्चेतही राहतात. चर्चेत नसलेल्या प्रयोगांविषयी माहिती करून घेणे महत्त्वाचे. टायटॅनिक चित्रपटानंतर लिओनाडरे डी कॅपरिओ या नटाचे अनेक फ्लॉप सिनेमे आले. त्यातील एक डॅनी बॉएलचा ‘द बीच’. थायलंडमध्ये फुकेत या परिसरातील देखण्या प्रवाळबेटांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांची गाणी वापरण्यात आली आहेत. त्यातले डॅरिओ जी या बॅण्डने तयार केलेले ‘व्हॉयसेस’ हे गाणे पाहण्या-ऐकण्यासाठी सुंदर अनुभूूती आहे. त्यात वापरलेल्या तंतूवाद्याचा परिणाम आणि एकूणच गाण्याचे चित्रीकरण विचारपूर्वक केले आहे. अख्ख्या चित्रपटाच्या गोष्टीविषयी कुतूहल निर्माण करणाऱ्या आकर्षक ट्रेलरप्रमाणे हे गाणे काम करते. ‘व्हॉयसेस’ हे या बॅण्डच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक नसले, तरी डॅरिओ जी हा बॅण्ड जगामध्ये आज परिचित आहे, तो या गाण्यामुळे. त्याचे चित्रीकरण यूटय़ूबवर किती वेळा पाहिले गेले आहे, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येईल. सगळ्या संगीतक्रांतीमधले टप्पे ध्वनीवर प्रयोग करणारे आहेत. ध्वनियंत्रणा आणि त्यातील अभियंत्यांच्या कल्पकतेहूून संगीतकारांची कल्पकता केव्हाही महत्त्वाची राहिली आहे. नाशवंत फळभाज्यांपासून वाद्य बनविणारा एक संगीतसमूह आहे. भोपळा, मुळा, बीट आणि सापडतील त्या भाज्यांचा वापर ते वाद्य म्हणून करतात. यात खरोखरची गाजराची बासरीही पाहायला मिळेल.

अलीकडेच एक नवा सांगीतिक प्रयोग इमोजन हीप या ब्रिटिश गायिकेने केला आहे. भविष्यातील सारे संगीतप्रवाह यातून बदलण्याची शक्यता आहे. तिने संगीत हातमोज्यांची निर्मिती केली असून हाताच्या विशिष्ट हालचालीद्वारे संगणकावर वाद्ये वाजविली जातात. इलेक्ट्रॉनिक म्युझिक असले, तरी त्यामागची बुद्धी आणि कल्पना पूर्णपणे मानवी आहे. या वाद्याचा डेमो तिने काही महिन्यांपूर्वी सादर केला. अख्खा ऑर्केस्ट्रा हातमोज्यांद्वारे कोणत्याही वाद्य कलाकाराशिवाय हाताळणाऱ्या या प्रयोगाचा व्हिडीओ आत्ताच पाहून घ्या. पुढे हाच प्रयोग जगभरात रूढ होण्याआधी आपण समजून घेतलेला बरा.

viva@expressindia.com